महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील किल्ला. हा नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सु. ४० किमी., तसेच इगतपुरीपासून सु. ४५ किमी. अंतरावर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ११२० मी. आहे. हा किल्ला हरिहर या नावाने सुद्धा ओळखला जातो.

हर्षगड, नाशिक.

किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग हा किल्ल्याच्या पश्चिमेकडे पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावातून जातो. निरगुडपाडा हे नाशिक–त्र्यंबकेश्वर–खोडाळा मार्गावर असून त्र्यंबकेश्वरपासून २० किमी. अंतरावर आहे. नीरगुडपाडा गावातून एका छोट्या वाटेने अडीच तासाच्या चढाईने किल्ल्यावर जाता येते.

कातळात खोदलेल्या पायऱ्या, हर्षगड, नाशिक.

दूसरा मार्ग हा मुंबई–नाशिक महामार्गावरील घोटी बुद्रुक या गावापासून घोटी–वैतरणा–टाके हर्ष असा आहे. घोटी–टाके हर्ष हे अंतर सु. ३५ किमी. आहे. टाके हर्ष हे हर्षगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पायथ्याचे गाव आहे. या गावातून दोन तासांच्या चढाईनंतर किल्ल्यावर पोहोचता येते. ही वाट नीरगुडपाडा गावातून येणाऱ्या वाटेपेक्षा तुलनेने सोपी आणि प्रशस्त आहे. नीरगुडपाडा आणि टाके हर्ष या दोन्ही गावांतून येणाऱ्या वाटा या हर्षगडाच्या मध्यावर असलेल्या एका पठारावर एकत्र येतात. तेथून एक ठळक पायवाट हर्षगड किल्ल्याच्या पायऱ्यांच्या दिशेने जाते. गडाच्या मध्यावर असलेल्या पठारावर देवाचे स्थान आहे. गडाच्या मेटाचा हा भाग असण्याची शक्यता आहे. थोडी चढाई करून पुढे गेल्यावर हर्षगडाचे मुख्य आकर्षण असलेल्या, कातळात कोरलेल्या, पायऱ्या दिसतात. सदर पायऱ्या अखंड कातळात असून प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूंस हाताने आधार घेऊन चढण्यासाठी खोबण्या कोरलेल्या आहेत. हा दगडी पायऱ्यांचा जिना अतिशय खडा असून याच्या टोकाला गडाचा पहिला दरवाजा बांधला आहे. दरवाजाच्या बाजूला दोन छोटे बुरूज आहेत. दरवाजातून आत आल्यावर इंग्रजी सी आकाराची कातळात कोरलेली वाट दिसते. उजव्या बाजूस कातळ व डाव्या बाजूस दरी अशी ही थोडीशी अरुंद वाट असून या वाटेने पुढे गेल्यावर आणखी एक दगडात कोरलेला जिना दिसतो. या जिन्याच्या पायऱ्या सुद्धा अरुंद आणि प्रत्येक पायरीच्या बाजूला खोबण्या आहेत. हा जिना थोडा वळणावळणाचा असून एकदम खडा आहे. जिन्याचा शेवटचा टप्पा एक कातळ बोगदा असून याच्या शेवटी गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार कमानयुक्त असून याचे काही बांधकाम हे विटांचे आहे.

पायऱ्यांच्या शेवटी बांधलेला दरवाजा, हर्षगड, नाशिक.

या दरवाजातून गडावर प्रवेश होतो. दरवाजातून आत एक पाऊलवाट दिसून येते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कड्याच्या बाजूला एक खोदीव खोल चौकोनी विहीर सदृश्य वास्तू आहे. यामधे उतरण्यासाठी कुठलीही सोय नाही. गडाच्या उत्तरपूर्व दिशेने सरळ गेल्यावर एक पाण्याचा तलाव दिसतो. या तलावाला एका बाजूने भिंत बांधून काढली आहे. या तलावाच्या जवळ एक छोटेखानी हनुमानाचे मंदिर आहे. तलावाच्या काठावर उघड्यावर एक शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. तलावाच्या उजव्या बाजूस मध्यावर एक छोटी टेकडी आहे. या टेकडीचा माथा हे गडाचे सर्वांत उंच ठिकाण आहे. तलावापासून पाऊलवाटेने तसेच पूर्वेकडे गेल्यावर गडाच्या उत्तरपूर्व टोकाजवळ एक छोटी बंदिस्त दगडी कोठीवजा इमारत आहे. याला छोटे खिडकीसारखे प्रवेशद्वार असून यात दोन खोल्या आहेत. काही अभ्यासकांच्या मते, हे दारूगोळ्याचे कोठार आहे. पण याबाबतचा तसा काही खातरीशीर पुरावा नाही. या दगडी वास्तूच्या बाजूला कातळात कोरलेली पाण्याची चार ते पाच टाकी आहेत. गडावर या व्यतिरिक्त ठळक असे कोणतेही अवशेष दिसून येत नाहीत.

कोठार आणि टाकी, हर्षगड, नाशिक.

हर्षगडाचा आकार त्रिकोणी असुन माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी आहे. गडाला तिन्ही बाजूंनी नैसर्गिक ताशीव कातळकडे लाभले असल्यामुळे गडाला फारशी तटबंदी नाही. गडाच्या उत्तर बाजूचा कडा हा त्यामधील एका भेगेतून कातळरोहण करून चढता येतो. डगस्कॉट या प्रसिद्ध इंग्रज गिर्यारोहकाने हा कडा प्रथम सर केला, म्हणून या कड्याला स्कॉटिश कडा असे म्हणतात.

सय्यद अली तबातबा लिखित बुर्हान इ मासिर  या मध्ययुगीन फार्सी ग्रंथात हर्षगड किल्ल्याचा उल्लेख येतो. बुऱ्हान निझामशाह (१५१२–१५५३) याने जिंकून घेतलेल्या किल्ल्यांच्या यादीत ‘हारीस’ असा हर्षगडाचा उल्लेख केला आहे. उत्तर कोकण व नाशिक परिसरातील किल्ले हे दीर्घकाळ अहमदनगरच्या सत्तेच्या अंमलाखाली होते. १६३६ साली शहाजीराजांनी हर्षगड किल्ल्याचा ताबा घेतला होता; परंतु पुढे मोगली आक्रमणात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे (पंतप्रधान) मोरोपंत पिंगळे यांनी काढलेल्या उत्तर कोकण मोहिमेत त्यांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकून स्वराज्यात दाखल केला.

पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत (१६८१–१७०७ ) १६८९ साली मोगल सरदार मातब्बरखान याने हर्षगड हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली इंग्रजांनी मराठा साम्राज्य नष्ट केले. त्या वेळी इंग्रजांनी मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान इंग्रज कॅप्टन ब्रिग्ज याने हर्षगड किल्ला जिंकून घेतला. यावेळी इतर किल्ल्याप्रमाणे त्याने हर्षगडचा विध्वंस न करता गडाच्या पायऱ्या शाबूत ठेवल्या. हर्षगडाच्या या पायऱ्यांचे वर्णन कॅप्टन ब्रिग्ज याने पुढीलप्रमाणे केले आहे : ‘या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणं कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात.’

संदर्भ :

  • कुंटे, भ. ग. अहमदनगरची निजामशाही, मुरली प्रकाशन, मुंबई, १९६२.
  • पाळंदे, आनंद, डोंगरमैत्री, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००६.
  • मांडे, प्रमोद, गड किल्ले महाराष्ट्राचे, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २००८.

  समीक्षक : अंकुर काणे