बेसाल्ट खडक हा भूपृष्ठावर सर्वात विपुलपणे आढळतो. हा गडद रंगाचा, घट्ट, अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) आणि कॅल्शियम, लोह व मॅग्नेशियम यांचे प्रमाण सापेक्षतः जास्त असलेल्या महासागराच्या खोल तळातील लाव्हारसापासून थिजलेल्या अग्निज ज्वालामुखीय खडकांचा गट आहे.

स्तंभीय बेसाल्ट, सेंट मेरी बेटे, उडुपी.

लाव्हा कोणत्या स्थितीत व कसा थंड झाला यांनुसार बेसाल्टातील विविध संरचना, वयन/पोत व खनिजांचे स्वरूप पाहावयास मिळतात. उदा., जलदपणे थंड झालेला लाव्हा खडक सूक्ष्मस्फटिकी होतो, तर सावकाश थंड झालेल्या लाव्हा खडकांत चांगले व मोठे स्फटिक तयार होतात. पृष्ठावर थंड होताना लाव्हा थरांचे आकुंचन होते, त्यामुळे त्याच्या पृष्ठीय भागातील थरात आकुंचन दिशेच्या काटकोनात संधी तयार होतात. लाव्हा थर थंड होताना त्यावेळच्या भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया परिस्थितीनुसार किती प्रमाणात आणि किती अंतरावर ही आकुंचन केंद्रे निर्माण होणार; त्यानुसार त्यांच्यामध्ये विविध कोनीय (३ ते ९ बाजूंचे) आणि अनेक आकारमानांचे स्तंभीय संधीचे जाळे निर्माण होते. सामान्यतः ते पंचकोनी/षट्कोनी असतात. पूर्णता अनुकूल परिस्थितीत पृष्ठीय संधीजोड, खोलीवर, लाव्हा थरांच्या अंतर्भागातही म्हणजे उभे/स्तंभीय संधी (तडे) (Columnar Joints) निर्माण करीत खोलवर जात सावकाश थंड होतात. या प्रक्रियेमुळे लाव्हाप्रवाहात स्तंभाकार संरचना (Columnar Structure) तयार होते. महाराष्ट्रातील डोंगरदर्‍यांतून आढळणार्‍या कित्येक लाव्हा थरांतील बेसाल्टांचे हे वैशिष्ट्य आहे. बहुतांशी वेळा हे क्षीण, छोट्या आकारात आणि कमी प्रमाणात राहतात, परंतु पुरा भूशास्त्रीय अनुकूल स्थितीत फक्त काहीच ठिकाणी त्यांचे विस्तृत प्रमाणात पृष्ठावर पसरलेले आणि जमिनीअंतर्गत खोलीत अथवा डोंगराळ भागात उंचावर आढळणारे असे छोट्या- मोठ्या आकारांचे, सपाटी भाग असणारे आणि मोठ्या प्रमाणात आरेखित आणि रेखीव नैसर्गिक स्तंभ निर्माण झालेले दिसतात.

अशा प्रकारचे विविध कोनीय, मोठ्या आकारांचे, आकर्षक आणि उत्तम शिल्पीय नमुना भासणारे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक असलेले स्तंभीय बेसाल्ट हे उडुपी (कर्नाटक) शहरापासून ६ किमी. अंतरावर असलेल्या पश्चिम समुद्रकिनारपट्टीवरील मालपे गावापासून जवळ असलेल्या समुद्रातील ४ छोट्या बेटांच्या सेंट मेरी बेटावर (येथे नारळाची झाडे विपुल प्रमाणात असल्याने नारळी बेटे (Coconut Island) म्हणूनही ते ओळखले जातात) पाहावयास मिळतात.

हे स्तंभीय बेसाल्ट भारतीय उपखंडातील पश्चिमी भागात मुख्यतः महाराष्ट्र आणि त्याच्या आजूबाजूच्या परिक्षेत्रातील राज्यांच्या काही भागातून सु. ५ लाख चौ.किमी. भागात पसरलेल्या आणि सु. ५५ ते ६५ द.ल. वर्षांपूर्वी – क्रिटेशिअस – इओसीन या भूशास्त्रीय कालखंडात भेगीय ज्वालामुखीय उद्रेकातून (Volcanic Fissure Eruption) तयार झालेल्या दक्खन पठारी बेसाल्ट संचचा (Deccan Plateau Basalt Formations) भाग आहेत.

उडुपी शहर हे राष्ट्रीय/राज्य रस्ते महामार्गाने भारतातील सर्व प्रमुख शहरांशी (मुंबई आणि तिरुअनंतपुरम् रेल्वे मार्गाने) जोडलेले आहे. याच्या साधारण आग्नेय दिशेला ६० किमी. वर असलेल्या मंगलोर येथे जवळचे विमानतळ आहे.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.