जोशी, महादेवशास्त्री : (१२ जानेवारी १९०६ – १२ डिसेंबर१९९२). भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी लेखक. गोमंतकाच्या सत्तरी विभागातील आंबेडे ह्या गावी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण त्यांनी घेतले नाही. तथापि पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण, काव्यशास्त्र तसेच ज्योतिष ह्या विषयांचे अध्ययन आंबेडे, धावे आणि सांगली येथे केले. त्यानंतर १९२६ साली ‘सत्तरी शिक्षण संस्था’ स्थापन करून त्यांनी स्वतःला शिक्षणप्रसारास वाहून घेतले.
१९३५ मध्ये ते पुण्यास आले; तेथे पुराणे-प्रवचने करू लागले. १९३८ पासून भक्तिज्ञानवैराग्यादी विषयांना वाहिलेल्या चैतन्य ह्या मासिकाचे सहसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. ह्याच नियतकालिकात १९३४ मध्ये ‘राण्यांचे बंड’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले. वेल विस्तार हा पहिला कथासंग्रह १९४१ मध्ये प्रकाशित झाला. १९५७ पर्यंत त्यांचे एकूण दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले. खडकांतले पाझर (१९४८), विराणी (१९५०), घररिघी (१९५५) हे त्यांपैकी काही होत. त्यांच्या अनेक कथा गोमंतकीय जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत. साधी, सोपी पण भावोत्कट भाषा आणि आकर्षक निवेदनशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. जीवनाकडे पाहण्याचा एक प्रसन्न, सोज्वळ दृष्टिकोण त्यातून प्रत्ययास येतो. त्यांच्या काही कथांवर मराठीत चित्रपट काढण्यात आलेले आहेत; काही कथांचे हिंदी अनुवादही झालेले आहेत. विविध भारतीय भाषांतील, तसेच परभाषांतील संस्कृतिविषयक ग्रंथांचे आलोडन करून दशखंडात्मक भारतीय संस्कृतिकोश त्यांनी निर्माण केला. १९६२ ते १९७४ ह्या कालखंडांत ह्या कोशाचे एकूण आठ खंड प्रसिद्ध झाले होते. भारतीय संस्कृतीच्या विविध अंगोपांगांची उपयुक्त माहिती त्यांत संगृहीत झालेली आहे. पुढील दोन खंडांचे कार्यही त्यांनी अल्पावधीत केले.
भारतातील विविध प्रदेश, तीर्थक्षेत्रे, लोककथा, कर्तृत्ववान व्यक्ती ह्यांसंबंधी स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. भारतदर्शन त्यांची प्रवासवर्णनमाला होय. त्यांची ग्रंथसंपदा चाळीसाहून अधिक भरेल.