भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे भारतीय उपखंडात ब्रिटिश आल्यानंतरच हिमालय पर्वताचे समन्वेषण आणि त्यातील शिखरे सर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश या प्रदेशातून निघून गेल्यानंतरही हिमालयाच्या समन्वेषणात ब्रिटिशांचाच पुढाकार राहिला होता. भारतीय भूमीच्या सर्वेक्षणाच्या वेळी हिमालयातील उंचउंच शिखरांची नोंद नकाशात केली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील लष्करी अधिकारी विश्रांतीसाठीच्या सुटीत आवड म्हणून हिमालयातील हिमरेषेच्या वरील भागात चढून जाण्याचा प्रयत्न करीत असत. ब्रिटिशांबरोबरच अमेरिकन, स्विस, ऑस्ट्रियन, फ्रेंच, जर्मन, जपानी, ऑस्ट्रेलियन, अर्जेंटिनी आणि अलीकडच्या काळात रशियन व चिनी गिर्यारोहकांनीही हिमालयातील गिर्यारोहणात व समन्वेषणात सहभाग घेतला आहे.
स्थानिक राज्यांनी, विशेषतः तिबेटने, बराचकाळपर्यंत या प्रदेशात गोऱ्या लोकांना मज्जाव केला होता. तसेच काही देशांनी विशिष्ट शिखरांवर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे त्या शिखरांकडे गिर्यारोहकांच्या मोहिमा जाऊ शकल्या नाहीत. ब्रिटन या एकमेव देशाला एव्हरेस्टवरील मोहिमांना परवानगी होती. इटालियन गिर्यारोहकांनी के-२ व काराकोरममधील इतर शिखरांवर, तर जर्मनांनी नंगा पर्वतावर आपले लक्ष केंद्रित केले होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मोजणी करून नकाशांत शिखरे दाखविली गेली, तेव्हापासून हिमालयातील गिर्यारोहकांच्या मोहिमांना वेग आला. डब्लू. डब्लू. ग्रेहॅम, सर मार्टिन कॉनवे, ए. एफ. ममेरी, डग्लस डब्लू. फ्रेशफील्ड, टॉम जी. लाँगस्टाफ, सर फ्रान्सिस एडवर्ड यंगहजबंड आणि जनरल सी. जी. ब्रूस हे प्रमुख आद्य गिर्यारोहक आहेत. दुसऱ्या महायुद्धापासून हिमालयातील समन्वेषणाला अनुकूलता निर्माण झाली. गिर्यारोहणासाठी हलक्या वजनाची उपकरणे, प्राणवायू वापराच्या आधुनिक सुधारित पद्धती आणि इतर आधुनिक साधनसामग्रीचा वापर सुरू झाला. तेनसिंग नोर्के व एडमंड हिलरी हे एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक आहेत (१९५३). हे शिखर चढून जाण्याच्या प्रयत्नात अनेक गिर्यारोहकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. पूर्वी उत्तरेकडील तिबेटच्या पठारावरील राँगबुक हिमनदीवरून हे शिखर सर करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अर्वन आणि मॅलरी हे ब्रिटिश गिर्यारोहक ८,००० मी.च्या वर नाहिसे झाले होते. कदाचित ते शिखर चढून गेले असावेत; परंतु परत आले नाहीत. तदनंतर दक्षिणेकडून नेपाळच्या बाजूने मुख्यतः नामचे बझार येथून या शिखराकडे जाण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला. त्यासाठी येथील शेरपा लोक मदत करीत असत.
हिमालयाच्या बहुतांश भागाचे आता समन्वेषण व नकाशाकरण झाले असून गिर्यारोहकांनी अनेक शिखरे सर केली आहेत. तरीही अजून बरीच शिखरे सर करणे बाकी असून काही प्रदेशांत गिर्यारोहक व निसर्गवैज्ञानिक अद्याप पोहोचलेले नाहीत. जगभरातील गिर्यारोहक आज हिमालयातील शिखरे सर करण्यासाठी सातत्याने येत असतात. आधुनिक तंत्रज्ञान तसेच त्यानुसार तयार केलेली उपकरणे (प्रामुख्याने श्वासोच्छवासासाठीचा कृत्रिम प्राणवायू, कडाक्याच्या थंडीला प्रतिकार करू शकणारी, वजनाने हलकी, परंतु मजबूत उपकरणे), विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांची उपलब्धता, पुरुष व महिलांचे फार मोठे धाडस आणि चिकाटी यांमुळे अलीकडच्या काळात गिर्यारोहणाचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या पर्यायी मार्गांनी गिर्यारोहणाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्याबरोबरच अधिक उंचीवरील हिमालयाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचेही प्रयत्न केले जात आहेत. १९७० मध्ये एका ब्रिटिश संघाने नेपाळ हिमालयातील अन्नपूर्णा हे शिखर पर्यायी मार्गाने चढून जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यापूर्वी फ्रेंचांनी हे शिखर सर केले होते. त्याच वर्षी जपानी गिर्यारोहकांनी पर्यायी मार्गाने मौंट एव्हरेस्ट चढून जाण्याचा प्रयत्न केला होता.
भारतातील कोलकाता विद्यापीठाने १९७० मध्ये गढवाल जिल्ह्यात नंदादेवीच्या दक्षिणेकडील सुंदरडुंगा खोऱ्यात शास्त्रीय संशोधन कार्यक्रमाची सुरुवात केली. भारतात अलीकडच्या काळात गिर्यारोहण क्रीडाप्रकार विकसित केला जात आहे. त्या दृष्टीने पहिल्यांदा पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग येथे व त्यानंतर गढवाल जिल्ह्यातील उत्तर काशी येथे, कुलू खोऱ्यातील मनाली इत्यादी ठिकाणी गिर्यारोहण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. गुलमर्गजवळ शास्त्रीय संशोधनविषयक कार्य चालू आहे. त्याशिवाय इतरही अनेक ठिकाणी क्लब स्थापन करण्यात आले आहेत. अलीकडे भारतीय स्त्री-पुरुष गिर्यारोहक हिमालयातील गिर्यारोहणात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
हिमालयातील यती किंवा हिममानवासंबंधीच्या रहस्यमय कथांचे गूढ अद्याप उकललेले नाही. या हिममानवाचे वास्तव्य हिमरेषेच्या वरच्या भागात असल्याचे मानले जाते. हिममानवाचा आवाज ऐकू आला, त्याला दूरवरून पाहिले किंवा त्याच्या पावलांचे ठसे दिसले अशा अफवांमुळे काही गिर्यारोहण सफरी परतही आल्या आहेत; परंतु वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मते, या निव्वळ दंतकथा असून तथाकथित ऐकलेले आवाज किंवा पाहिलेले पावलांचे ठसे हे अस्वल किंवा शेपटी नसलेल्या एप माकडांचे असावेत.
समीक्षक : नामदेव गाडे