चाफेकर बंधू : प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार होते. दामोदरपंत हे जेष्ठ पुत्र. त्यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी कोकणात झाला. बाळकृष्ण व वासुदेव हे दामोदरपंतांचे कनिष्ठ बंधू. कालांतराने हरिपंत पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. दामोदरपंत व त्यांचे बंधू वडिलांना कीर्तनात साथ देत. दामोदरपंतांनी अनेक तरुण संघटित करून ‘आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांना व्यायामाचा, भाले, तलवारी चालविण्याचा छंद होता. ती शस्त्रेही त्यांनी जमविली होती. त्यांचे बंधू व अन्य काही तरुणही या छंदास लागले. पुढे त्यांनी पिस्तुले मिळवून नेमबाजी करण्यात प्रावीण्य मिळविले. इंग्रज सरकारविषयी त्यांच्या मनात भयंकर असंतोष होता. दामोदर चाफेकर यांनी १६ ऑक्टोबर १८९६ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर डांबर ओतले व त्या पुतळ्याच्या गळ्यात फाटक्या जोड्यांची माळ घातली. पण मुंबईच्या पोलिसांना हे कृत्य करणाऱ्याचा तपास लागला नाही. त्यांना इंग्रजी भाषेचा तिरस्कार होता. त्यामुळेच ते ‘इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध नसून पुतना मावशीचे दूध’ असल्याचे म्हणत. दामोदरपंतांनी छ. शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे रचले.

दामोदरपंत चाफेकर

महाराष्ट्रात १८९६ साली प्लेगची साथ सुरू झाली. पुण्यात ही साथ वेगाने पसरली. अशा वेळी आपले घर रिकामे करून जवळपासच्या माळावर झोपड्या बांधून राहावे लागायचे. सरकारने प्लेगच्या साथीला आळा घालण्याचे योग्य उपाय केले नाहीत. फक्त पुण्यातील घरे रिकामी करून पुण्याबाहेर साथ संपेपर्यंत राहावे, असा आदेश काढला. सरकारने वॉल्टर चार्ल्स रँड नावाच्या अधिकाऱ्याला प्लेग निवारण कार्यासाठी साताऱ्याहून पुण्याला पाठविले. त्याच्याबरोबर गोऱ्या शिपायांची मोठी तुकडी होती. त्या शिपायांनी रँडच्या सांगण्यावरून पुण्यातील घरे ‘साफ’ करण्याचा सपाटा लावला. ते सामान्य लोकांच्या घरातले सोनेनाणे लुटत, तसेच स्त्रियांवर अत्याचारही करत असत. रँड हा पुण्यातल्या जनतेला प्लेगपेक्षाही घातक ठरला. रँडच्या या अत्याचाराविरुद्ध लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी  व मराठा  वृत्तपत्रांमधून टीकेची झोड उठविली. आपल्या मराठा  वृत्तपत्रात लिहिताना टिळक म्हणाले, ‘आजकाल शहरात पसरलेला प्लेग त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक दयाळू आहे.ʼ रँडशाहीच्या या जुलमी कृत्यांचा दामोदरपंत चाफेकरांना राग आला. रँडला संपविल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी ठरविले. रँडचा साथीदार आयहर्स्ट हा सुद्धा त्याच्यासारखाच जुलमी होता.

बाळकृष्ण चाफेकर

चाफेकरांच्या आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळीचे तरुण सभासद दररोज तालमीत बलोपासनेस जात असत. तेथे त्यांची रँडच्या जुलमासंबंधी चर्चा होत असे. दामोदरपंत, त्यांचे भाऊ व सहकाऱ्यांनी रँड, आयहर्स्ट यांना पाहिले होते. त्यांचे चेहरे या मंडळींच्या ओळखीचे झाले होते. दामोदरपंतांनी पिस्तुले मिळविली. त्यांनी व त्यांच्या भावांनी अचूक नेम साधून पिस्तुलांतून गोळ्या झाडण्याचा सराव केला.

२२ जून १८९७ रोजी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाचा हीरकमहोत्सव होता. पुण्याच्या गणेशखिंडीतील गव्हर्नरच्या निवासस्थानी त्या महोत्सवाची तयारी आधीच चालू होती. हे वर्तमानपत्रातून जनतेला समजत होते. गणेश खिंडीत रोषणाई करण्यात आली होती. दारूकामही होणार होते. पुण्याभोवतालच्या टेकड्यांवर होळ्या पेटविण्यात आल्या होत्या. दामोदरपंतांनी आपला लहान भाऊ बाळकृष्ण याला बरोबर घेतले. दोघांजवळ भरलेली पिस्तुले होती. दामोदरपंतांनी आपल्या उपरण्यात तलवारही लपवून नेली. त्यांचे एक सहकारी भिडे हे आधीच समारंभाच्या ठिकाणी गेले होते. भिडे यांचे काम रँड समारंभातून केव्हा परतेल, याची बातमी चाफेकरांना देण्याचे होते. दोघे चाफेकर बंधू गणेशखिंडीच्या रस्त्याच्या कडेच्या झाडीत लपून उभे होते. परवलीचा शब्द ‘गोंद्या आला रे’ असा ठरला होता. मध्यरात्रीचा सुमार होता. दामोदरपंतांनी आपली तलवार शेजारच्या मोरीत लपवून ठेवली होती. ‘गोंद्या आला रे’ हा परवलीचा शब्द चाफेकर बंधूच्या कानी पडला. ते रस्त्यावर अंधारात उभे राहिले. रँडची घोडागाडी जवळ येताच दामोदरपंतांनी त्या गाडीच्या मागच्या पाट्यावर उडी घेतली व रँडच्या पाठीवर पिस्तुलाने गोळी झाडली. रँड ठार झाला. पुन्हा ‘गोंद्या आला रे’ अशी आरोळी ऐकू आली आणि दुसरी घोडागाडीजवळ येताच बाळकृष्णपंतांनी तिच्या मागच्या पाट्यावर उडी घेऊन गाडीतील पुरुषाच्या पाठीत गोळ्या झाडल्या. दारूकाम चालू असल्याने फटाक्यांचे आवाज वरचेवर होत होते. त्यांत पिस्तुलाच्या गोळीबाराचे आवाज सामावून गेले. रँड व आयहर्स्ट ठार झाले.

वासुदेव चाफेकर

दोघे चाफेकर बंधू व भिडे पसार झाले. दामोदरपंत मुंबईस येऊन आपला कीर्तनाचा व्यवसाय करू लागले. बाळकृष्णपंतही फरार झाले. खुन्यांचा तपास लावून देणाऱ्यास वीस हजारांचे बक्षीस इंग्रज सरकारने जाहीर केले. पुण्यात अधिक पोलिस आणण्यात आले. त्यांचा खर्च सरकारने पुणेकरांवर लादला. खुनी कोण याचा तपास सुरू झाला. मुंबईहून पोलिस अधीक्षक ब्रुईन चार पोलिस प्रमुखांसह पुण्यात आला. तो उत्तम मराठी बोलणारा व मोठा बुद्धिमान होता. पोलिस तपासात गणेशखिंडीच्या रस्त्यावरील मोरीत एक तलवार पोलिसांच्या हाती आली. तिला उपरण्याची एक चिंधी चिकटलेली होती.

पुण्यातील गणेश शंकर द्रविडचा भाऊ नीलकंठ द्रविड हा चाफेकरांच्या संघटनेचा सदस्य होता. गणेश द्रविडला चोरीच्या अपराधाबद्दल तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. ब्रुईन त्याला भेटला. कैदेतून सोडण्याच्या व पूर्वीची नोकरी परत देण्याच्या अटींवर त्याने दामोदरपंतांचे नाव सांगितले. संशयित आरोपी म्हणून दामोदरपंतांना मुंबईहून पुण्यात आणण्यात आले. बाळकृष्णपंतांना फरार म्हणून घोषित करण्यात आले. न्यायालयात दामोदरपंतांनी ‘मीच रँडचा खून केला व माझा भाऊ बाळकृष्ण याने आयहर्स्ट याचा खून केलाʼ, असे सांगितले. साक्षीदार म्हणून नीलकंठ द्रविड याची साक्ष महत्त्वाची ठरली. दामोदरपंतांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ते समजताच त्यांची आई बेशुद्ध होऊन मरण पावली. बाळकृष्ण व वासुदेव हे दोघे सव्वा वर्ष अज्ञातवासात राहिले. पुढे वासुदेवरावांना मुंबईत अटक झाली. त्यांना पुण्यात आणून नजरकैदेत ठेवले व त्यांच्याकडून बाळकृष्णांचा पत्ता काढून घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले. या प्रकरणी पुण्यात कित्येक तरुणांना अटकेत ठेवण्यात आले होते. ते बाळकृष्णांच्या मनाला बोचत होते. म्हणून ते स्टीफनसनच्या बंगल्यात हजर झाले. त्यांना लगेच अटक झाली. त्यांच्यावर खटला चालू झाला आणि वासुदेवराव मुक्त झाले.

महादेव रानडे

गणेश व नीलकंठ या द्रविड बंधूंच्यामुळे दामोदरपंतांना फाशी झाली, म्हणून वासुदेवराव व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार करण्याची प्रतिज्ञा केली. सदाशिव पेठेतील मुरलीधर मंदिराच्या गल्लीत द्रविड कुटुंब राहत होते. रात्रीच्या अंधारात वेषांतर करून वासुदेव व महादेव यांनी द्रविड बंधूंना बाहेर बोलावले व तुम्हाला ब्रुईन साहेबांनी ताबडतोब बोलावले आहे, असे त्यांना सांगितले. ते दोघे बंधू त्यांच्याबरोबर चालू लागताच वासुदेव व महादेव यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना ठार केले व ते पसार झाले. हे पोलिसांना समजताच पोलिसांनी पुणे शहराची नाकेबंदी केली. या प्रकरणी कडक तपासणी सुरू झाली. अखेर वासुदेवराव व महादेव यांना पकडण्यात आले. वासुदेवरावांनी न्यायालयात सांगितले की, ‘द्रविड बंधूंची हत्या करून माझ्या भावांचा विश्वासघात करणाऱ्यांचा सूड घेतलाʼ. बाळकृष्णपंतांना फाशीची शिक्षा झालीच होती. तत्पश्चात वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचा साथीदार खंडेराव साठे याला दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. १८ एप्रिल १८९९ रोजी दामोदरपंतांस, १० मे १८९९ रोजी बाळकृष्णपंत, १२ मे १८९९ रोजी वासुदेवराव व महादेव रानडे यांना येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. चाफेकरांचे वडील हरिपंत हे तिघा मुलांच्या अशा मृत्यूच्या धक्क्याने १९०० साली मरण पावले. या क्रांतिकारकांच्या कार्याने पुणे शहर ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या असंतोषाचे प्रमुख केंद्र बनले.

 

 

संदर्भ :

  • ग्रोव्हर, बी. एल.; बेल्हेकर, एन. के. आधुनिक भारताचा इतिहास, एस. चंद पब्लिकेशन, नवी दिल्ली,२००३.
  • खोबरेकर, वि. गो. संपा., हुतात्मा दामोदर हरि चाफेकर यांचे आत्मवृत्त, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९७४.
  • झांबरे, स. ध. महान भारतीय क्रांतिकारक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००७.

                                                                                                                                                                         समीक्षक : अवनीश पाटील