एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंहत द्रावणाकडे होणारे वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदा., वनस्पती परासरणाद्वारे जमिनीतील पाणी मुळांमार्फत शोषून घेतात. प्राण्यांमध्ये पेशी आणि शरीरद्रव्ये (पेशीद्रव्य) यांच्यातील पोषक द्रव्यांचे आणि पाण्याचे वहन परासरणामुळे घडून येते. औद्योगिक क्षेत्रात पाणी शुद्धीकरणासाठी आणि अन्न परिरक्षणासाठी व्युत्क्रमी परासरणाची प्रक्रिया वापरतात.

(अ) परासरण प्रक्रिया: डाव्या चंचुपात्रातील परीक्षानळीत अर्धपार्य पटलातून पाणी आत शिरते. उजव्या चंचुपात्रात पाणी साखरेच्या द्रावणात मिसळते तसतसे परीक्षानळीत द्रावणाची पातळी वाढते.
(ब) पाण्याचे रेणू अर्धपार्य पटलातून आरपार जातात. परंतु साखरेचे रेणू आकाराने मोठे असल्यामुळे ते अर्धपार्य पटलातून जात नाहीत. त्यामुळे परीक्षानळीतील साखरेच्या द्रावणाची पातळी वाढते.

साखरेच्या द्रावणात साखर पाण्यात विरघळलेली असते. जर अर्धपार्य पटलाच्या एका बाजूला साखरेचे द्रावण आणि दुसऱ्या बाजूला शुद्ध पाणी ठेवले, तर शुद्ध पाणी अर्धपार्य पटलातून साखरेच्या द्रावणाकडे वाहते. त्यामुळे साखरेच्या द्रावणाचे आकारमान वाढते आणि संहती कमी होते. जोपर्यंत अर्धपार्य पटलाच्या दोन्ही बाजूंचे द्रावण सारख्या संहतीचे होत नाही तोपर्यंत पाणी साखरेच्या द्रावणाकडे वाहत राहते. जर साखरेच्या द्रावणावर दाब दिला तर साखरेच्या द्रावणाकडे होणारा पाण्याचा प्रवाह रोखता येतो. या दाबाला परासरण दाब म्हणतात.

सर्व सजीवांमध्ये परासरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. सर्व पेशी आणि पेशीतील अंगके अर्धपार्य पटलाने वेढलेली असतात. सामान्यपणे जैविक पटलांमधून पाणी कमीजास्त आणि इतर लहान रेणू [ऑक्सिजन (O2) , कार्बन डायऑक्साइड (CO2) , नायट्रोजन (N2) , नायट्रिक ऑक्साइड (NO)] कमीजास्त प्रमाणात आरपार वाहत असतात. मात्र, ज्या पदार्थांचा रेणुभार काही हजारांहून जास्त आहे अशा पदार्थांना (काही आयने, प्रथिने आणि बहुशर्करा) हे अर्धपार्य पटल अडवून धरते. म्हणजेच पेशी किंवा अंगकात काय आत शिरावे आणि बाहेर पडावे, हे परासरणाद्वारे निश्चित आणि नियंत्रित केले जाते.

प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशी साखरेच्या किंवा मिठाच्या द्रावणात ठेवून त्यांवर होणारा परिणाम पाहता येतो. जर द्रावण विरल असेल म्हणजेच पेशीच्या तुलनेत द्रावणात पाण्याचे प्रमाण अधिक असेल (अवपरासरणी द्रावण), तर पेशींमध्ये पाणी शिरते आणि पेशी फुगतात. क्वचित प्रसंगी पेशीपटलाला भेद जातो. याउलट, द्रावण संहत असेल म्हणजे पेशीच्या तुलनेत द्रावणात पाण्याचे प्रमाण कमी असेल (अतिपरासरणी द्रावण) ,तर पेशींमधून पाणी बाहेर पडते आणि पेशी सुरकुततात. समपरासरणी द्रावणात पेशींमध्ये कोणताही बदल होत नाही. सामान्यपणे, परासरणाद्वारे प्राणी पेशींचा आकार बदलतो आणि त्या फुटतात. सस्तन प्राण्यांच्या पेशींसाठी ०.९% सोडियम क्लोराइडाचे द्रावण समपरासरणी असल्यामुळे सलाईनची (लवणद्रावाची) संहती ०.९% एवढी असते. याउलट, वनस्पतींच्या पेशीभित्तिका मजबूत सेल्यूलोजाच्या बनलेल्या असतात आणि त्या मोठा दाब सहन करू शकतात. जीवाणूंच्या पेशीभित्तिकेची जाडी ही प्राणी पेशीपटल आणि वनस्पती पेशीभित्तिका यांच्या दरम्यान असते. म्हणून जीवाणू ०.५–३% अशी संहती असलेल्या क्षारयुक्त द्रावणात जिवंत राहतात. परासरणामुळे सजीवांवर घातक परिणाम होऊ शकतात. ताज्या पाण्यातील किंवा जलजीवालयातील मासे वेगळ्या क्षारतेच्या पाण्यात ठेवले तर ते पटकन मरतात. जळवा किंवा गोगलगायी मारण्यासाठी केला जाणारा मिठाचा वापर हे परासरणाचे उदाहरण आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी आणि इतर कामांसाठी व्युत्क्रमी परासरण प्रक्रियेचा वापर करतात. सामान्य परासरणामध्ये, साधे पाणी आणि समुद्राचे पाणी यांच्यात अर्धपार्य पटल ठेवले असता साधे पाणी समुद्राच्या पाण्याकडे वाहते. परंतु, व्युत्क्रमी परासरणामध्ये समुद्राच्या पाण्यावर दाब देऊन पाण्याच्या प्रवाहाची दिशा याउलट करता येते आणि समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी मिळविता येते. मोठमोठ्या जहाजांवर पाणी शुद्ध करण्यासाठी अशा प्रकारची उपकरणे असतात.