योनिमुद्रा ही योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा आहे. योनी ह्या शब्दाने गर्भाशयाचा किंवा उत्पत्ती स्थळाचा बोध होतो. योनीमुद्रेच्या साधनेने साधक निर्मितीक्षम अशा आदिम शक्तीला जागृत वा उद्दीपित करीत असतो. योनिमुद्रेची साधना साधकाला योगी वा योगिनी ह्या पदापर्यंत घेऊन जाते (कुलार्णव तंत्र  १७.२१,३१). योगग्रंथांमध्ये योनिमुद्रा पुढीलप्रमाणे वर्णिली आहे —

योनिमुद्रा

सुखकारक अशा ध्यानयोग्य आसनात बसावे. हातांची सर्व बोटे सरळ ठेवून टोके आतल्या बाजूने एकमेकांना जोडावीत. तर्जनी व अंगठे ह्यांचा त्रिकोणाकार करून बाकी सर्व बोटे आतल्या बाजूने वळवून एकमेकांत घट्ट गुंफावीत. त्यांच्या टोकांच्या आतल्या बाजू एकमेकींना चिकटलेल्या असाव्यात. जुळवलेले दोन्ही अंगठे शरीराच्या दिशेने तर तर्जनी विरुद्ध दिशेने असावी. क्वचित ही मुद्रा करताना बाकी बोटे आत न वळविता सरळ ठेवूनच एकमेकांत गुंफली जातात.

ह्या मुद्रेत सर्वच बोटांच्या एकमेकांत गुंफण्याने शरीरातील प्राणशक्ती वा ऊर्जा शरीराच्या बाहेर पडत नाही आणि ती पूर्णपणे शरीराच्या आतच अडविली जाते. मुद्रा करताना हातांचे कोपरे शरीराच्या दोन्ही बाजूला ताणले गेल्याने छातीचा भाग मोकळा होऊन श्वसन सुलभ व सहज होते.

उजव्या व डाव्या हाताच्या बंधामुळे ऊर्जा परस्पर विरुद्ध दिशेने प्रवाहित होऊन मेंदूतील उजव्या व डाव्या भागातील क्रियांचे संतुलन होते. परिणामी ह्या प्रक्रियेत मेंदूच्या उजव्या व डाव्या अशा दोन्ही भागातील क्रिया संतुलित केल्या जातात. तसेच दोन्ही फुप्फुसे उद्दीपित होऊन दोन्ही नाकपुड्यांमधील प्राणाचा प्रवाह संतुलित होतो. जुळवलेल्या तर्जनी व अंगठ्यांमुळे प्राणशक्ती अधिक प्रमाणात प्रवाहित होते. शरीर व मन अधिक स्थिर होतात. त्यामुळे ध्यान-धारणेसाठी अनुकूलता येते. हृदय हे आध्यात्मिक अनुभवाचे ठिकाण होय. तेथे अधिक प्राणपुरवठा झाल्यामुळे हा अनुभव येण्यास साहाय्य होते.

समीक्षक : मकरंद गोरे