डच ईस्ट इंडिया कंपनीची इंडोनेशियात असलेली कागदपत्रे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे अरसिप नॅशनल रिपब्लिक इंडोनेशिया अर्थात राष्ट्रीय पुराभिलेखागारामध्ये ही कागदपत्रे आहेत. यामध्ये कंपनीच्या बटाव्हिया (जाकार्ता) येथील गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे आणि पुढे कंपनीच्या बरखास्तीपर्यंतचे (१८११) मोठे अभिलेखागार येथे आहे. संग्रह क्रमांक के. ६६ ए (K. 66 a) मध्ये इ. स.१६०२–१८१२ या काळातील कागदपत्रे आहेत.

डच ईस्ट इंडिया कंपनीच्या रचनेनुसार सतरा सदस्यीय संचालक मंडळ ही सर्वोच्च संस्स्था असून, त्या खाली ॲम्स्टरडॅम, झीलँड इत्यादी सहा विभाग अर्थात चेंबर्स होते. त्या खाली होते ते बटाव्हियातील गव्हर्नर जनरल व त्याचे काउन्सिल. कंपनीच्या प्रभावक्षेत्रात अर्थात पश्चिमेस केप ऑफ गुड होपपासून ते जपानपर्यंतच्या क्षेत्रात गव्हर्नर जनरलची सत्ता सर्वोच्च होती. व्यापार, जहाजवाहतूक, आर्थिक बाजू, मानवी संसाधने, न्यायदान, लष्करी तयारी, डच वसाहतींमधील धार्मिक धोरण, स्थानिक शासकांशी संबंध, नाणी, इत्यादी कंपनीशी संबंधित सर्वच पैलूंसंबंधीचे निर्णय हे काउन्सिल घेत असे. काउन्सिलला व्यापारविषयक गोष्टींकरिता डिरेक्टर जनरल, पगार व अर्थविषयक गोष्टींकरिता बुकहाउडर जनरल आणि लेखापरीक्षणाकरिता व्हिजिटर जनरल यांची मदत होत असे.

सदर संग्रहात काउन्सिलच्या बैठकी, संमत झालेले निर्णय, बैठकींचे तपशीलवार वर्णन, गुप्त बैठकींचे वर्णन, त्यांची परिशिष्टे, अनुक्रमणिका इत्यादी कागदपत्रे आहेत. संचालक मंडळाकडे पाठवावयाच्या संक्षिप्त अहवालाच्या प्रती, तसेच बटाव्हिया कॅसलमध्ये वर्षभर पोहोचणाऱ्या पत्रांच्या आधारे वर्षभर घडणाऱ्या घटनांचा संक्षिप्त वृत्तांत सांगणारे ‘डाग-रजिस्टरʼचे शेकडो खंड आहेत. त्याखेरीज बटाव्हियातील शासनातर्फे जाहीर केलेल्या अनेक प्रकारच्या सूचना व जाहीरनाम्यांची यादी आणि तपशीलवार मजकूरही आहे. यालाच प्लाकाट असेही नाव असून, हे प्रामुख्याने डच भाषेत व काही मलय भाषेतही आहेत. ‘मेमरीजʼ नामक साधनांत डच कंपनीच्या अन्य वसाहतींमधील व यूरोपातील बातम्यांचे संकलन असे. एकप्रकारे अधिकृत वृत्तपत्रासारखा याचा वापर होत असे. काउन्सिलचा १७ सदस्यीय संचालक मंडळासोबत व डच प्रजासत्ताकातील इतर संस्थांसोबतचा पत्रव्यवहारही या संग्रहात उल्लेखनीय जागा व्यापतो. त्याशिवाय कंपनीच्या अन्य वसाहतींशी केलेला पत्रव्यवहारही यात मोठ्या संख्येने उपलब्ध आहे.

यासोबतच के. ४८ (K. 48) क्रमांकाच्या पत्रसंग्रहात परकीय शासकांसोबतचा पत्रव्यवहार समाविष्ट आहे. या विभागात पत्रांच्या मूळ प्रती उपलब्ध असून त्या मलय, मराठी, फार्सी, तेलुगु, तमिळ इत्यादी आशियायी भाषांमध्ये आहेत. तमिळनाडूचा दक्षिण भाग, उदा., तिरुनेलवेली, तूतुकुडी (तुतिकोरिन), इ. शी संबंधित काही पत्रे तमिळमध्ये आहेत. श्रीलंकेतील कँडीच्या राज्याशी केलेले काही करारमदारही असून, श्रीलंकेतीलच जाफना, गॅले, त्रिंकोमाली, मुल्लैतिवु, बट्टिकालोआ, मन्नार, कल्पिटिया, मतारा, चिलाव, इत्यादी ठिकाणांशी केलेला पत्रव्यवहारही त्यात समाविष्ट आहे. आशिया खंडातील इंग्रज, फ्रेंच, इ. यूरोपीय सत्तांशी गव्हर्नर जनरलच्या पत्रव्यवहारासकट आंध्रप्रदेशच्या किनारी भागात, उदा., बिमलीपट्टणम येथे स्थानिकांशी केलेला तेलुगु, तसेच यूरोपियनांशी केलेला इंग्लिश व फ्रेंच भाषक पत्रव्यवहार आहे. यासोबतच कोरोमंडल भागात डच ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. १६१२–१७५३ मध्ये केलेल्या करारमदारांचेही काही खंड आहेत. याबरोबर तंजावरकर मराठे आणि पेशवे यांसोबतचा मोडी लिपीतील पत्रव्यवहारही आहे. हा पत्रव्यवहार इ. स. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील असून, यांपैकी काही पत्रे सोन्याची नक्षी असलेल्या विशिष्ट उच्चप्रतीच्या कागदावर आहेत. ही मराठ्यांनी कंपनीस उद्देशून लिहिलेली मोडी लिपीतील पत्रे असून इ. स. १७८८-९२ मधील आहेत. अनेक डच वसाहती अखेरीस ब्रिटिशांकडे हस्तांतरित कराव्या लागल्या, तेव्हा वसाहतींची माहिती देणारीही अनेक साधने आहेत. कंपनीच्या कागदपत्रांखेरीज अनेक व्यक्ती व कुटुंबांचे कागदपत्रही या दफ्तरात असून, त्यांमधील वैविध्य उल्लेखनीय आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित अनेक कागदपत्रे जगभर विविध अभिलेखागारांमध्ये विखुरलेली आहेत. त्यांपैकी नेदरलँड्समधील द हेग व इंडोनेशियातील जाकार्ता येथील अभिलेखागारे आकाराने सर्वांत मोठी आहेत.

संदर्भ :

  • Bes, Lennart & Kruijtzer, Gijs, Dutch Sources on South Asia, Volume 3, Manohar Publishers, New Delhi, 2015.

                                                                                                                                                                                    समीक्षक : सचिन जोशी