रासबेरी वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रूबस निव्हियस आहे. रू. लॅसिओकार्पस  या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. गुलाब व ब्लॅकबेरी या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. रासबेरीला गौरीफल असेही म्हणतात. ती मूळची दक्षिण आशियातील असून अफगाणिस्तान ते मलेशियापर्यंत बहुतकरून सर्व देशांत आढळते. हिमालयात तिचे झुडूप निसर्गत: वाढलेले दिसते. काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून १,७००–२,३०० मी. उंचीपर्यंत तिची लागवड केली जाते. ती महाबळेश्‍वर येथे वन्य स्थितीत आढळत असून तिची लागवडही केली जाते.

रासबेरी (रूबस निव्हियस) : (१) वनस्पती; (२) फुले; (३) फळांचा घोस

रासबेरीचे झुडूप दाट व सरळ वाढणारे असून ते सु. ३ मी. उंच वाढते. खोडाला गुलाबासारखे उलट वळलेले काटे असतात. काही वाकलेल्या लांब, जांभळट किंवा भुरकट फांद्यांना जमिनीवर टेकलेल्या टोकांशी मुळे फुटतात. पाने संयुक्त, एकाआड एक व विषमदली असून पर्णिका ५–७ दलांची व दातेरी असतात. पाने वरून हिरवी तर खालून पांढरट-करड्या रंगाची आणि लवदार असतात. पानांचा खालचा भाग अधिक खरखरीत असतो. फुले लहान, लाल रंगाची आणि फांद्यांच्या टोकांना किंवा पानांच्या बगलेत येतात. रासबेरीचे फूल सु. ३-¿५ सेंमी व्यासाचे असून निदलपुंज ५ संयुक्त दलांचे व दलपुंज ५ मुक्त पाकळ्यांचे असते. फुलात अनेक व मुक्त पुंकेसर असतात. ते पुष्पाधार आणि निदलपुंज यांच्यापासून बनलेल्या कुंभासारख्या भागावर कडेने रचलेले असतात. जायांग अनेक व मुक्त अंडपींचे बनलेले असते. फळ आठळीयुक्त, गोलसर व मऊ असून पूर्ण पिकल्यावर ते गडद जांभळ्या रंगाचे होते. या फळाचे ब्लॅकबेरी या यूरोपातील फळाशी साम्य आढळते.

रासबेरीची फळे खाद्य आहेत. पिकलेल्या फळांना उत्तम चव व वास असतो. मात्र पिकल्यावर ती २४ तासांत खावी लागतात, कारण ती फार काळ टिकत नाहीत. फळांमध्ये ७·८% शर्करा व ०·१३% प्रथिने असतात. त्यांपासून मुरंबे, जेली व सरबते करतात. आइसक्रीमला स्वाद आणण्यासाठी तसेच मिठाईमध्ये फळे वापरतात. फळापासून जांभळट निळा रस काढतात. रस चवदार असून इतर फळांच्या रसाबरोबर त्याचे मिश्रण करतात. रासबेरी फळ आरोग्यदायी आहे. त्याचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी, हृद्‌रोगावर आणि वार्धक्य दूर ठेवण्यासाठी होतो, असा उल्लेख आयुर्वेदात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा