एकटा राहणारा, भित्रा आणि लाजाळू सस्तन प्राणी. लाजवंती प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील प्रोसिमिआय उपगणाच्या लोरिसिडी कुलात केला जातो. तो भारताच्या दक्षिण भागात आणि श्रीलंकेसह दक्षिण आशियात आढळतो. कर्नाटक राज्यातील वनांत आढळणाऱ्या लाजवंतीचे शास्त्रीय नाव लोरिस टार्डिग्रेडस आहे. त्याला कृश लोरिस व लुकडा लोरिस असेही म्हणतात.
लाजवंती प्राण्याच्या शरीराची लांबी २०–२५ सेंमी. असून वजन २२०–३५० ग्रॅ. असते. शरीराचा रंग गर्द करडा किंवा मातकट तपकिरी असतो. शरीरावर दाट व मऊ लोकरीसारखे केस असतात. डोके त्रिकोणी असून डोळे मोठे असतात. डोळ्यांभोवती गर्द तपकिरी रंगाची वर्तुळे असतात. त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळे भक्षक प्राणी भितात. कान लहान व गोलसर असतात. शरीर लुकडे असते. हातपाय काटकुळे असून त्याच्या बोटांवर नखे असतात; परंतु पायाच्या दुसऱ्या बोटावर नखांऐवजी नखर असते. शेपूट अवशेषांगाच्या स्वरूपात असून ते केसांमध्ये दडलेले असते.
लाजवंती प्राणी निशाचर आणि वृक्षवासी आहे. दिवसा तो आपले डोके हातापायांत खुपसून, शरीराचा चेंडू करून व झाडाची फांदी घट्ट पकडून झोपलेला असतो. रात्री तो फांद्या घट्ट पकडून हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातो. काही वेळा तो हातापायांवर रांगतो. तो उड्या मारत नाही. कीटक, बेडूक, सरडे, पाली, पक्षी व अंडी यांवर तो उपजीविका करतो. मादीचा गर्भावधी सहा महिन्यांचा असतो. ती एका खेपेला एकाच पिलाला जन्म देते.
लाजवंतीची अजून एक जाती आढळते. तिला मंद लाजवंती (निक्टिसेबस बेंगालेन्सिस ) म्हणतात. भारतात ईशान्येकडील सर्व राज्ये आणि बांगला देश ते फिलिपीन्सपर्यंत ही जाती दिसून येते. त्याची शरीररचना आणि सवयी लाजवंतीसारख्या असतात. मात्र त्याच्या हालचाली मंद असतात.