पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धातील उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याला उद्देशून ‘अश्व अक्षांश’ असे संबोधले जाते. दोन्ही गोलार्धांत ३०° ते ३५° या अक्षवृत्तांदरम्यान जास्त वायुभाराचे पट्टे निर्माण होत असतात. सूर्याचे भासमान भ्रमण आणि जमीन व पाणी यांच्या कमीअधिक प्रमाणात तापण्यामुळे व थंड होण्यामुळे हे पट्टे या अक्षांशात वर्षभर सलग राहत नाहीत. सूर्याच्या दक्षिणोत्तर भासमान भ्रमणाबरोबर हे पट्टे साधारणपणे ५-५ अंशांनी दक्षिणोत्तर सरकतात. असे असले, तरी काही भागांत हे पट्टे या मर्यादांच्या कमीअधिक बाहेरही जातात. जास्त वायुभाराचे हे पट्टे साधारणपणे कर्कवृत्त आणि मकरवृत्तांजवळ निर्माण झालेले असतात. कर्कवृत्ताजवळच्या पट्ट्याला कर्कवृत्तीय शांत पट्टा, तर मकरवृत्ताजवळील या पट्ट्याला मकरवृत्तीय शांत पट्टा म्हणून ओळखले जाते. या जास्त वायुभार पट्ट्यांत आकाश निरभ्र असते आणि भूपृष्ठीय वारे मंद गतीने वाहतात.

विषुववृत्ताकडून आणि ध्रुववृत्तांकडून तपांबराच्या वरच्या थरातून आलेली हवा या पट्ट्यात खाली उतरते. खुद्द या पट्ट्यांत भूपृष्ठावर नियमित वारे वाहत नाहीत; मात्र येथून विषुववृत्ताकडे व ध्रुवांकडे वारे (वायुराशी) वाहतात. हेच अनुक्रमे व्यापारी व पश्चिमी (प्रतिव्यापारी) वारे होत. विषुववृत्तीय प्रदेशातील जास्त तापमानामुळे हलकी झालेली आणि या पट्ट्यात खाली उतरणारी ही हवा कोरडी असते. त्यामुळे पाऊस पडण्यास प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. पर्जन्याच्या अभावामुळे या पट्ट्यांत वाळवंटी प्रदेश निर्माण झालेले आहेत. उदा., सहारा वाळवंट या अश्व अक्षांशीय पट्ट्यात स्थित आहे.

पूर्वी जलवाहतुकीसाठी शिडांच्या जहाजांचा वापर केला जाई. पृष्ठवाऱ्याच्या अभावामुळे या पट्ट्यांत ही जहाजे कधीकधी बरेच दिवस अडकून पडत. तसेच स्थानिक कारणांनी निर्माण झालेल्या अनियमित वाऱ्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. वसाहतींच्या सुरुवातीच्या काळात यूरोपातून अमेरिकेकडे आणि वेस्ट इंडीजमधील आपल्या वसाहतींकडे घोडे घेऊन जाणारी जहाजे या उच्चदाबाच्या शांत पट्ट्यात अडकून पडली म्हणजे जहाजांवरील मर्यादित पाणी माणसांना पुरावे म्हणून घोड्यांना समुद्रात ढकलून देत असत. यावरून विशेषत: उत्तर गोलार्धातील या भागाला ‘अश्व अक्षांश’ हे नाव पडले असावे, अशी समजूत आहे. उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात जलाशयाचा भाग अधिक असल्यामुळे खाली उतरणाऱ्या हवेचा सलग पट्टा निर्माण झालेला असतो.

समीक्षक : माधव चौंडे