वज्रयान पंथाची एक शाखा. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात प्राचीन काळापासून (इ.स.पू.सु. सहावे शतक) राहणाऱ्या इंडो-मंगोलियन वंशाच्या लोकांना ‘नेवार’ असे म्हणतात. नेवार या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल विविध मतमतांतरे आहेत. काही तज्ज्ञ नेपाळ या प्रदेशनामावरून नेवार हा शब्द आला असावा किंवा नेवार या शब्दावरून नेपाळ हा शब्द रूढ झाला असावा, असे मानतात; तर काहीजण ‘पाल’ म्हणजे लोकर या मूळ शब्दात ‘ने’ हे व्यंजन पूर्वपदी येऊन नेपाल हा शब्द झाला असावा व याचे अपभ्रष्ट रूप ‘नेवार’ झाले असावे, असे म्हणतात. नेपाळचे मूळ रहिवासी असणाऱ्या या नेवार लोकांनी ज्या बौद्ध धर्माचे अनुसरण केले, त्याला नेवार बौद्ध धर्म असे म्हटले जाते. भारतामध्ये उगम असणाऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार चीन, जपान, कोरिया, तिबेट, नेपाळ इत्यादी देशांमध्ये होत असताना त्याला अनेकविध रूपे प्राप्त झाली. थेरवाद, महायान, वज्रयान, तिबेटी लामांचा बौद्ध धर्म, झेन आणि इतर अनेक स्वरूपांत त्या त्या ठिकाणी बौद्ध धर्म दिसून येतो. नेपाळमध्येसुद्धा अनेक प्रकारचा बौद्ध धर्म असला, तरीही काठमांडू परिसरात विकसित झालेला नेवार बौद्ध धर्म हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. वज्रयान पंथाचीच एक शाखा असणारा हा बौद्ध धर्म भारतीयत्व, हिंदू धर्म, तिबेटी लामांचा धर्म, वज्रयानातील तांत्रिक प्रक्रिया आणि स्थानिक परंपरा या सर्वांचा सुरेख संगम आहे.

पुरातत्वीय पुराव्यांनुसार नेवार बौद्ध धर्म इ.स.च्या पाचव्या शतकापासून प्रचलित असला, तरी त्याचा विकास मुख्यतः बाराव्या शतकानंतर झालेला आढळतो. काठमांडू, पाटण परिसरात उपलब्ध असणारी संस्कृत-नेवारी हस्तलिखिते आणि पुरातन वास्तूरचना, विशेषतः बौद्धविहार इत्यादींवरून हाच निष्कर्ष निघतो. हिमालयाच्या दऱ्या-खोऱ्यातून राहणारे किरातवंशीय राजे नेपाळमध्ये राज्य करीत असल्यापासून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांत सातत्याने दळणवळण होते. त्यामुळे तिथे रुजलेला बौद्ध धर्म केवळ हीनयान अथवा महायान न राहता त्यावर शैव आणि काही प्रमाणात वैष्णव धर्माचीही छाप दिसते. इ.स.च्या पाचव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत नेपाळमध्ये लिच्छवी राजांचे साम्राज्य होते. याच काळात भारतातील उत्कर्षाला पोहचलेल्या विक्रमशीला, तक्षशीला इत्यादी विद्यापीठांतून अनेक बौद्ध भिक्षू धर्माचा प्रसार करण्यासाठी नेपाळमार्गेच तिबेटला गेले. त्यामुळे नेपाळमधील राजे हिंदूधर्मीय असले, तरीही बौद्ध धर्माचा नितांत आदर करणारे होते. लिच्छवी राजे नरेन्द्रदेव, शिवदेव, पुष्पदेव हे तर बौद्ध धर्माला आधार देणारे ठरले. अनेक बौद्धविहारांसाठी, स्तूपांसाठी त्याने दान दिल्याचे उल्लेख शिलालेखांत आढळतात. नंतरच्या काळात मल्ल राजांचे साम्राज्य आले, तरीही हिंदूंचा पशुपतीनाथ आणि बौद्धांचा स्वयंभूनाथ दोन्ही धर्मांतील लोकांसाठी वंदनीयच राहिले. भारतीय बोधिसत्त्व शान्तिरक्षित याने नेपाळमधून तिबेटला भेट देऊन बौद्ध धर्माचा प्रसार केल्याचे उल्लेख अनेक ग्रंथांत आढळतात. नेपाळचा निकटवर्ती देश तिबेट असल्याने तिबेटातील वैशिष्ट्यपूर्ण लामांच्या बौद्ध धर्माचाही प्रभाव नेपाळातील बौद्ध धर्मावर पडला. नेपाळी राजकन्या भृकुटी हिने तिबेटच्या राजाशी विवाह केल्याचेही उल्लेख असल्याची नोंद इतिहासकार करतात. या कारणांमुळेच काठमांडू परिसरातील नेवार बौद्ध धर्मावर हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्म या दोन्हींचा प्रभाव दिसतो.

स्वयंभू स्तूप, काठमांडू.

बुद्ध, धर्म आणि संघ ही जगभरात पसरलेल्या बौद्ध धर्माची प्रमुख अंगे आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांचे जन्मस्थान हे आज नेपाळमधल्याच तराई क्षेत्रात लुम्बिनी या ठिकाणी असले, तरी नेवार बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू काठमांडू परिसरातील ‘आदिबुद्ध’ हा आहे. नेपाळची देश म्हणून निर्मिती होण्याआधी काठमांडू खोऱ्याच्या ठिकाणी नागह्रद नावाचे अत्यंत विशाल सरोवर होते. या सरोवरात उमललेल्या सहस्रदल कमळामध्ये ज्योती स्वरूपात आदिबुद्ध प्रकट झाला. चीनमधील पंचशीर्ष पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या मंजुश्रीने हे पाहिले आणि आपल्या शिष्यवर्गासह नेपाळमध्ये येऊन काठमांडू परिसरातील पर्वतकडा कापून आदिबुद्धाचे स्थान आणि त्यानंतर वसाहत सुस्थापित केली. अशी कथा स्वयंभूपुराण या नेवार बौद्ध पुराणात येते. नंतरच्या काळात याच ठिकाणी स्वयंभू स्तूपाची आणि परिसरातील देव-देवतांची स्थापना झाली. आदिबुद्ध वज्रसत्व आणि सभोवती असणाऱ्या अमिताभ, अक्षोभ्य, रत्नसंभव, वैरोचन आणि अमोघसिद्धी या पंच तथागतांचे स्वयंभू स्तूपाचे हे स्थान नेवार बौद्ध धर्माचे प्रमुख पूजास्थान आहे.

गौतम बुद्धांच्या पाच प्रकारच्या ध्यानांमधून पंच तथागत निर्माण झाले, असे वर्णन गुह्यसमाजतंत्रात येते. नेवार बौद्ध धर्मानुसार रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पंच स्कंधांचे प्रतीक असणाऱ्या पाच ध्यानी बुद्धांचा समावेश धर्मकार्येत होतो. वज्रसत्व अथवा आदिबुद्ध हा या ध्यानी बुद्धांचा पिता आहे. निर्वाण प्राप्तीसाठी मंत्रात्मक, मंडलस्थित आणि विविध मुद्रा धारण केलेल्या या बुद्धाचे ध्यान केले जाते. राग-लोभ (अमिताभ), क्रोध (अक्षोभ्य), मोह (वैरोचन), मद (रत्नसंभव) आणि भय (अमोघसिद्धी) या दोषांवर विजय मिळविण्यासाठी त्या त्या ध्यानी बुद्धाची साधना केली जाते. उपासनेमध्ये या प्रत्येक बुद्धाशी निगडित असणारी एक एक शक्तिदेवता आणि त्यांच्यापासून समुत्पन्न झालेले समंतभद्र, वज्रपाणी, रत्नपाणी, अवलोकितेश्वर, विश्वपाणी हे बोधिसत्त्व यांना महत्त्व आहे. नेपाळ भूमीच्या उत्पत्तीशी संलग्न असणारा मंजुश्री बोधिसत्त्व नेपाळमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मंजुश्रीच्या उपासनेमुळे विद्वत्ता, बुद्धिमत्ता, धर्मग्रंथाचे ज्ञान आणि वक्तृत्व लाभते, अशी श्रद्धा आहे .मंजुघोष ,मंजुवज्र ,वागीश्वर, नामसंगीती अशी त्याची अनेक रूपे नेपाळमध्ये प्रसिद्ध आहेत. धर्मधातुवागीश्वर मंडळाची मुख्य देवता म्हणून मंजुश्रीला विशेष स्थान आहे. याशिवाय करुणामय अवलोकितेश्वर आणि त्याची शेकडो रूपे नेपाळमध्ये आढळून येतात. लोकेश्वरासाठी केल्या जाणाऱ्या अष्टमी व्रताचे नेवार बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदूधर्मियांचा रातो मच्छिन्द्रनाथ हा रक्त अवलोकितेश्वराचा अवतार मानला जातो. स्थानिक नेवार लोक त्याला बुंगादेव संबोधतात. पावसाच्या या देवाचा रथोत्सव नेवार बौद्ध आणि हिंदू यांचा सहभाग असणारा नेपाळमधील मोठा उत्सव आहे.

पंच तथागत

महायान पंथाच्या, विशेषेकरून माध्यमिक शाखेच्या, तत्त्वज्ञानातून वज्रयान विकसित झालेला असल्याने शून्यवाद हाच नेवार बौद्ध तत्त्वज्ञानाचा आधार आहे. यान म्हणजे मार्ग, आणि अभेद्य अशा शून्यतेचे प्रतीक म्हणजे वज्र. महायानानुसार निर्वाण प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक जन्मांची आवश्यकता असते; मात्र योग्य तांत्रिक साधनेद्वारा मनुष्याला एकाच जन्मात हे ध्येय गाठता येते, अशी वज्रयानाची धारणा आहे. त्यासाठी नेपाळमध्ये चक्रसंवर, हेवज्र इत्यादी अनुत्तर योगतंत्रांचा प्रयोग केला जातो. बुद्ध होण्यासाठी आधी बोधिसत्त्वपदाला पोहोचणे आवश्यक असते. संसार करत असताना सर्वसामान्य गृहस्थालासुद्धा ‘बोधि’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्रिरत्नांना शरण जाऊन बोधिचर्येचे पालन करीत ‘आदिकार्मिक’ बोधिसत्त्व होण्यसाठी प्रयत्नशील राहावे, असे नेवार बौद्ध धर्म सांगतो.

शून्यत्त्वाची जाणीव नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस स्वतःला वेगळे, विशेष असेकाही मानत असतो. त्यातूनच मत्सर, द्वेष, गर्व, भीती इत्यादी भावनांचा उदय होतो. या दोषांवर विजय मिळविण्यासाठी आणि दान, शील, शांती, वीर्य, ध्यान आणि प्रज्ञा या सहा पारमिता अंगी बाणविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच आदिकार्मिक बोधिसत्त्वाचे ध्येय असते. चैत्यपूजा, व्रत-वैकल्ये, वज्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली वज्र, घंटा इत्यादी उपकरणांच्या साहाय्याने केलेली मंडलपूजा, कलशपूजा, नामसंगीतीचे पठण, प्रज्ञापारमिता आणि इतर सूत्रांचे पठण, तीर्थक्षेत्रांना भेटी, मंत्र, गुप्तसाधना, इत्यादींचा नेवार बौद्ध धर्मात समावेश होतो.

स्वयंभू स्तूप, मंजुश्री चैत्य, वाग्मती आणि इतर नद्यांच्या संगमावरील बारा तीर्थे, लोककल्याणासाठी काठमांडू खोऱ्यात अवतार घेतलेल्या आठ बोधिसत्त्वांची अष्ट वीतराग क्षेत्रे ही नेवार बौद्ध धर्मियांची प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. या नेवार बौद्ध तीर्थयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेक तीर्थे ही गोकर्णेश्वर, कुंभेश्वर, छांगु नारायण, शेष नारायण यांसारखी हिंदू धर्मियांची प्रमुख मंदिरे असणारी ठिकाणे आहेत. काठमांडू परिसरातील अशा पंचवीस तीर्थस्थानांना भेट देणे हे नेवार बौद्ध धर्माचे महत्त्वाचे अंग असल्याचे उल्लेख बौद्ध ग्रंथांत आढळतात. याशिवाय बुद्ध आणि बोधिसत्त्वांच्या प्रतिमा असणारी अनेक चैत्य मंदिरे, विहार, स्तूप ही स्थाने पवित्र मानली जातात. लोकेश्वराचे उपोसथ व्रत, स्वयंभूच्या ठिकाणी केले जाणारे पूर्णिमा व्रत, वसुंधरा देवीचे वसुंधरा व्रत इत्यादी व्रतांचे आचरण सर्वसामान्य नेवार बौद्ध करतात.

प्रज्ञापारमिता, गंडव्यूह, दशभूमीश्वर, समाधिराज, लंकावतार, सद्धर्मपुंडरीक, ललितविस्तार, सुवर्णप्रभास, गुह्यसमाजतंत्र हे नऊ ग्रंथ नेवार बौद्ध धर्माला आधारभूत आहेत. या शिवाय बोधिचर्यापालनासाठी मार्गदर्शक असणारे, अद्वयवज्राचे कुदृष्टीनिर्घटन, अनुपमवज्राचे आदिकर्मप्रदीप, शांतिदेव आचार्यांचे शिक्षासमुच्चय हेही ग्रंथ आहेत.

वज्राचार्य

नेवार बौद्ध लोकांच्या सांघिक धर्मकृत्यांची केंद्रे म्हणजे बाहा आणि बाही या नावाने ओळखले जाणारे बौद्धविहार. बौद्धविहारामधील नित्य पूजा इत्यादी कर्मे आणि प्रासंगिक विधी करण्याची जबाबदारी वज्राचार्य आणि शाक्य यांची असते. विहारांमध्ये अनेक धार्मिक कृत्ये, उत्सव इत्यादी सांघिकपणे केले जातात. सामान्य माणसांना बोधिमार्गाची दिशा दाखविण्यापासून त्यांच्या विवाह, व्रत-वैकल्ये पूजादी कार्यांत मार्गदर्शक असणारे वज्राचार्य हे इतर बौद्ध पंथांप्रमाणे पूर्णवेळ भिक्षू नसतात. प्रत्येक वज्राचार्य आणि शाक्य मुलावर कुमारवयातच चूडाकर्म अथवा प्रवज्ज्येचा संस्कार केला जातो. त्यानंतर विहारात काही दिवस राहून त्याला भिक्षू नियमांचे पालन करावे लागते; परंतु प्रत्येक वज्राचार्य अथवा शाक्य हा त्यानंतर गृहस्थ होऊ शकतो. वज्राभिषेकानंतर ते बौद्ध संघाचे सदस्य होतात. त्यांना ‘बरे’ असे म्हटले जाते; परंतु आचार्यपदाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतः गुप्त तांत्रिक साधना करणे आवश्यक असते. या साधनेमध्येच चर्यागीत आणि चर्यानृत्य यांचाही समावेश असतो. स्वतः देवतास्वरूप असल्याची कल्पना करून त्या त्या देवतेचे वर्णन आणि माहात्म्य सांगणाऱ्या या गीत-नृत्यांचा उद्देश देवतेशी तादात्म्य पावणे हा असतो; मात्र आयुष्यभर ब्रह्मचर्येचे पालन करणाऱ्या भिक्षू संघाची महायान परंपरा नेवार बौद्ध धर्मात नाही. गृहस्थ भिक्षू संघाची संकल्पना हे या धर्माचे वैशिष्ट्य आहे.

तांत्रिक साधनेत वापरण्यात येणाऱ्या विविध मंडळांची कापडावरील चित्रे, प्रतिकात्मक अशा संभोगावस्थेतील चक्रसंवर-वज्रवराही किंवा हेवज्र-नैरात्म्या यांच्या मूर्ती, बोधिसत्त्व आणि बुद्ध यांच्या विविध रूपातील धातूमूर्ती आणि शिल्पे, वैशिष्ट्यपूर्ण विहाररचना यांनी नेवार बौद्ध धर्माला उत्कृष्ट कलात्मक वारसा लाभला आहे. हिंदू मल्ल राजांच्या आधिपत्याखाली विकसित झालेला नेवार बौद्ध धर्म याचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते.

संदर्भ :

समीक्षक : सूरज पंडित