क्वाटर्नरी युग (चतुर्थ कल्प) : (२.५ दशलक्ष वर्षपूर्व ते आजपर्यंत). भूशास्त्रात पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचा इतिहास अनेक महाकल्प आणि युगे यांत विभागला गेला आहे. जागतिक स्तररचना आयोगाने (International Commission on Stratigraphy) भूशास्त्रीय कालखंडाची रूपरेषा दिली आहे. त्यानुसार क्वाटर्नरी युग हे सेनोझोइक या अंतिम महाकल्पातील शेवटचे आणि सर्वांत लहान युग आहे. हे युग २.५८८ ± ०.००५ दशलक्ष वर्षपूर्व ते आजपर्यंत एवढ्या कालावधीचे आहे.

भूशास्त्रानुसार हा कालखंड दोन भागांत विभागला आहे : प्लायस्टोसीन (Pleistocene) हा काळ २५ लाख ते ११,७०० वर्षांपूर्वीचा आणि होलोसीन (Holocene) हा ११,७०० ते आजपर्यंतचा काळ. प्लायस्टोसीन कालखंडाची तीन विभागांत विभागणी केली जाते :

१. आद्य प्लायस्टोसीन (२५ लाख वर्षपूर्व ते ७,८०,००० वर्षपूर्व)

२. मध्य प्लायस्टोसीन (७,८०,००० वर्षपूर्व ते १,३०,००० वर्षपूर्व)

३. उत्तर प्लायस्टोसीन (१,३०,००० वर्षपूर्व ते ११,७०० वर्षपूर्व)

क्वाटर्नरी युग हे हिमयुगांचे युग म्हणूनही ओळखले जाते. क्वाटर्नरी काळाच्या सुरुवातीला पृथ्वीवरील सर्व खंड हे आज जेथे आहेत तेथेच होते. या काळातील प्रत्येक हिमयुग साधारणपणे १ लाख वर्षे अस्तित्वात होते, तर आंतरहिमयुग हे १० ते १५ हजार वर्षे टिकायचे. क्वाटर्नरी काळात हिमयुग आणि त्या पश्चात येणारे आंतरहिमयुग अशा तऱ्हेचा चक्रीय आकृतीबंध दिसतो. शेवटचे हिमयुग दहा हजार वर्षांपूर्वी संपले.

हिमयुगांमुळे क्वाटर्नरी काळात पृथ्वीच्या हवामानात अनेकदा तीव्र स्वरूपाचे चढ उतार झाले. यावर आधारित क्वाटर्नरी काळाचे वैशिष्ट्य म्हणजे तापमानातील तीव्र बदलांमुळे खंडीय बर्फाचे प्रसरण आणि आकुंचन होऊन पृथ्वीचे हवामान चक्राकार रूपात थंड आणि उष्ण होत राहिले. त्यामुळे पृथ्वीतलावर वारंवार अनेकविध बदल झाले, जसे काही प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती लुप्त/नष्ट झाल्या. तसेच पृथ्वीवरील भूरूपे झपाट्याने बदलत गेली. तापमानातील तीव्र चढ-उतारांमुळे पृथ्वीवर अनेक नैसर्गिक घडामोडी घडत होत्या. हिमयुगात पृथ्वीवरील पाण्याचे बर्फात रूपांतर होऊन नद्यांचे प्रवाह आटले, समुद्र पातळी खोल गेली, या सर्वांमुळे अन्नसाधने बदलली.

क्वाटर्नरी युग हे मानवी उत्कांतीचे आणि संस्कृतीचे युग असेही म्हटले जाते. पुरातत्त्वीय दृष्टीने हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्या सुरुवातीच्या काळात मानवी उत्क्रांतीचे अनेक टप्पे पार पडले आणि त्यांतून विविध प्रकारचे मानव उत्क्रांत झाले. याच काळात मानवाने दगडी हत्यारे विकसित करण्यास सुरुवात केली. या बरोबरच या काळात विविध प्रकारच्या संस्कृती उदयास आल्या. मानवी इतिहास हा तीन कालखंडांत विभागला गेला आहे:

१. प्रागैतिहासिक काळ : ज्या काळात मानवाला लेखनकला अवगत नव्हती, त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. यात अश्मयुग, ताम्रपाषाण युग आणि लोहयुग यांचा समावेश होतो. या काळात मानव समूह प्रामुख्याने शिकार करणे, दगडी हत्यारांचा वापर करणे आणि भटके जीवन जगत होते. या काळातील मानवी संस्कृतीचे अवलोकन प्रामुख्याने दगडी हत्यारे, पुरामानवाचे अश्मीभूत सांगाडे, प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष अशा अनेक भौतिक पुराव्यांमुळे होते.

२. आद्य ऐतिहासिक काळ : हा एक लहान काळ असून यात मानवाने शेतीची सुरुवात केली आणि वसाहत करण्यास सुरुवात करून स्थिर जीवन जगण्याची सुरुवात केली.

३. ऐतिहासिक काळ : या काळात मानवाने लेखनकला अवगत केली. त्यामुळे या काळाची माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.

संदर्भ :

  • Head, Martin; Gibbard, Philip & Salvador, Anwy, ‘The Quaternary: Its character and definitionʼ, Episodes 31, 234. 10.18814/epiiugs/2008/v31i2/009, 2008.
  • Oches, E. A. ‘Quaternary Historyʼ, (Ed., Cilek, Vaclav) Earth system: history and natural variability, Vol. II, Encyclopedia of Life Support Systems (EOLSS), 2009.

                                                                                                                                                                             समीक्षक : शरद राजगुरू