भारतातील झास्कर पर्वतश्रेणीतील एक निसर्गसुंदर आणि महत्त्वाची खिंड. समुद्रसपाटीपासून ४,८९० मी. उंचीवर ही खिंड आहे. या खिंडीमुळे हिमाचल प्रदेशातील लाहूल जिल्हा लडाखमधील लेह जिल्ह्याशी जोडलेला आहे. लेह-मनाली (हिमाचल प्रदेश) हा महामार्ग या खिंडीतून जातो. बारा-लाचा ला खिंडीपासून मनाली १९० किमी., तर लेह २८२ किमी. वर आहे. ही खिंड ३२° ४५’ ३१” उत्तर अक्षांश आणि ७७° २५’ १३” पूर्व रेखांशावर स्थित आहे. बारा-लाचा ला हा एक पठारी प्रदेश असून तेथे पीर पंजाल, झास्कर आणि हिमालय पर्वत एकत्र येतात.

चिनाब नदीची उपनदी भागा नदी ही येथील सूर्यताल किंवा सूरजताल या सरोवरातून उगम पावते. हे सरोवर या खिंडीपासून वायव्येस मनालीच्या बाजूला काही किमी. अंतरावरच आहे. चिनाब नदीची दुसरी उपनदी चंद्रा हीसुद्धा या प्रदेशातील हिमनदीतून उगम पावून आग्नेयीस वाहत जाते. चंद्रा आणि भागा या दोन नद्या तोंडी येथे एकत्र येतात. संगमानंतरचा त्यांचा संयुक्त प्रवाह चंद्रभागा नावाने ओळखला जातो. हा खिंड भाग म्हणजे भागा आणि यूनाम या दोन नद्यांदरम्यानचा जलविभाजक आहे.

प्राचीनकाळी हा खिंडमार्ग व्यापारी मार्गांचा एक भाग होता. या खिंडीमध्ये स्पिती, लडाख, झास्कर आणि लाहूलपासून येणारे रस्ते मिळतात. लेह-मनाली हा महामार्ग सुस्थितीतील रस्ता आहे; परंतु इतर हिमालयीन रस्त्यांप्रमाणेच हिवाळ्यात तुफान हिमवृष्टीमुळे हा प्रदेश हिमाच्छादित आणि धोकादायक बनतो, त्यामुळे त्या काळात हा खिंडमार्ग वाहतूक आणि पर्यटनासाठी बंद केला जातो. फक्त एप्रिल-मेपासून ते ऑक्टोबरपर्यंत या खिंडीतून वाहतूक चालू शकते.

बारा-लाचा ला खिंड आणि तिच्या परिसरातील नयनमनोहर सृष्टीसौंदर्यामुळे पर्यटक आणि ट्रेकर्स यांचे हे आकर्षक ठिकाण आहे. या खिंडीतील घाटमार्ग ८ किमी. लांबीचा आहे. ट्रेकर्स आणि दुचाकीवरून प्रवासासाठी बरेच साहसवीर येथपर्यंत येतात किंवा सूरजतालपासून पुढे ३० किमी., स्पिती खोऱ्यात असलेल्या चंद्रताल सरोवरापर्यंतही जातात. एप्रिल-मेमध्ये येथील बर्फ वितळल्यानंतरच पर्यटकांना किंवा ट्रेकर्सना तिथे जाण्यास परवानगी मिळते. एप्रिल-मे ते ऑक्टोबर हा येथील पर्यटनाच्या दृष्टीने अनुकूल आणि सुरक्षित काळ असतो; मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र जवळ असणे आवश्यक असते.

समीक्षक : वसंत चौधरी