एमर्सन, राल्फ वॉल्डो : ( २५ मे १८०३ – २७ एप्रिल १८८२ ). अमेरिकन प्रभावी वक्ता, कवी व निबंधकार. ही इमर्सन यांची जनमानसातील ओळख. त्यांचा जन्म मॅसॅचूसेट्सतील बॉस्टन येथे झाला. तेथेच लहानाचा मोठा झालेल्या इमर्सनचे शालेय शिक्षण बॉस्टन पब्लिक लॅटिन स्कूलमध्ये झाले. वयाच्या सातव्या वर्षी त्याच्या वडिलांचे‒रेव्हरंड विल्यम इमर्सन यांचे‒निधन झाले व घरातील आई, आत्या यांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन इमर्सन जगाचे निरीक्षण करू लागला. चौदाव्या वर्षी हार्व्हर्ड महाविद्यालयात दाखल होऊन पदवी प्राप्त करून घेतल्यावर ते शालेय शिक्षक म्हणून रुजू झाले. हार्व्हर्ड डिव्हिनिटी स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वडिलांप्रमाणे युनिटेरिअन मिनिस्टर हे धर्मपद स्वीकारले. अभिजात व आधुनिक धर्मग्रंथाच्या अभ्यासांती रूढ धर्माला मान्यता देणे न पटल्याने अखेरीस पदत्याग करून त्यांनी धर्मक्षेत्राऐवजी बौद्धिक क्षेत्र स्वीकारले. यूरोपची जडणघडण जाणून घेण्यासाठी १८३३ मध्ये त्यांनी यूरोपवारी केली. बराच काळ यूरोपमध्ये, विशेषतः लंडनमध्ये त्यांनी व्यतीत केला. तेथे त्यांचे कोलरिज, वर्डस्वर्थ, जॉन स्टुअर्ट मिल, कार्लाइल यांच्याशी दृढ बंध प्रस्थापित झाले. अमेरिकेला परतून बॉस्टनजवळील काँकर्डमध्ये ते स्थायिक झाले.

इमर्सन यांच्या तत्त्वविचारांचे नाते शिलरच्या तत्त्वज्ञानाशी आहे. तत्त्वज्ञान हा मुळात दोघांचा अभ्यासविषय नव्हता. तत्त्वज्ञानातील काटेकोरपणाविषयी त्यांना आत्मीयता होती, अशातला भाग नाही. त्यांचे विचार विश्लेषक नसून संश्लेषक होते. विचारांना वजन होते; विद्वज्जनांमध्ये आदराचे स्थान होते. सुरुवातीस कोलरिज, थोरो, नित्शे नि वॉल्ट विटमन यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातून व ब्रिटिश-जर्मन स्वच्छंदतावादातून (Romanticism) त्यांचा अतिशायितावाद (Transcendentalism) विकसित झाला. कालांतराने ते ज्यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, त्यांना तसेच विल्यम जेम्ससारख्या प्रतिष्ठितांना त्यांनी प्रभावित केले.

धर्मप्रचारात स्वारस्य असताना एलेन लुईसा टकरशी इमर्सन विवाहबद्ध झाले; पण दोन वर्षांत पत्नी क्षयरोगाने निवर्तली. यूरोपहून परतल्यावर त्यांनी लिडिया जॅक्सनशी पुनर्विवाह केला. वक्ता व साहित्यिक म्हणून नावलौकिक कमावला. त्यांचे घर म्हणजे बौद्धिक चर्चांचे निधान झाले. कालांतराने त्यांनी अतीततत्त्वकेंद्री विचार प्रसृत करण्यासाठी संघ काढला व त्याला अतिशायी संघ (Transcendental Club) असे नाव दिले. कांट, फिश्टे, शेलिंग, हेगेल यांच्या चिद्वादी विचारव्यूहाचा हा अमेरिकी अवतार होय. त्यांनी आपला ‘नेचर’ नामक जाहीरनामा प्रसिद्ध केला व १८४० मध्ये दडायलनामक नियतकालिक काढले. कांटच्या ‘अतिशायी’ ह्या संज्ञेवरून आलेला अतिशायितावाद हे इमर्सनचे सर्वांत महत्त्वाचे योगदान होय.

दृश्य जगापलीकडे असलेल्या अतीततत्त्वाविषयीचा हा वाद दृश्याला, लौकिकाला, व्यवहाराला नाकारत नाही; पण ‘दिसते तेवढेच खरे’ असेही मानत नाही. ही भूमिका एकाअर्थी धार्मिक पण पारंपरिक धर्मसंकल्पना मान्य न केल्याने त्यांनी आपले म्हणणे सविस्तर सांगितलेले आढळते. चिद्वादाहून हे म्हणणे कसे वेगळे आहे, हे त्यांनी पुनःपुन्हा दाखवून दिले.

१८४२ मधील ‘द ट्रान्सेंडेंटलिस्ट’ ह्या व्याख्यानाद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट होते. ‘The force within you’ म्हणजे आंतरिक शक्ती. ती आतून जाणवते आणि बाहेरही तिचा प्रत्यय येतो. चैतन्यतत्त्व अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले असते. धर्म का, कशासाठी, तर नीतिमत्ता जपण्यासाठी. धार्मिकता म्हणजे नैतिकता. सान्त माणसाला परिपूर्ण जीवन जगणे शक्य आहे; नव्हे, तोच त्याच्या जगण्याचा अर्थ आहे. त्यासाठी त्याच्यातील सर्व प्रकारच्या क्षमता विकसित होणे आवश्यक आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. ‘Self-Reliance’ चा हा अर्थ आहे. इमर्सन यांचा अतीततत्त्ववाद असा व्यक्तिवादी असून व्यक्तीची चैतन्यमयता अधोरेखित करणारा आहे. एकत्व, अखंडता, समग्रता हे इमर्सन यांच्या लेखनाचे आशयसूत्र आहे.

माणसाचे माणूसपण सैनिक, नेता, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक होण्यात सामावलेले नसते. आपल्या शिकविण्याच्या, लिहिण्याच्या कृतीतून ते स्पष्ट होत नाही. ही आपली ओळख अपुरी असते. आपण मुळात शेतकरी, प्राध्यापक, अभियंता असतो, ही समजूत चुकीची आहे. आपल्यात  बरेच काही असते. श्रमविभागणीच्या नावाखाली समाजात फूट पाडली जाते. वास्तविक माणसे अखंड असतात. आपण घरकाम करतो, बाजारहाट करतो, कधी व्यवहार ऑनलाईन करतो, कधी गाणे म्हणतो, स्व:प्रतिमा (Selfie) काढतो, नोकरी-व्यवसाय करतो, बागकाम करतो, व्यायाम, ध्यान-धारणा करतो. असे सर्व व्यवहार पार पाडणारी माणसे एक आणि एकाच प्रकारचे काम करत नाहीत. अनेक प्रकारची कामे हातून सहजपणे होतात. इमर्सन म्हणतो तसे भूतकाळ आपणास धडे घालून देतो आणि भविष्यकाळ खुणावत असतो.

मात्र बऱ्याचदा हातून चुका घडतात, अधिकार गमावले जातात; आदर्शवाद गळून पडतो. माणसांची क्षेत्रे कमालीची सीमित होतात. मग अखंड माणसाऐवजी फक्त बोट, मान, पोट, कोपर तेवढे राहते. माणूस गायब होतो. धर्माच्या, राजकारणाच्या, सैन्याच्या, यंत्रांच्या क्षेत्रात माणसे अशी गुरफटून जातात की, त्यांच्या सर्व क्षमतांचा विकास दुरापास्त होतो.

‘द अमेरिकन स्कॉलर’ हे इमर्सन यांचे ३१ ऑगस्ट १८३७ रोजी दिलेले व्याख्यान सुप्रसिद्ध आहे. ‘स्कॉलर’ त्याच्या वैचारिक क्षेत्रात गुंतून राहतो. पोपटाप्रमाणे इतरांचे विचार सांगत राहतो. वास्तविक निसर्गचक्राचे भान ह्याच स्कॉलरला असते. ऋतुचक्र जाणून ते तो तन्मयतेने अनुभवतो. त्याने निसर्गाशी लय साधलेली असते. दिवस-रात्र अखंड चालणारे सृष्टिचक्र अर्थातच अनादी-अनंत असते. ते ईश्वरनिर्मित जाळे (web of God) असते. या जाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जेथून उगम तेथेच शेवटचे टोक येते. त्याला ना परीघ, ना केंद्रबिंदू. वाढत्या वयानुसार व्यक्तिवादी दृष्टिकोन मावळत जातो आणि परस्परसंबंधांचे धागे स्पष्ट होत जातात; मात्र ते उलगडून दाखविता येत नाहीत, स्पष्ट करता येत नाहीत. विरोध, द्वंद्व निवळतात; जमिनीखाली दडलेली मुळे दिसू लागतात आणि देठावरील फूलही.

शाळकरी मुलाला सूचविले जाते… बाबा रे, समोरचा सूर्यास्त आणि तू या दोहोंचे मूलस्थान समान आहे. पानाचे आणि फुलाचे उगमस्थान एकच आहे. तो ‘soul of the soul’ आत्म्याचा आत्मा आहे. वेदांती परिभाषेत अंतरात्मा, प्रत्यगात्मा आहे. विशाल ज्ञानसागराच्या जाणिवेने तो ज्ञाननिर्मितीच्या अखंड प्रक्रियेत सहभागी होण्याची उमेद बाळगतो. निसर्गाचे महत्त्व जाणून इमर्सन यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘नो दायसेल्फ’ ही प्राचीन शिकवण आणि ‘स्टडी  नेचर’ ही अर्वाचीन शिकवण एकच असल्याचे लक्षात येते. निसर्ग, आजूबाजूचा परिसर, रम्य सृष्टी ज्ञानग्रहण प्रक्रियेत महत्त्वाच्या असतात नि त्याचबरोबरीने पुस्तके, ग्रंथ मोलाची असतात. त्यात भूतकाळ ग्रथित केलेला असतो. म्हणून पुस्तके सातत्याने येत राहणे आवश्यक असते. प्रत्येक पिढीने लिहिणे आवश्यक असते. वर्तमानाची दखल त्यात घेतली जाते. पुस्तकातून जगाविषयीचे ज्ञान होते. त्यातील आशयाच्या चिंतनामुळे आत्मभान विकसित होते. त्यातून विचारांस दिशा मिळते. मात्र केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते. छोट्या सुभाषितांसारख्या वाक्यांमधून इमर्सन यांचे तत्त्वज्ञान व्यक्त होते. उदा.,

  • ‘Trust thyself’ (Self-Reliance)
  • ‘In self-trust all the virtues are comprehended’ (The American Scholar)
  • ‘Action is with the scholar subordinate, but it is essential. Without it thought can never ripen into truth’ (The American Scholar)
  • ‘Character is higher than intellect’ (The American Scholar)
  • ‘Thinking is the function. Living is the functionary’ (The American Scholar)
  • ‘The stream retreats to its source’ (The American Scholar)
  • ‘A great soul will be strong to live as well as strong to think’ (The American Scholar)
  • ‘Benevolence is absolute and real’ (The Divinity School Address)
  • ‘Whoso would be a man, must be a non-conformist’ (Self-Reliance)
  • ‘….To be great is to be misunderstood…Greatness appeals to the future’ (Self-Reliance)
  • ‘Speak to his heart, and the man becomes suddenly virtuous’ (The Over-Soul)
  • ‘In all conversation between two persons tacit reference is made, as to a third party, to a common nature. That third party or common nature is not social; it is impersonal: is God’ (The Over- Soul)

इमर्सन यांनी म्हटल्याप्रमाणे, स्कॉलर निसर्गातून, पुस्तकातून, कृतीतून शिकत असतो. तो पाहतो, निरीक्षण करतो, आपल्या आकलनानुसार अर्थ लावतो आणि आपले आकलन इतरांपर्यंत नीरक्षीरविवेक राखत पोहोचवितो. म्हणून तो जगाचा डोळा व प्राण असतो. तो जे पाहतो, त्याला जे भिडते, ते ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचते. हीण  वगळून  सकस तत्त्वविचार तो इतरांपर्यंत पोहोचवितो. ‘The Divine School Address’ मध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व भूतमात्रांचे उगमस्थान एकच आहे, हे जाणल्याने धर्मभावना (Religious sentiment) जागृत होते.

साने गुरुजी, जे. कृष्णमूर्ती व इमर्सन आपल्या व्याख्यानांची सुरुवात निसर्गदृश्ये टिपून करतात. नद्या, समुद्र, पर्वत, पक्षी, गवत, कुरणे, कळ्या, काळोख, पहाट, शेते आदींचे तपशील देत, कृष्णमूर्तींप्रमाणे (मात्र त्यांच्या शतकभर अगोदर) इमर्सन निसर्गसान्निध्यात कोणत्याही दडपणाविना मुक्तपणे रममाण होणे महत्त्वाचे मानतात. ओझे, बंधन, दडपण झुगारून जेव्हा स्वतंत्रपणे वाटचालीस सुरुवात होते, तेव्हा अतिशायितावाद कळतो. हा तत्त्वविचार म्हणजे प्राचीन चिद्वादाचा १८४२ मधील अवतार होय.

इमर्सन यांना चिद्वाद जसा दिसला, तसा त्यांनी मांडला व त्यास अतिशायितावाद म्हटले. चिद्वादाची १८४२ मधील अभिव्यक्ती म्हणजे अतिशायितावाद होय. जडवाद इंद्रियानुभवावर आधारलेला असतो, तर चिद्वाद व अतीत तत्त्ववाद मानवी जाणिवेवर आधारलेला असतो. इंद्रियानुभवाद्वारे ज्या संवेदनांचे ज्ञान होते, त्यापलीकडील तत्त्व जे जसे आहे, तसे अतीत तत्त्ववाद महत्त्वाचे मानतो. अर्थातच, जडवादामुळे जे आहे, ते कळते; तर अतीततत्त्व जाणल्यामुळे आदर्श समजतात. त्यामुळे प्रत्येक जडवादी आदर्शलक्ष्यी असतो आणि एकदा का आदर्शलक्ष्यी झाले की, मग पुन्हा जडवादाकडे वळणे शक्य नाही. कांटचा अतिशायी हा शब्द वापरून पुढे अतीत तत्त्वाशी सुसंगत अशी ‘Self -Reliance’ ही संज्ञा इमर्सन यांनी विशद केली. मानवी मर्यादा जाणून त्या उल्लंघून पुढे जात राहण्याची व वर्तमानात आनंदाने जगण्याची प्रेरणा देणारे, हे तत्त्वज्ञान आहे. आत्मभानातून येणारा दुर्दम्य आत्मविश्वास राखून व लौकिक-अलौकिक आनंद भरभरून अनुभवून जीवनगाणे समरसतेने गाण्याची स्फूर्ती देणारे आहे. मानवी अस्तित्व सान्त व अनंत असते. मानवी जीवनाचे पावित्र्य इमर्सन आपल्यात जागे करतात. दिक्कालासहित संपूर्ण सृष्टीतील दिव्यत्वाला, मांगल्याला साद घालतात आणि अवघे आयुष्य उजळवून टाकण्याची किमया सहज साधतात. उदात्त, भावनिक, बौद्धिक, नैतिक, धार्मिक, वांशिक जीवनाचा त्यांनी चितारलेला आदर्श एकारलेला नाही. विविध वृत्ती-प्रवृत्तीचा समन्वय साधून त्यापलीकडील जीवनाचे दर्शन घडविणारा अतीत तत्त्ववाद म्हणून महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना इमर्सन यांच्या अतीत तत्त्ववादाचे महत्त्वपूर्ण स्थान लक्षात येते. ‘The Prophet of American Religion’ अशा शब्दांत हेराल्ड ब्लूमने त्यांचा गौरव आपल्या द अमेरिकन रिलिजन  ह्या पुस्तकात केला आहे.

इमर्सन यांची साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे : एसेज (१८४१‒४४), पोएम्स (१८४७), नेचर, अड्रेसीस अँड लेकचर्स (१८४९), रिप्रेझेंटेटिव्ह मेन (१८५०), इंग्लिश ट्रेट्स (१८५६), द कंडक्ट ऑफ लाईफ (१८६०), मिड/मे डे अँड अदर पिसेस (१८६७), सोसायटी अँड सॉलिट्युड (१८७०), नॅचरल हिस्टरी ऑफ द इंटलेक्ट : द लास्ट लेक्चर्स ऑफ राल्फ वाल्डो इमर्सन (१८७१), लेटर्स अँड सोशल एम्स (१८७५), द करस्पॉन्डेन्स ऑफ थॉमस कार्लाईल अँड राल्फ वाल्डो इमर्सन (१८३४‒१९७२).

संदर्भ :

  • Field, Peter S. Ralph Waldo Emerson : The Making of a Democratic Intellectual, Lanham, 2002.
  • Porte, Joel, Representative Man : Ralph Waldo Emerson in His Time, New York, 1988.
  • Porte, Joel; Morris, Saundra, The Cambridge Companion to Ralph Waldo Emerson, Cambridge, 1999.
  • Richardson, Robert D. Jr. Emerson : The Mind on Fire. Berkeley, California, 1995.
  • Schacht, Richard, The Norton Anthology of Western Philosophy : After Kant the Interpretive Tradition, New York, 2017.
  • https://iep.utm.edu/emerson/
  • https://youtu.be/UJx_q5bILCE
  • https://youtu.be/daRaMqFBjzQ
  • https://youtu.be/pMhmoH42bRs

                                                                                                                                                                     समीक्षण : हिमानी चौकर