सेखों, निर्मलजित सिंग : (१७ जुलै १९४५‒१४ डिसेंबर १९७१). भारतीय हवाई दलातील एक धाडसी, पराक्रमी वैमानिक आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पदकाचे मरणोत्तर पहिले मानकरी. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पंजाबमधील लुधियानाजवळच्या सरका इसेवाल या गावी ते राहात होते. लुधियाना येथे त्यांचे शिक्षण झाले. ४ जून १९६७ रोजी त्यांची हवाई दलामध्ये नियुक्ती झाली. ते वायुसेनेतील दुसऱ्या पिढीतील अधिकारी होते. सुरुवातीस वायुसेनेचे प्रशिक्षण घेतल्यावर ऑक्टोबर १९६८ मध्ये ते लढाऊ विमानांच्या तुकडीत (स्क्वाड्रन) रुजू झाले. तेथे त्यांना भारतीय नॅट विमाने हाताळण्याचा खूप अनुभव मिळाला. सेखों यांचा मिळूनमिसळून सहकार्य करण्याचा स्वभाव व आनंदी वृत्ती यांमुळे ते ‘ब्रदर’ या टोपण नावाने १८ नंबरच्या नॅट विमानांच्या ताफ्यात विशेष प्रसिद्ध होते.
पश्चिम भागातील श्रीनगर (जम्मू व काश्मीर) येथील हवाई ठाण्यावर पाकिस्तानी हवाई दल सतत हल्ले करीत होते. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यापासून श्रीनगरच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी वैमानिक म्हणून त्यांच्यावरही होती. त्यांच्यासोबत फ्लाइट लेफ्टनंट बी. एस्. धुम्मन व फ्लाइट कमांडर स्क्वाड्रन लीडर व्ही. एस्. पठानिया हेही होते. १४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी एफ्-८६ साबर-जेट विमानांनी श्रीनगरच्या हवाई ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्यास तोंड देण्यासाठी बी.एस्. धुम्मन व निर्मलजित सिंग सेखों सतर्क होते. पहाटेपूर्वी अंधारात काहीच दिसत नसल्याने हवाईतळावर बसविलेल्या यंत्रणेचा उपयोग झाला. निरीक्षण ठिकाणावरून आलेल्या धोक्याच्या सूचनेनुसार सेखों व धुम्मन शत्रूचा हल्ला हाणून पाडण्यासाठी सुसज्ज झाले होते. दरम्यान शत्रूच्या एका बाँबने धावपट्टी उखडली गेली. त्यातील खड्डे व धोक्याची पर्वा न करता सेखों यांनी आपले विमान आकाशात अक्षरशः फेकले व साबर-जेटची साखळी भेदून ज्या दोन साबर-जेटनी विमानतळावर बाँबफेक केली होती, त्यांच्याशी प्रखर झुंज दिली. त्या वेळी श्रीनगरच्या हवाईतळावरील आकाशात व्ही. एस. पठानिया यांना साबर व नॅट विमानांचा चुरशीचा संघर्ष दिसला. धुळीने व बाँब फुटल्यामुळे निघालेल्या धुरामुळे संपूर्ण परिसर भरून गेला होता. त्यामुळे सेखों यांचा सीएपी (कॉम्बट एअर पॅट्रोल) नियंत्रण कक्षाबरोबरचा संपर्क तुटला. धुम्मन यांनी सेखों यांना मदत करण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. त्या दरम्यान सेखों यांनी एका साबर-जेट विमानाच्या उजव्या पंखाकडील भागावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याला आग लागली. त्या वेळी सेखों यांच्याकडून संदेश प्राप्त झाला, ‘मी आनंदाच्या रिंगणात आहे, पण दोन साबर-जेट बरोबर!’ त्यानंतर दुसरे साबर-जेट फुटण्याचाही आवाज झाला. परंतु यानंतर सेखों यांचा रेडिओ संदेश मिळाला, तो असा : “मला वाटते माझ्यावर हल्ला झालाय, धुम्मन तू ये आणि त्यांचा नायनाट कर.” या संदेशानंतर पुन्हा काहीच कळले नाही. आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीतही संख्याधिक्य असणाऱ्या शत्रूशी धैर्याने लढत असताना सेखों यांना वीरमरण प्राप्त झाले. त्या वेळी त्यांचे वय अवघे सव्वीस वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मनजितसिंग व वयोवृद्ध वडील हयात होते.
सेखों यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामगिरीच्याही खूप पुढे जाऊन दाखविलेले उच्चतम धैर्य, उत्तुंग शौर्य, वैमानिकाचे कसब आणि जिद्द यांमुळे त्यांनी हवाई दलाच्या परंपरेला एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. सेखों यांच्या या धाडसी पराक्रमाचा गौरव त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र हे सर्वोच्च लष्करी पदक देऊन करण्यात आला (१९७१). उत्तुंग शौर्यासाठी परमवीरचक्र मिळविणारे सेखों हे भारतीय हवाई दलातील पहिले वैमानिक होत.
समीक्षक – सु. र. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.