दीक्षित, रावबहादूर काशिनाथ नारायण : (२१ ऑक्टोबर १८८९ – ६ ऑक्टोबर १९४४). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. ते पहिल्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीचे मानकरी होते. त्यांचे एम. ए. पर्यंतचे शिक्षण डेक्कन कॉलेज, पुणे येथे झाले. एम. ए.च्या परीक्षेत त्यांना भगवानदास पुरुषोत्तमदास संस्कृत पारितोषिक मिळाले. काही काळ त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.

दीक्षित भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यात रुजू झाले (१९१२) व त्यांनी पुरातत्त्व विषयाचे प्रशिक्षण विख्यात पुरातत्त्वज्ञ ⇨ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांच्याकडून घेतले. यानंतर त्यांनी मुंबई व लखनौ येथे अभिरक्षक म्हणून काम पाहिले (१९१४–१८). पुढे त्यांनी १९२२ पासून पुरातत्त्वीय अधीक्षक म्हणून प्रामुख्याने पश्चिम व पूर्व मंडलांमध्ये काम पाहिले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातच त्यांनी शासकीय पुराभिलेखक आणि उपमहासंचालक म्हणूनही काम केले. ते पुरातत्त्वातील लिपी, अभिलेख व मुद्राशास्त्र या विषयांत पारंगत होते. त्यांनी प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ ⇨ सर जॉन ह्यूबर्ट मार्शल यांच्या ⇨ मोहें-जो-दडोच्या उत्खननात भाग घेतला होता.

दीक्षितांनी १९२१ ते १९२४ दरम्यान केलेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात अनेक पुरातन वास्तूंचे तसेच शिल्पांचे अवशेष सापडले. त्यांच्या सर्वेक्षणातील उल्लेखनीय स्थळे :  तामलुक, गगनेश्वर मंदिर (खरगपूर, प. बंगाल), बारकर व कल्यानेश्वरी मंदिर (जि. आसनसोल, प. बंगाल),  बंगर (जि. दिनाजपूर, प. बंगाल), बिहारेल (राजशाही, बांगला देश), भारत-भायना, सिबपूर (जि. खुलना, बांगला देश), दाह पर्वतीय (जि. तेजपूर, आसाम), कैलाशहार (जि. उनाकोटी, त्रिपुरा).

भारतीय पुरातत्त्वज्ञ आर. डी. बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीक्षित यांच्या देखरेखीखाली ⇨ पहाडपूर (बांगला देश) येथील उत्खनन झाले (१९२६–३४). येथील उत्खननात त्यांना गुप्त आणि पालकालीन अवशेष सापडले. या अवशेषांमध्ये भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) नक्षीकाम असलेल्या विटांनी सुशोभित केलेले मंदिर, तसेच विविध देवतांच्या पाषाणमूर्ती, मातीची भांडी व नाणी सापडली. यावरील दीक्षित यांचा मेम्वार्स ऑफ द आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया – एक्सकव्हेशन ॲट पहारपूर (१९३८) हा  ग्रंथ प्रसिद्ध आहे.

दीक्षित यांनी महास्थानगढ (बांगला देश) येथे उत्खनन केले (१९२८-२९). त्यांच्या मते हे स्थळ तुलनात्मक दृष्ट्या बासर, साहेत-माहेत व कौशाम्बी (कोसम) या गंगेच्या खोऱ्यातील प्राचीन वसाहतींच्या बरोबरीचे असावे. उत्खननातून पालकाळातील धार्मिक वास्तूंचे अवशेष समोर आले. त्यामुळे त्यांनी इ. स. ८ व्या शतकातील ब्राह्मण धर्माचे हे महत्त्वाचे स्थळ असावे, असा निष्कर्ष काढला.

दीक्षित यांची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक (Director General) म्हणून नियुक्ती झाली (२१ मार्च १९३७). त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने ⇨अहिच्छत्र (बरेली, उत्तर प्रदेश) येथे उत्खनन केले (१९४०–४४). येथे त्यांनी स्तरवार उत्खननाचे (Stratigraphic digging) तंत्र अवलंबिले. ह्या उत्खननात इ. स. पू. ६०० ते  इ. स. पू.  ११०० या काळातील वसाहतींचे पुरावे, तसेच मातीच्या विटांनी बांधलेली तटबंदी आणि चित्रित राखी मृद्भांडी (Painted Grey Ware) मिळाली. येथे मिळालेल्या मातीच्या नक्षीयुक्त विटांमध्ये आणि पहाडपूर येथील विटांमध्ये साम्य दिसून आले.

दीक्षित यांनी प्रथमच भारतातील विविध विद्यापीठांना पुरातत्वशास्त्रीय शोधांमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित केले. कलकत्ता विद्यापीठाला बंगर (दक्षिण दिनाजपूर, प. बंगाल) येथील उत्खननाचा परवाना दिला. राष्ट्रीय संग्रहालयासह विविध राज्यांतील पुरातत्त्व विभागांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. गुजरातमधील प्रागैतिहासिक काळातील संशोधनास प्रोत्साहन दिले. राजपुताना संग्रहालय (अजमेर, राजस्थान) आणि कन्नड रिसर्च सोसायटी (धारवाड, कर्नाटक) या संस्थांना त्यांनी बहुमोल सहकार्य केले. अलीगढ (उत्तर प्रदेश) येथील इतिहास परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले (१९४३).

संदर्भ :

  •  Chakrabarti, Dilip K. A History of Indian Archaeology from the Beginning to 1947’, New Delhi, 1988.
  •  Cumming, John, Revealing India`s Past : A Record Of Archaeological Conservation & Exploration In India And Beyond’, New Delhi, 1939.
  •  Roy, Sourindranath, The story of Indian archaeology 1784-1947, New Delhi, 1961.
  •  Srivastava, Vijay Shankar Ed. Cultural Contours of India : Dr. Satya Prakash Felicitation Volume, The story of Archaeological, Historical and Antiquarian researches in Rajasthan before Independence, New Delhi, 1981.

समीक्षक – प्रमोद जोगळेकर