कृष्णस्वामी, व्ही. डी. : (१८ जानेवारी १९०५–१५ जुलै १९७०). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म तमिळनाडूतील चिंगलपेट जिल्ह्यामधील वेंबक्कम येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शि़क्षण चेन्नईत झाले. कृष्णस्वामींनी मद्रास विद्यापीठातून भूविज्ञान विषयात एम. ए. पदवी संपादन केली व त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या परिसरातील प्रागैतिहासिक स्थळांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्यांना प्रागैतिहासिक मानव आणि प्लायस्टोसीन कालखंडातील पर्यावरण यांत रस होता. नंतर ते मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले व तेथे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीमधून पुरातत्त्व विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. तेथे असताना कृष्णस्वामींना विख्यात भूपुरातत्त्वज्ञ एफ. ई. झॉयनर (१९०५–१९६३) आणि केंब्रिज विद्यापीठातील ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ माईल्स बर्किट (१९०९–१९९४) यांच्याबरोबर यूरोपातील हिमयुगांशी संबंधित स्थळांवर काम करण्याची संधी मिळाली.

लंडनहून परतल्यानंतर कृष्णस्वामींना जर्मन भूवैज्ञानिक हेलमुट डी टेरा (१९००–१९८१) व केंब्रिज येथील भूवैज्ञानिक टी. टी. पॅटर्सन (१८९०–१९७१) यांच्या येल-केंब्रिज संयुक्त मोहिमेत काम करण्याची संधी प्राप्त झाली (१९३५). या मोहिमेत कृष्णस्वामींचा काश्मीर व पंजाबमधील पोतवारच्या पठारी प्रदेशात केलेल्या भूपुरातत्त्वीय संशोधनात मोलाचा सहभाग होता. या नंतर कृष्णस्वामी व टी.टी. पॅटर्सन यांनी चेन्नई व आसपासच्या प्रदेशांत संयुक्तपणे भूपुरातत्त्वीय संशोधन केले.

सन १९४१-४२ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने गुजरातमधील पहिल्या प्रागैतिहासिक मोहिमेची आर्थिक जबाबदारी घेतली. प्रा. ह. धी. सांकलिया (१९०८–१९८९) यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत कृष्णस्वामींनी साबरमती नदीच्या परिसरात सर्वेक्षण केले. पुराश्मयुग व नवाश्मयुग या दरम्यानच्या काळात भारतीय उपखंडात मानवी वसाहती नव्हत्या, ही रॉबर्ट ब्रूस फूट (१८३४–१९१२) यांची कल्पना कृष्णस्वामींनी तपासून पाहिली. उत्तरेकडील सोहन संस्कृती व दक्षिणेतील मद्रास अवजारे यांचा मिलाफ या प्रदेशात झाला असावा व ही पुरास्थळे मातीच्या जाड थरांखाली गाडलेल्या अवस्थेत असावीत, असे प्रतिपादन कृष्णस्वामींनी केले.

कृष्णस्वामी पुढे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात साहाय्यक अधीक्षक या पदावर दाखल झाले (१९४६) व पुढील वर्षी त्यांना अधीक्षक या पदावर बढती मिळाली. या पदावर त्यांनी १९५८ पर्यंत काम केले. पुढे ते निवृत्तीपर्यंत उपमहासंचालक होते (१९५८-६२). निवृत्तीनंतर कृष्णस्वामींनी कोलकात्याच्या इंडियन म्युझियमचे (१९६२-६५) आणि हैदराबादच्या सालारजंग म्युझियमचे (१९६६-६८) संचालक म्हणून काम पाहिले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातील कारकिर्दीत कृष्णस्वामींनी चिंगलपेट व पुदुकोट्टाई या जिल्ह्यामधील आणि केरळमधील कोचीन संस्थानात १९४४-५० दरम्यान संशोधन करून दक्षिण भारतातील महापाषाणयुगीय अवशेषांचे सविस्तर वर्णन केले. एफ. ई. झॉयनर यांच्या १९४९ मधील प्रागैतिहासिक मोहिमेतही कृष्णस्वामींचा सहभाग होता. कृष्णस्वामींनी चंद्रावली (१९४७) व ब्रह्मगिरी (१९४७) या स्थळांच्या उत्खननात सहभाग घेतला होता. महापाषाणयुगीय अवशेष व या संस्कृतीच्या वसाहती यांच्यातील परस्परसंबंध बघण्यासाठी त्यांनी चिंगलपेट जिल्ह्यात कुन्नटूर येथे उत्खनन केले (१९५७-५८). त्यांनी पश्चिम बंगालमधील धरणाच्या पाण्याखाली जाणाऱ्या कांगसबती नदीच्या खोऱ्यात पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून अनेक पुराश्मयुगीय स्थळांचा शोध लावला. त्याचप्रमाणे कांगडा व बिलासपूर जिल्ह्यातील (हिमाचल प्रदेश) सतलज नदीवरील धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या भागांचे सर्वेक्षण  केले (१९६१-६२).

कृष्णस्वामी रॉयल एशिॲटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडचे आजीव सदस्य होते. त्यांचे स्टोन एज इन इंडिया (१९४७), मेगालिथिक टाइप्स ऑफ साउथ इंडिया (१९४९) आणि निओलिथिक पॅटर्न इन इंडिया (१९६०) हे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

बंगळूरू येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Anonymous, ‘Obituary – V. D. Krishnaswamiʼ, Puratattva, 4: i-iii, 1970-71.
  • Mani, B. R.; Ray, Purnima & Patil, C. B. Remembering Stalwarts, Archaeological Survey of India, New Delhi, 2014.

                                                                                                                                                                                   समीक्षक : सुषमा देव