मुद्रांमध्ये काही मुद्रा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांशी संबंधित आहेत. प्रत्येक बोट एकेका तत्त्वाशी निगडित आहे असे मानून विशिष्ट बोटांच्या जुळणीनुसार या मुद्रांचे वर्गीकरण करण्यात येते. पंचतत्त्वांशी संबंधित मुद्रा पुढीलप्रमाणे आहेत —
पृथ्वी मुद्रा : पृथ्वी तत्त्वाशी निगडित असलेल्या अनामिकेचे टोक अंगठ्याच्या टोकाशी जुळवावे. इतर बोटे सरळ ठेवावीत. या मुद्रेच्या अभ्यासाने शारीरिक अशक्तपणा, वजन कमी-जास्त होणे याप्रकारच्या समस्या दूर होतात. पचनशक्ती वाढते, शरीरात स्फूर्ती, कांती व तेज येते. सात्त्विक गुण वाढीस लागतात.
वरुण मुद्रा : जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या करंगळीचे (कनिष्ठा) टोक अंगठ्याच्या टोकाशी एकत्र जुळविण्याने ही मुद्रा तयार होते. बाकी बोटे सरळ ठेवावीत. शरीरातील जलतत्त्वाचे संतुलन राखण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. परिणामी त्वचेचा रूक्षपणा कमी होऊन त्वचा मुलायम व तेजस्वी दिसते. त्वचारोग, चेहेऱ्यावरील मुरूम व पुटकुळ्या तसेच जलतत्त्वाच्या कमतरतेमुळे उत्पन्न होणाऱ्या इतरही विकारांवर या मुद्रेचा चांगला परिणाम होतो. मात्र कफ-प्रकृती असलेल्यांनी ही मुद्रा जास्त प्रमाणात करू नये.
सूर्य मुद्रा : अनामिका अंगठ्याच्या मुळाशी ठेऊन अंगठ्याने अनामिकेवर दाब द्यावा. ही मुद्रा शरीराचे संतुलन साधते. या मुद्रेने लठ्ठपणा किंवा वजन कमी होणे, मधुमेह व यकृताचे विकार दूर होणे इत्यादी लाभ होतात. शरीरात उष्णता निर्माण होऊन पचनशक्ती वाढते. ताणतणाव कमी होतो. ही मुद्रा शक्तिवर्धक असली तरीही फारच अशक्त असलेल्या लोकांनी ती करू नये. तसेच उन्हाळ्यात ही मुद्रा शक्यतो करू नये.
वायु मुद्रा : वायू तत्त्वाशी निगडित अशा तर्जनीचे टोक अग्नितत्त्वाशी निगडित अशा अंगठ्याच्या मुळाशी जुळवावे व बाकी बोटे सरळ उभी ठेवावीत. ही वायु मुद्रा होय. या मुद्रेमुळे संधिवात, कंपवात, सायटिका, गुडघेदुखी, आमवात इत्यादी वातसंबंधित विकार आणि मानेचे दुखणे इत्यादी समस्या दूर होतात; तसेच रक्ताभिसरणही सुधारते.
अपान मुद्रा : शरीरातील अपान वायूवर नियंत्रण ठेवणारी ही मुद्रा करताना अंगठा, मधले बोट (मध्यमा) व अनामिका यांची टोके एकत्र जुळवावीत. तर्जनी व करंगळी सरळ ठेवावी. या मुद्रेमुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते व त्यामुळे शरीर स्वच्छ होते. मूत्रावरोध, मूळव्याध, पोटातील वायुविकार, गुदादोष इत्यादी दूर होतात. तसेच मधुमेह, हृदयरोग व दातांचे विकार यांमध्येही अपान मुद्रा लाभकारक ठरते. या मुद्रेमुळे घाम जास्त येतो तसेच लघवीही जास्त प्रमाणात होऊ शकते.
प्राण मुद्रा : यात करंगळी, अनामिका व अंगठा एकत्र जोडावेत. तर्जनी व मधले बोट सरळ ठेवावे. प्राण मुद्रेमुळे शरीरात असलेली सुप्त प्राणशक्ती जागृत होते. स्फूर्ती, ऊर्जा व आरोग्य प्राप्त होते. डोळ्यांचे तेज वाढणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे, जीवनसत्त्वांची कमतरता तसेच थकवा दूर होणे इत्यादी लाभ होतात. भूक-तहान यांवर नियंत्रण येते. निद्रानाशावर उपाय म्हणून यासोबत ज्ञान मुद्रा करणे लाभकारक ठरते.
शून्य मुद्रा : ही मुद्रा मधल्या बोटाशी निगडीत आहे. मधले बोट हे आकाश तत्त्वाचे म्हणजेच शून्य मंडलाचे प्रतिनिधित्व करते. ही मुद्रा करताना मधले बोट अंगठ्याच्या मुळाशी ठेऊन अंगठ्याने मधल्या बोटावर हलकासा दाब द्यावा. इतर बोटे सरळ ठेवावीत. कानाचे दुखणे, कान वाहणे, बहिरेपणा इत्यादी कानाशी संबंधित विकार बरे होण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हाडांचा अशक्तपणा, हृदयरोग, गळ्याचे आजार, गलग्रंथी (थायरॉइडचा) त्रास इत्यादी दूर होण्यास मदत होते. हिरड्या मजबूत होतात. अर्थात त्यासाठी या मुद्रेचा रोज एखादा तास याप्रमाणे दीर्घकालीन सराव आवश्यक आहे. जेवताना वा चालताना ही मुद्रा करू नये.
शारीरिक शक्ती आणि पंचतत्त्वांतील सूक्ष्मशक्ती यांचा संयोग होऊन साधकाच्या संकल्पशक्तीनुसार फळ मिळण्यास या मुद्रांमुळे साहाय्य होते.
पहा : मुद्रा.
समीक्षक : प्राची पाठक