रोमन साम्राज्यातील पूर्वेकडील भाग ‘बायझंटिन (बिझंटाईन) साम्राज्य’ म्हणून प्रसिद्धीस आला. ख्रिस्ती धर्माला जवळ करणारा पहिला रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन याच्या नावावरून त्याने उभारलेल्या या राजधानीस कॉन्स्टँटिनोपल (सध्याचे इस्तंबूल) हे नाव देण्यात आले. ३९५ च्या सुमारास ‘ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च’ची स्थापना झाली. १०५४ च्या सुमारास पश्चिमेकडील रोमच्या चर्चपासून ते वेगळे झाले. याचे नाव जरी ‘ईस्टर्न’ (पौर्वात्य) असले, तरी जगातील बरीच चर्चेस याचे सभासद आहेत.
रशियातही नवव्या-दहाव्या शतकांच्या सुरुवातीस या चर्चचा प्रसार झाला. या पूर्वी या चर्चचा सनातनी तत्त्वांना विरोध दर्शविणारा एक गट ‘ईस्टर्न चर्चेस’ या नावाने त्यातून बाहेर पडला. आजही तो अस्तित्वात आहे. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचा विद्यमान विस्तार मोठा असून जागतिक चर्च संघटनेचे हे चर्च एक सभासद आहे.
जगातील विविध देशांत याच्या शाखा असलेली चर्चेस ही त्या त्या राष्ट्रात स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करीत असली, तरी ती सर्व एकच आहेत. त्यांची धर्मतत्त्वे, उपासनापद्धती व संघटनापद्धतीही सारखीच आहे. कॉन्स्टँटिनोपलचे पॅट्रिआर्क हे ह्या सर्व चर्चचे प्रमुख मानले जातात. पश्चिमेकडे झालेल्या धर्मसुधारणांच्या चळवळीसारखा आणीबाणीचा प्रसंग या चर्चच्या इतिहासात अद्यापि घडलेला नाही. म्हणून ख्रिस्ती धर्मश्रद्धेचे आपण पूर्णपणे रक्षण केले असून ‘होली कॅथलिक व ॲपॉस्टॉलिक चर्च’ या पदवीस आपणच पात्र आहोत, असा त्यांचा दावा आहे.