परकीय व्यापारी असलेल्या डचांनी दक्षिण भारतातील पाँडिचेरी (पुदुच्चेरी) ताब्यात घेण्यासाठी केलेला संघर्ष. या निमित्ताने डच-मराठे-फ्रेंच यांच्यात हा संघर्ष घडून आला (१६९१-९३). यूरोपातील नववार्षिक युद्ध (इ. स. १६८८–१६९७) हे फ्रान्स व त्याच्या शत्रूराष्ट्रांत झाले. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यूरोपाखेरीज आशिया व अमेरिका खंडांतही हे युद्ध खेळले गेले. त्या अंतर्गत भारतातही डच व फ्रेंचांमध्ये लढाया झाल्या. या युद्धाची बातमी २२ मे १६८९ रोजी Tuymelaer या जहाजाद्वारे भारतात पोहोचली. त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनीच्या कोरोमंडल भागाचा गव्हर्नर लॉरेन्स पिट पर्यंत ही बातमी अधिकृत रीत्या पोहोचली व अखेरीस भारतातील डच वसाहतींचा कमिशनर हेंड्रिक एड्रियन फान ऱ्हीड याने जाहीर केले की, डचांनी कोरोमंडल भागातील फ्रेंच वसाहतींवर हल्ला करून त्यांचा व्यापार नेस्तनाबूत करावा. या मागे १६७२-७८ च्या फ्रँको-डच युद्धाचीही पार्श्वभूमी होती.

पाँडिचेरीजवळ फ्रेंच जहाजांच्या लहानशा ताफ्यावर हल्ला करण्याची योजना लॉरेन्स पिटने आखली (ऑगस्ट १६९०); परंतु त्याचे स्वत:चे बळ कमी असल्याने तो मद्रासला (चेन्नई) जाऊन तेथील इंग्रजांवर विसंबून राहिला. इंग्रजांनीही या युद्धात फ्रेंचांविरुद्ध भाग घेतल्याने त्यांच्या जहाजांची फ्रेंच ताफ्यासोबत एक अनिर्णीत लढाई झाली व पाँडिचेरीवर डचांचा ताबा येण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली. नेदरलँड्समधील डच ईस्ट इंडिया कंपनीच्या १७ सदस्यीय संचालक मंडळाने बटाव्हियाला (इंडोनेशिया) यासंबंधी पत्रे पाठवली (१६९२). युद्धाकरिता फ्रान्सहून भारतात जहाजे येणार असल्याच्या अफवेमुळे डचांनी सुरतेला जाणाऱ्या दोन जहाजांचे संरक्षण करण्यासाठी कॅप्टन सायमन फान डेन बुर्ख याच्या अध्यक्षतेखाली दहा जहाजे पाठवली. प्रत्यक्षात भारतात येणाऱ्या फ्रेंच जहाजांची संख्या कमी असल्यामुळे ही दहा संरक्षक जहाजे व बटाव्हियाने पाठवलेली (१६९३) अजून नऊ अशी एकूण १९ जहाजे पाँडिचेरीवरील हल्ल्याकरिता वापरली गेली.

याच सुमारास भारतात मोगल-मराठे युद्ध सुरू होते. तत्कालीन मोगल बादशाह औरंगजेब पूर्ण सैन्यानिशी दख्खनमध्ये उतरला होता. १६८६ मध्ये आदिलशाही व १६८७ मध्ये कुत्बशाही ही दोन राज्ये गिळंकृत करण्यासोबतच त्याने मराठ्यांशीही संघर्ष आरंभला होता. १६९० पासून १६९७ पर्यंत जिंजी ही मराठेशाहीची राजधानी होती. सर्व महत्त्वाचे निर्णय तेथूनच होत होते.

या पार्श्वभूमीवर डच व फ्रेंचांच्या मराठ्यांशी वाटाघाटी झाल्या. फ्रेंचांशी मराठे व मोगल दोघांनीही संपर्क साधला. सर्वप्रथम मोगल अधिकाऱ्यांनी मराठ्यांविरुद्ध दारुगोळ्याखेरीज काही किल्ल्यांवर हल्ला करण्यासाठी फ्रेंचांची मदत मागितली; परंतु फ्रेंचांनी तटस्थ राहणेच पसंत करून त्याला नकार दिला. परिणामी पाँडिचेरीवर हल्ल्याची धमकीही मोगलांनी दिली; परंतु फ्रेंचांची युद्धसज्जता पाहून त्यांनी माघार घेतली. या दरम्यान कृष्ण अंताजी (बखरकार कृष्णाजी अनंत) या अधिकाऱ्याने विल्लनूर येथे मोगलांचा पराभव केला (१६९१) व एका मोगल अधिकाऱ्याला व काही फ्रेंच शिपायांनाही कैद केले. त्याच्या सांगण्यावरून फ्रेंचांनी त्याला काही भेटवस्तू दिल्या. तत्कालीन पाँडिचेरीचा फ्रेंच प्रमुख फ्रान्स्वा मार्टिनने फ्रेंच शिपायांची सोडवणूक करून तटस्थतेच्या धोरणांतर्गत मोगलांनाही काही भेटवस्तू पाठवल्या. या भेटवस्तू मराठ्यांनी ताब्यात घेतल्या व काही काळ फ्रेंचांविरुद्ध पावले न उचलण्याबद्दल विचार केला; परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. यानंतर १६९२ मध्ये धर्माजी नामक एक मराठ्यांचा सरदार ९०० घोडदळ आणि ३०० पायदळासह पाँडिचेरीनजीक आला आणि पाँडिचेरीत प्रवेशाची अनुमती मागितली; परंतु त्याला नकार मिळाला. त्याने मोगलांचा पराभव करण्यासाठी फ्रेंचांची मदत मागितली. त्यानुसार असे ठरले की, अधिक मोठ्या सैन्यबळासह मराठ्यांनी पाँडिचेरीबाहेरच्या ताडाच्या बागांत लपावे आणि तोफेचा एक बार काढून दुरून येणाऱ्या मोगल सैन्याविषयी फ्रेंचांनी मराठ्यांना सावध करावे. याप्रमाणे किमान दोन वेळेस फ्रेंचांनी सावध केल्यानंतर मराठ्यांनी मोगलांचा पराभव केला.

यानंतर फ्रान्स्वा मार्टिनला छत्रपती राजाराम महाराजांचे प्रधान प्रल्हाद निराजींकडून एक पत्र आले. यात मोगलांविरुद्ध मदत केल्याबद्दल फ्रेंचांची स्तुती केली होती, शिवाय फ्रेंचांबद्दल छ. राजाराम महाराजांच्या मनात काही पूर्वग्रह असल्याचाही उल्लेख होता. १६९२ नंतर पाँडिचेरीजवळून मोगल सैन्य हटल्यावर मात्र मराठ्यांनी फ्रेंचांकडे पैशाचा तगादा लावला. मराठ्यांना तेव्हा पैशाची मोठी निकड व चणचणही होती. फ्रेंचांनी कर्जाऊ रक्कम न दिल्यास आनंदराव नामक मराठी सरदाराने पाँडिचेरीवर हल्ला करण्याची धमकीही दिली. हा धोका टाळण्यासाठी आनंदराव आणि कृष्ण अंताजी यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय फ्रेंचांनी घेतला; परंतु याच सुमारास डचांनीही प्रल्हाद निराजींशी संधान बांधून दर आठवड्यास जिंजीला भेटवस्तू पाठवणे सुरू केले. त्यामुळे मराठे डचांच्या बाजूने झाले. यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी एका फ्रेंच डॉक्टरला जिंजीला बोलावले. त्याच्याकरवी फ्रेंचांना अनेक गोष्टी समजल्या. छ. राजाराम महाराजांनी कळवले की, २५,००० इतकी रक्कम जर फ्रेंचांनी एका आठवड्यात मराठ्यांना दिली, तर मराठे डचांऐवजी फ्रेंचांना झुकते माप देतील. याबद्दलच्या वाटाघाटी करण्यासाठी जर्मेन नामक फ्रेंच अधिकारी जिंजीस गेला. त्याने जुने कागदपत्र दाखवले आणि तंजावरकर शहाजी महाराजांतर्फेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेव्हा मराठ्यांनी आपली मागणी २८,००० पगोडे इतकी वाढवली होती आणि डचांनी दिलेल्या भेटवस्तूंमुळे फ्रेंचांचे कुणी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

डचांनाही याआधी तेगेनपटनमवरील आपला ताबा सोडून द्यावा लागला होता. १६९३ मध्ये लढाऊ ताफा पाँडिचेरीस आल्यावर डच व मराठ्यांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. पाँडिचेरीवर ताबा हवा असल्यास डचांनी कमीतकमी ७५,००० पगोडे मराठ्यांना द्यावेत, अशी मागणी प्रथम करण्यात आली. त्याखेरीज आसपासचा प्रदेशही हवा असल्यास ३ लाख़ पगोडे द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली. अखेरीस मराठ्यांनी आपली मागणी कमी केली व २५,००० पगोड्यांवर एकमत झाले. यांपैकी २०,००० पगोडे खुद्द छ. राजाराम महाराजांना व उरलेले ५,००० हे प्रल्हाद निराजी आणि कृष्ण अंताजी यांना देण्याचे ठरले. यांपैकी एकचतुर्थांश रक्कम ही डच सैन्य पाँडिचेरीस पोहोचल्यावर, एकचतुर्थांश रक्कम ही वेढा चालू असताना आणि उरलेली अर्धी रक्कम पाँडिचेरी काबीज झाल्यावर अशा तीन भागांत विभागून द्यावयाची होती. या दरम्यान फ्रेंचांनी ३३,३३३ पगोडे देण्याची तयारी दर्शवून आणि स्वर्णोजी नाईक नामक मराठी सरदाराने फ्रेंचांना हमी देऊनही उपयोग झाला नाही. डचांच्या अधिक सामर्थ्यामुळेही मराठ्यांनी अखेरीस त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा.

अखेरीस ३० ऑगस्ट १६९३ रोजी डचांनी हल्ला सुरू केला. डच सैन्यात एकूण १५७९, तर फ्रेंच सैन्यात ६०० सैनिक होते. ८ सप्टेंबर १६९३ रोजी फ्रेंचांनी पाँडिचेरीचा किल्ला डचांच्या स्वाधीन केला. किल्ला ताब्यात घेतल्यावर डचांनी आसपासच्या प्रदेशाची पाहणी सुरू केली. त्यांच्या ताब्यातील प्रदेश एकसलग नसून अनेक ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर होती. हे पसंत न पडल्याने कोरोमंडलचा गव्हर्नर लॉरेन्स पिटने किल्ल्यापासून ३ किमी. त्रिज्येच्या प्रदेशावर खांब रोवून खुणा केल्या. विल्लनूर येथील मराठी अधिकारी धर्माजीला हे पसंत न पडल्याने त्याने हे खांब उखडून टाकले; परंतु यात त्याला अन्य मराठे सरदारांनी विरोध केला आणि स्वत: छ. राजाराम महाराजांनीही २००० पगोडे रक्कम मिळाल्यास ३ किमी. त्रिज्येच्या प्रदेशावरील डच मालकी अबाधित राहील, अशी ग्वाही दिली.

अशाप्रकारे डचांना पाँडिचेरीचा ताबा मिळाल्यावर त्यांनी त्याचा किल्ल्याऐवजी एक सर्वसामान्य व्यापारी वखार म्हणून वापर केला. छ. राजाराम महाराजांनी त्यांना स्वत:ची नाणी पाडायची परवानगीही दिली. ही नाणी तांब्याची असून, त्यावर पुदुचेरी असा मजकूर तमिळ लिपीत लिहिलेला आहे. अखेरीस १६९९ मध्ये रिसविकच्या तहान्वये फ्रेंचांना पाँडिचेरी परत मिळाले.

संदर्भ :

  • Bellarykar, Nikhil, ‘Negotiating alliances in the face of adversity -tracing the Maratha preferences before and during the Dutch takeover of Pondicherry during 1693ʼ, Quarterly of the Bharat Itihas Samshodhak Mandal, Year 95, Vols. 1-4, Pune, India, 2018-19.

                                                                                                                                                                            समीक्षक : सचिन जोशी