नारायणसिंह : (१७९५–१० डिसेंबर १८५७). छत्तीसगडमधील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक. त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सोनाखानमध्ये आदिवासी भागात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामराय होते. ते सोनाखानचे मोठे जमीनदार होते. त्यांनी इंग्रजांविरोधात १८१८ मध्ये दोन हात केले होते, मात्र नंतर त्यांना जमीनदार असल्याने माघार घ्यावी लागली. १७ व्या शतकात सोनाखान राज्याची स्थापना झाली. त्यांचे पूर्वज सारंगढ जमीनदारांचे वंशज होते. सोनाखानचे प्राचीन नाव सिंघगढ होते. रामराय यांनी आदिवासी समुदायाच्या साथीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १८३० मध्ये ते मरण पावले. नंतर नारायणसिंह हे सोनाखानचे जमीनदार झाले. प्रजेची सेवा करण्यासाठी ते नेहमी तत्पर होते. एका नरभक्षी वाघाला त्यांनी आपल्या बहादुरीने ठार केले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘वीरʼ ही पदवी बहाल केली. तेव्हापासून ते ‘वीर नारायणसिंह बिंझवार’ या नावाने प्रसिद्ध झाले. बिंझवार ही गोंड जातीची आदिवासी वस्ती होती.
इ. स. १८५६ मध्ये सोनाखानमध्ये मोठा दुष्काळ पडला. सामान्य जनता त्रस्त झाली होती. परंतु नफेबाज आणि शोषक व्यापारी वर्ग आपल्या धान्याची गोदामे बंद करून बसले होते. नारायणसिंह हे सोनाखानमधील सर्वांत मोठे जमीनदार होते. त्यांनी लहान–मोठ्या जमीनदारांकडून धान्य गोळा करून गोरगरिबांना वाटण्यास सुरुवात केली. ते धान्य किती दिवस पुरणार? गोळा केलेले धान्य संपल्यावर पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या जमीनदारीतील एका गावामधल्या माखनलाल नावाच्या बनियाचे फार मोठे धान्यगोदाम होते. तो ते धान्य देत नव्हता, म्हणून नारायणसिंहांनी त्याच्या गोदामाची कुलुपे तोडली व त्या गोदामातील धान्य जनतेत वाटले. त्यांनी गोदाम उघडून रयतेला वाटून टाकल्याचे स्वत:हून लगेच रायपूरच्या आयुक्तास (कमिशनर) कळवले. माखनलालने त्या आयुक्ताकडे नारायणसिंहाविरुद्ध तक्रार नोंदविली. माखनलालच्या तक्रारीची दखल घेऊन त्याने रायपूरच्या उप आयुक्ताला नारायणसिंहाला कैद करण्याचा आदेश दिला. नारायणसिंहांना कैद केले व रायपूरला आणले (२४ ऑक्टोबर १८५६). देशातले धान्य दुष्काळपीडित जनतेला देण्याऐवजी इंग्रज सरकार इतर देशांत निर्यात करीत होते. त्याची जनतेला चीड आली. नफेबाज व साठेबाज व्यापाऱ्यांना इंग्रज पाठीशी घालत असल्यावरून इंग्रज सरकारविरुद्ध जनतेच्या मनात तीव्र असंतोष भडकू लागला. जनतेला दुष्काळात वाचविणाऱ्या नारायणसिंहांना कैदेतून कसे सोडवावे, याचा विचार गावोगावचे प्रमुख करू लागले.
सन १८५७ मध्ये मेरठ–दिल्लीमध्ये देशी पलटणींनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारून दिल्ली ताब्यात घेतल्याच्या आणि बहादुरशाह जफर याला तख्तनशीन केल्याच्या बातम्या रायपूरला येऊन थडकल्या. तेव्हा रायपूरच्या सैनिकांनी नारायणसिंहांना तुरुंगातून सोडवून आपला नेता बनविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे २७ ऑगस्ट १८५७ रोजी नारायणसिंह तुरुंग फोडून निसटले व सोनाखानला जाऊन पोहचले. सोनाखानला पोहचल्यावर नारायणसिंहांनी लगेच ५०० सशस्त्र सैनिकांची फौज तयार केली. सर्व सैनिकांना बंदुका दिल्या. सोनाखानकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर मोर्चेबंदी केली. रायपूरचा उपायुक्त इलियट याने लेफ्टनंट स्मिथ याला सोनाखान येथे जाऊन नारायणसिंहांना अटक करण्याचे आदेश दिले. स्मिथ सैन्यासह सोनाखानकडे निघाला. मटगाव, देवरी व बिलाईगढ येथील जमीनदारांनी आपापले बंदुकधारी सैनिक स्मिथच्या मदतीला दिले. एका घोडेस्वाराने नारायणसिंहांचे एक पत्र स्मिथला दिले, त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘तुम्ही करावयास पाहिजे होते, तेच कार्य मी केले आहे. त्यात मी दोषी कसा?ʼ. घोडेस्वाराने असेही सांगितले की, सोनाखानला तुमचा प्रतिकार करण्यासाठी नारायणसिंहांचे सैन्य तयार आहे.
स्मिथने जेव्हा आपल्या सैनिकांना चढाई करण्याचा आदेश दिला, तेव्हा त्याच्या सैन्यातील ३० देशी शिपायांनी आपल्याच बांधवांवर हल्ला करण्यास नकार दिला. स्मिथचे सैन्य जेव्हा सोनाखानजवळ आले, तेव्हा जवळच्या ओढ्यातून नारायणसिंहांच्या सैन्याने त्याच्यावर जोरदार हल्ला करून त्या सैन्याचा पराभव केला. पण दुसऱ्या बाजूने स्मिथच्या सैन्याच्या एका तुकडीने सोनाखानमध्ये प्रवेश करण्यात यश मिळविले. स्मिथच्या सैन्याने सोनाखानमधील घरे लुटली व त्यांना आगी लावून दिल्या. त्यामुळे नारायणसिंहांच्या काही साथीदारांनी माघार घेतली. हताश होऊन नारायणसिंहांनी स्मिथपुढे शरणागती पत्करली. त्यांना अटक करून स्मिथने आपल्या सैन्यासह रायपूरला आणले. तेथे नारायणसिंहांवर राजद्रोह व विद्रोह केल्याचे आरोप ठेवून करून त्यांना देहान्ताची शिक्षा देण्यात आली.
संदर्भ :
- कसार, जमुनाप्रसाद, छत्तीसगढ के सेनानी शहीद वीर नारायणसिंह, राजकमल प्रकाशन, दिल्ली, २०११.
- झांबरे, स. ध. महान भारतीय क्रांतिकारक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००७.
समीक्षक : अवनीश पाटील