संस्था स्थापना : १९९४   

गणितातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी संस्था. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स (एआयएम) या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये झाली. हीचे संस्थापक जॉन फ्राय आणि स्टीव्ह सोरेन्सेन हे होते. सिलिकॉन व्हॅलीत त्यांचा भागिदारीत इलेक्ट्रॉनिकीचा व्यवसाय होता. व्यवसाय करीत असतानाच अनेक वर्षे हे दोघे गणित-संशोधनासाठी आर्थिक मदतही देत होते. त्यांच्या कल्पनेतून ही संस्था उभी राहिली आणि ती ना नफा तत्त्वावर चालते.

गणितातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारीत नेणे हे एआयएम संस्थेचे ध्येय आहे. यासाठी संशोधन प्रकल्पांना केंद्रस्थानी ठेवणे, प्रायोजित परिषदांचे आयोजन करणे आणि दुरून संपर्क ठेवता येईल असे गणित ग्रंथालय विकसित करणे, हे मार्ग अवलंबिले जातात.

याखेरीज गणितावरील दुर्मिळ पुस्तके व दस्तऐवज मिळवून जतन करणे आणि ते गणिताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांना उपलब्ध करून देणे हे कामही एआयएम संस्था करते. एआयएम रिसर्च कॉन्फरन्स सेंटर (ARCC) सुरू करण्यासाठी २००२ मध्ये या संस्थेला अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाउंडेशनतर्फे (National Science Foundation – NFS) अनुदान मिळाले. संस्थेच्या कारभारावर विश्वस्त मंडळ व सल्लागार मंडळ यांची देखरेख असते.

सध्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील पॅलो आल्टो येथे एआयएम संस्थेचे कामकाज चालते. ही जागा फ्राय इलेक्ट्रॉनिक्सचे पूर्वीचे मुख्यालय होते. फ्राय कुटुंबीयांच्या दातृत्वामुळे आज ती जागा एआयएमला मिळाली आहे. नवीन सुविधा केंद्र सध्याच्या ठिकाणाच्या दक्षिणेला अंदाजे ७२ किलोमीटरवरील मॉर्गन हिल (कॅलिफोर्निया) येथे निर्माण करण्यात येणार आहे.

गणित शास्त्रातील संशोधनासाठी आणि उच्च शिक्षणासाठी ‘द नॅशनल अलायन्स फॉर डॉक्टोरल स्टडीज’ची स्थापना एआयएम संस्थेने केली आहे. यासाठी लागणारे अर्थबळ नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून मिळते. समाजातील ज्या गटांचे विद्यार्थी गणितशास्त्रातील डॉक्टरेट घेणाऱ्यांत पारंपारिक रीत्या अभावानेच आढळतात, ते मोठ्या संख्येने डॉक्टरेट मिळवू शकतील हे पहाणे, तसेच अशांना गणित विज्ञान वा तत्सम व्यवसायात सुस्थापित होण्याकरिता मदत करणे, विद्यापीठातील गणितशास्त्रासाठी डॉक्टोरल अभ्यासक्रम राबविणारे प्राध्यापक आणि पदवी तसेच पदवीपूर्व महाविद्यालयांतील शिक्षकवर्ग यांच्यातील सहकार्याने चालणारे अनुदानित संशोधन वाढविणे, विविध क्षेत्रांत लागणाऱ्या गणितशास्त्रज्ञांची फौज तयार करणे अशी या अध्यासनाची ध्येये आहेत.

एआयएम संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा विभाग ‘द मॅथ अलायन्स रिसर्च स्टडी’ (The Math Alliance Research Study – MARS) आहे. हा विभाग युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, अर्बना शॅम्पेन येथे आहे. त्याला नॅशनल अलायन्सच्या संचालक मंडळाची मंजुरी मिळालेली आहे. मॅथ अलायन्सच्या कार्यक्रमांनुसार संशोधन करणे हे या विभागाचे काम आहे.

एआयएम संस्थेमध्ये लहान संशोधन गटांना एकत्रित आणणारा SQuaRES (Structured Quarent Research Ensembles) या नावाचा कार्यक्रम २००७ पासून राबविला जात आहे. यानुसार दर वर्षी एआयएम वीस कार्यशाळांचे आयोजन करते. प्रत्येक कार्यशाळेत ४-६ गणितज्ज्ञांचा एक, याप्रमाणे ३० संशोधन गटांचा सहभाग असतो.

प्रत्येक शैक्षणिक पातळीवरील गणित शास्त्रातील सहभाग अधिक व्यापक करण्यासाठी एआयएम संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. त्या त्या काळात महत्त्वाच्या असणाऱ्या गणितातील समस्यांवर संशोधन करणाऱ्या व्यावसायिक गणितज्ज्ञांना संशोधन सहाय्य देण्यापासून ते लहान विद्यार्थ्यांना गणितातील उत्सुकतेचा आनंद घेण्यास शिकविण्यासाठी, तसेच भविष्यात एसटीइएम (Science, Technology, Engineering and Mathematics – STEM) व्यावसायिक बनविण्याकरिता प्रोत्साहन देण्यापर्यंत सर्व कामे एआयएम संस्था करते.

एआयएम संस्थेने ऑगस्ट २०११ पासून नॉल (Knowl) नावाचे एक संदर्भशोध साधन आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. हे साधन हेराल्ड शिली यांची निर्मिती असून त्याचे नावही त्यांनीच ठेवले आहे. Knowl याचाही अर्थ ‘छोटी टेकडी’ आणि उच्चार ‘नॉल’ आहे. नॉल याच्या साहाय्याने अभ्यासकाला हवी ती माहिती आशय-निरपेक्ष पद्धतीने सहज मिळविता येते. ज्या संकेतस्थळावरून ही माहिती मागविली जाते त्या स्थळाशी मिळालेल्या माहितीचा संबंध अजिबात राहत नाही. त्यामुळे नॉल या संदर्भशोध साधनाकडून मिळालेली माहिती दुसऱ्या संकेतस्थळाच्या पृष्ठामध्ये किंवा त्याच्या इतर माहितीत उद्धृत करण्यात काही अडचण येत नाही. यातून तयार होणारी नवी नोंद इच्छुक वाचकाकडे सुलभ पद्धतीने पोहोचविली जाते.

शाळेच्या माध्यमिक पातळीपासूनच विद्यार्थ्यांना गणितातील समस्या सोडविण्यास उद्युक्त करण्यासाठी एआयएम संस्थेने गणित-शिक्षक मंडळांचे एक जाळे बांधलेले आहे. सध्या अमेरिकेतील साठ गणित-शिक्षक मंडळांचा यात सक्रिय सहभाग आहे. ज़्युलिया रॉबिन्सन गणित उत्सवांतही एआयएमने भागिदारी जाहीर केली आहे. ज़्युलिया रॉबिन्सन या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील गणिताच्या प्राध्यापिका असून डाव्हीट हिल्बर्ट यांच्या दहाव्या समस्येची उकल शोधून काढण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. अशा प्राध्यापिकेच्या नावाने गणित-उत्सव साजरा करण्याचे प्रयोजन असे की, सामुहिक कृतींतून सर्जनशीलतेने गणिती समस्या उलगडताना विद्यार्थांना लहानपणापासूनच गणित विषयातील श्रीमंतीची आणि सौंदर्याची अनुभूती व्हावी.

अशा प्रकारे एआयएम ही अमेरिकेतील गणिताच्या विकासाला सर्वार्थाने वाहून घेतलेली संस्था आहे.

 

संदर्भ:

समीक्षक – विवेक पाटकर

प्रतिक्रिया व्यक्त करा