अल्थ्यूजर, लुई पियरे (Althusser, Louis Pierre) : (१६ ऑक्टोबर १९१८ – २२ ऑक्टोबर १९९०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध फ्रेंच संरचनात्मक मार्क्सवादी तत्त्वज्ञ व समाजशास्त्रज्ञ. लुई हे कार्ल मार्क्स यांच्या विचारांचे भाष्यकार व त्यांची पुनर्मांडणी करणारे नवमार्क्सवादी विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत. नवमार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या पायाभरणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लुई यांचा जन्म अल्जीरियातील अल्जियर्सजवळ असलेल्या बर्मांड्रे या उपनगरात आई ल्युसिएन बर्जर व वडील चार्ल्स यांच्या पोटी झाला. लुई यांचे आजोबा मूळ फ्रान्सचे होते; परंतु ते अल्जीरियात राहण्यासाठी आले होते. चार्ल्स हे लष्करात अधिकारी आणि लष्करातील नोकरी सोडल्यानंतर बँकेत व्यवस्थापक होते. इ. स. १९३० मध्ये लुई यांच्या वडीलांची बदली मासिर्ले येथे झाली. त्यामुळे त्यांचे कुटुंब मासिर्ले येथे स्थलांतरित झाले. लुई यांनी इ. स. १९३९ मध्ये पॅरिस येथील इकॉल नार्मल सुपेरिअर या नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला; परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामामुळे लुई यांना शाळा सोडावी लागली.‍ पुढे त्यांनी फ्रेंच लष्करामध्ये काम करण्यास सुरुवात केली; परंतु इ. स. १९४० मध्ये त्यांना युद्धकैदी म्हणून जर्मनीच्या लष्करांनी ताब्यात घेतले व जर्मनीतील स्लेसवीग कॅम्पमध्ये इ. स. १९४५ पर्यंत कैदेत ठेवले. येथे त्यांना राष्ट्रभाव, राजकीय व्यवहार व समुदाय यांविषयी अनुभव आला. या अनुभवातून ते साम्यवादी विचारांकडे वळले.

लुई यांच्यावर कॅथलिक विचारांचे तत्त्ववेत्ते जीन गिटन, जीन लेक्रॉईक्स व इतिहासकार जोसेफ तास यांचा प्रभाव होता. परिणामी ते कॅथलिक पंथाच्या विचारांनी प्रभावित होऊन इ. स. १९३७ मध्ये कॅथलिक यूथ मुव्हमेंटमध्ये सहभागी झाले. दुसरे महायुद्ध झाल्यानंतर लुई हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी इकॉल नार्मल सुपेरिअर येथे परतले. इ. स. १९४७ मध्ये गॅस्टन बचेलॉर्ड यांच्या मार्गदर्शनखाली लुई यांनी ‘ऑन कन्टेन्ट इन दी थॉट ऑफ जी. डब्ल्यू. एफ. हेगेल’ या विषयावर पीएच. डी. ही पदवी मिळविली. लुई हे इ. स. १९४८ मध्ये इकॉल नार्मल सुपेरिअर संस्थेची स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर डायरेक्टर ऑफ स्टडिज या पदावर रुजू झाले. तेथे त्यांना विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्याचे काम होते. त्यांनी हे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यामुळे तेथेच त्यांना प्राध्यापक पदावर काम करण्याची संधी ‍मिळाली. लुई यांनी या संस्थेत एकूण तीन दशके प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच या संस्थेने त्यांना व्यवस्थापक म्हणूनही काम करण्याची जबाबदारी दिली. लुई यांच्या प्रभावाखाली मिशेल फुको यांच्यासारखे अनेक विचारवंत घडले. लुई हे नाझी राजवटीच्या प्रभावातून मार्क्सवादाकडे झुकले. परिणामी त्यांनी फ्रान्समध्ये जर्मनीच्या हुकूमशाहीविरोधी चळवळीत सहभाग घेतला. याच काळात त्यांची हेलेना राईटमॅन या तरुणीशी ओळख होऊन पुढे इ. स. १९४६ मध्ये या दोघांचा विवाह झाला. हेलेना या फ्रान्समध्ये एक समाजशास्त्रज्ञ, प्रतिकार चळवळीची एक कार्यकर्ती व फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीची सदस्य होती. इ. स. १९४८ मध्ये लुई यांनी हेलेना यांच्या प्रभावातून फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीचे आजीव सदस्यत्व स्वीकारले.

लुई यांच्या वैचारिक कार्याचा प्रभाव फुको मिशेल, एतीन बालिबार, पिअर मॅकेरे, झ्यॅक देरिदा, फेडरिक जेम्सन, टेरी ईगलटन, तसेच स्त्रीवादी ज्युलिएट मिशेल, मिशेल बॅरेट्ट यांचावर पडला. लुई यांच्या मते, मार्क्स यांनी जे तत्त्वज्ञान व शास्त्र उभारले होते, त्याची तत्त्वज्ञानात्मक व रेखीव, काटेकोर मांडणी करणे गरजेचे आहे; कारण मार्क्स यांची तत्त्वज्ञानात्मक मांडणी गुंतागुंतीची आहे. तिची नीट उकल ज्ञानाच्या क्षेत्रात फारशी कोणीही केलेली नाही. तिची नीट मांडणी करणे, हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्टे आहे, असे ते म्हणत. लुई यांनी मार्क्सवादामधील हेगेल यांच्या विचारांचा वारसा नाकारला व संरचनावादाच्या साहाय्याने मार्क्सवादाची पुनर्मांडणी केली. त्यांनी पारंपरिक मार्क्सवादाला आव्हान उभे करून मार्क्सवादाला एका नवीन चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला. त्यांना मार्क्सवादाला सामाजिकशास्त्र म्हणून प्रस्तुत करायचे होते. मार्क्सवादाला मानवतावादी तत्त्वज्ञांच्या तावडीतून सोडवायचे होते आणि एक शास्त्रीय मार्क्सवाद किंवा वैज्ञानिक मार्क्सवाद प्रस्तुत करायचा होता. त्यासाठी त्यांनी १९६० ते १९६५ या काळात अनेक महत्त्वणूर्ण लेख प्रकाशित केले. या लेखांचे रूपांतर फॉर मार्क्स (१९६६) व रीडिंग कॅपीटल (१९७०) या ग्रंथांमध्ये केले. हे दोनही ग्रंथ म्हणजे मार्क्स यांच्या विचारांचे पुनर्अध्ययन आहे. यांमध्ये लुई यांनी उत्पादनशक्ती, उत्पादन संबंध, उत्पादनाचे प्रकार,‍ विचारधारा, राज्य इत्यादींचे पुनर्विश्लेषण केले.

लुई यांनी मार्क्स यांच्या लेखनाचे दोन कालखंडात विभाजन केले. पहिला, इ. स. १८४५ पूर्व मार्क्स आणि दुसरा, इ. स. १८४५ नंतरचा मार्क्स. इ. स. १८४५ पूर्वीच्या मार्क्स यांच्या लिखाणावर हेगेल यांच्या तत्त्वज्ञान, मानवतावाद व परात्मभाव यांचा प्रभाव होता; तर इ. स. १८४५ नंतर मार्क्स यांनी तात्विक भूमिका सोडून शास्त्रीय दृष्टीकोनातून लिखाण केले आहे, असे मत लुई यांनी मांडले आहे. मार्क्स यांनी आपल्या परात्मताभाव व अन्य मानवतावादी संकल्पनाच्या जागी सामाजिक संरचना, अधिसंरचना, उत्पादनसंबंध, उत्पादनाची शक्ती, मोलमजुरी, खाजगी संपत्ती, वरकड मूल्य, मालकीचे तत्त्व आणि सामाजिक–आर्थिक परिस्थितीबद्दल मांडणी करीत या नव्या शास्त्रीय संकल्पनांची स्थापना आपल्या भांडवल व इतर ग्रंथांत केली. तसेच मार्क्स यांनी तत्त्वज्ञानात्मक मानवतावादाची विविध प्रकारे चिकित्सा केली आहे. सामाजिक संरचनेच्या इतिहासाचे नवे शास्त्र मार्क्स यांनी स्थापित केले, असेही मत लुई यांनी मांडले आहे.

लुई यांच्या लेनिन ॲण्ड फिलॉसॉफी ॲण्ड ऑदर एसेज या ग्रंथामध्ये ‘विचारप्रणाली व विचारप्रणालीत्मक राज्य यंत्रणा’, समाजनिर्मितीचा आर्थिक पाया आणि राजकीय व विचारप्रणालीत्मक अधिसंरचना यांचे तार्किक विश्लेषण केले आहे. समाजात पुनरुत्पादन होत असताना उत्पादन, उत्पादन साधने व उत्पादक शक्तीचा सहसंबंध असतो. उत्पादन साधने आणि उत्पादक शक्ती यांच्या पुनर्उत्पादनाचे ‍विश्लेषण लुई यांनी केले आहे. त्यांनी मार्क्स यांच्या आर्थिक निर्धारणवादाचा अस्वीकार केला. त्यांच्या मते, कोणत्याही समाजामध्ये संरचनेचे आर्थिक, राजकीय व वैचारिक हे तीन स्तर असतात. ज्यामध्ये स्वायतत्ता असते. आपल्या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था स्वतंत्र असते. त्याचप्रमाणे राजकीय संरचना, वैचारिक संरचना या सापेक्षत: स्वतंत्र आहेत. समाजातील या वेगवेगळ्या संरचना परस्परांशी आंतरक्रिया करतात व एकमेकांवर प्रभाव व परिणामही घडवीत असतात; परंतु लुई यांच्या मते, भांडवलशाहीत सर्व व्यवहार अंतिमत: आर्थिक पातळी नियंत्रित, निर्णायक असते; मात्र आर्थिकेतर घटक/संरचना ही वर्चस्ववादी असू शकतात.

लुई यांनी विचारसरणीला एक भौतिक अस्तित्व असते, असे मत व्यक्त केले आहे. ज्याप्रमाणे धर्म, कायदा, राज्य इत्यादींप्रमाणे विचारसरणी ही नेहमी साधने व त्यांच्या व्यवहारात असते, त्याचप्रमाणे ती भौतिक घटकांत असते.‍ विचारसरणी ही केवळ विचारांचा संच नाही, तर तिला एक भौतिकता असते. राज्यकर्त्यांना विचारसरणीचा उपयोग कामगार वर्गावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी होतो. मार्क्सवादी परंपरा मानते की, राज्य विचारसरणीच्या माध्यमातून ‍कामगारांवर दबाव निरंतर कायम ठेवते. यानुषंगाने मार्क्स यांनी राज्यशक्ती व राज्ययंत्रणा यांचे विश्लेषण केले आहे.

राज्याच्या यंत्रणा : लुई यांनी समाजाचा अभ्यास करताना आधुनिक समाजातील विचारप्रणालीचे महत्त्व विशद केले आहे. त्यांच्या मते, सत्ताधारी वर्ग आपली प्रस्था‍पित अर्थव्यवस्था व मूल्यव्यवस्था टिकविण्यासाठी विचारप्रणालीच्या साहाय्याने काम करीत असतो. तसेच सत्ताधारी वर्गाची विचारप्रणाली अंगीकृत करून काम करीत असतात. आधुनिक भांडवलशाहीमध्ये सत्ताधारी वर्ग आपली सत्ता दोन प्रकारे राबवीत असतो.

१) दमनकारी राज्य यंत्रणा : यामध्ये पोलिस, सैन्य दल यांचा समावेश असतो. त्यामधून आपली सत्ता दमनच्या आधारे राबविली जाते.

२) विचारप्रणालीत्मक राज्य यंत्रणा : यामध्ये शिक्षणसंस्था, कुटुंब, न्यायव्यवस्था, राज्यसंस्था, कामगार संघटना, प्रसारमाध्यमे इत्यादींमार्फत सत्ताधारी वर्ग आपले वर्चस्व, ‍विचार, मूल्ये यांद्वारे व्यक्ती व समाजाचे वर्चस्व व नियंत्रण करीत असतो.

लुई यांनी मार्क्सवादाची नवी मांडणी करून त्यामध्ये आर्थिक रचनेबरोबरच इतर गैरआर्थिक घटकांनाही संरचनांचे महत्त्व अधोरेखित केले. द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या कल्पनेचा विस्तार करून अंतर्विरोधाची विविध रूपे  स्पष्ट केली. मार्क्सवादाला शास्त्रीय पायावर उभे करून समग्र सामाजिक वास्तववादाचा ऐतिहासिक भौतिकवादाच्या पद्धतीने कसा अभ्यास करावा, हे दाखवून दिले. सिद्धांताच्या क्षेत्रामध्ये तत्त्वज्ञान राजकारणाचे प्रतिनिधित्व करते व वर्गसंघर्षाच्या क्षेत्रामध्ये ते शास्त्र म्हणून कार्य करते. सिद्धांतास संरचनेच्या मूळ पातळींमध्ये स्थान देऊन त्याचे महत्त्व लुई यांनी स्पष्ट केले आहे.

लुई यांचे व्यक्तिगत जीवन नैराश्यपूर्ण वातावरणात गेले. सुरुवातीच्या काळात त्यांचे आई-वडिलांबरोबर आणि विवाहानंतर पत्नीबरोबर तणावपूर्ण संबंध होते. तसेच दीर्घकाळ जर्मनीच्या लष्करी कैदेत राहावे लागल्याने त्यांना इ. स. १९३८ पासून उदासीनता, नैराश्य हे मानसिक आजार जडले व त्यांचे चक्र आयुष्यभर चालू राहिले. लुई यांनी अनेक वर्षे मनोरुग्ण उपचार केंद्रात काढले. १९८० मध्ये निराशेच्या काळात त्यांनी पत्नी हेलेना यांची गळा दाबून हत्या केली. लुई मनोरुग्ण असल्याने न्यायालयाने त्यांना कैद न करता मनोरुग्ण उपचार केंद्रात ठेवण्याचा पोलिसांना आदेश दिला. लुई यांनी जीवनातील शेवटची दहा वर्षे एकांतात काढली. अशा संघर्षमय जीवन जगणाऱ्या संरचनात्मक मार्क्सवादी विचारवंताचा मृत्यू पॅरिस शहरातील मनोरुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने झाला.

लुई यांना आपल्या पत्नीच्या हत्येचे स्पष्टीकरण न्यायालयात देता आले नाही. म्हणून त्यांनी त्या घटनेची कबुली देण्यासाठी दी फ्यूचर लास्ट्स फॉरेव्हर हे आत्मचरित्र लिहिले; परंतु ते त्यांच्या मृत्युनंतर १९९२ मध्ये प्रकाशित झाले. त्यांचे हे आत्मचरित्र कबुलीचे आत्मचरित्र म्हणून ओळखले जाते.

लुई यांचे मॉनटेसक्यू : पॉलिटिक्स ॲण्ड हिस्ट्री (१९५९); लेनिन ॲण्ड फिलॉसॉफी ॲण्ड ऑदर एसेज (१९७१); एसेज इन स्लेफ क्रिटिशिजम (१९७३); पोझिशन्स (१९७६) इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

संदर्भ :

  • चौसाळकर, अशोक, मार्क्सवाद आणि उत्तर मार्क्सवाद, पुणे,२०१०.
  • Althusser, Louis, For Marx, London, 2005.
  • Althusser, Louis, Lenin and philosophy and other essays, Delhi, 2006.
  • Althusser, Louis, Reading capital : The complete edition, London and New York, 2016.
  • Gregory Elliot, ed., Althusser : A Critical Reader, America, 1994.
  • Althusser, Louis, The Future Lasts a Long Time, London, 1994.

समीक्षक : श्रुती तांबे