शार्पे, विल्यम एफ. (Sharpe William F.) : (१६ जून १९३४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रविषयातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वित्तव्यवस्थापन विषयाचा प्राध्यापक असलेल्या शार्पे यांना १९९० मध्ये हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)मर्टन एच. मिलर (Merton H. Miller) या अमेरिकन अर्थतज्ज्ञांबरोबर वित्तीय अर्थशास्त्र व गुंतवणूकप्रणाली विकसित करण्याबद्दल अर्थशास्त्रविषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शार्पे यांचा जन्म केंब्रिज-मॅसॅच्यूसेट्स या शहरात झाला. त्यांचे वडील नॅशनल गार्ड या पदावर कार्यरत असल्याने दुसरे महायुद्ध (World War Second) दरम्यान देशभर भ्रमंती करीत शेवटी कॅलिफोर्निया राज्यातील रिव्हरसाइड येथे स्थायिक झाले. शार्पे यांचे बालपण व शालेय शिक्षण याच शहरात झाले. १९५१ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कली येथे वैद्यकीय पदवीसाठी त्यांनी प्रवेश घेतला; परंतु पहिल्याच वर्षी त्यांनी विचार बदलला व व्यवसायप्रशासन विषयाच्या अध्ययनासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजल्स येथे प्रवेश घेतला. तेथेही हिशेबशास्त्रविषय न आवडल्याने ते पुन्हा अर्थशास्त्रविषयाकडे वळले. यूसीएलए विद्यापीठात असताना थेटा व फी बेटा कप्पा सोसायटी या संशोधनकार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संघटनांचा ते सदस्य झाले. सदर विद्यापीठातून त्यांनी १९५५ मध्ये अर्थशास्त्र विषयातील बी. ए. व १९५६ मध्ये एम. ए. या पदव्या प्राप्त केल्या. पुढे त्याच विद्यापीठातून प्रतिभूती (रोखे) मूल्यनिर्धारण व बाजारपेठ या विषयावर प्रबंध लिहून १९६१ मध्ये पीएच. डी. ही पदवी मिळविली.

शार्पे यांनी १९५६–१९६१ या काळात डॉक्टरेटसाठी संशोधन करीत असतानाच रँड कार्पोरेशन या संस्थेत नोकरी पतकरली. पीएच. डी.नंतर लगेचच ते सियाटल येथील वॉशिंग्टन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तसेच १९६८ मध्ये ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, अरवीन येथे अध्यापन केले. तेथे दोन वर्षे अध्यापन केल्यानंतर १९७० मध्ये ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात रुजू झाले. आपल्या औपचारिक निवृत्तीपर्यंत अध्यापन केल्यानंतर तेथेच त्यांची वित्तव्यवस्थापन विषयाचे मानद प्राध्यापक-संशोधक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी १९८० मध्ये स्वत: स्थापन केलेल्या विल्यम शार्पे असोसिएशन या संस्थेचेही ते काम पाहात आहेत. १९६६ मध्ये त्यांनी गुंतवणूक प्रणालीसंदर्भात तांत्रिक सल्ला देणारी फायनॅन्शिअल इंजिन्स ही संस्था सुरू केली. त्यांनी अमेरिकन फायनॅन्शिअल असोसिएशन या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले.

शार्पे यांनी १९६० मध्ये स्वतंत्रपणे भांडवल-मालमत्ता, द्विपदी (Binocular) सांख्यिकी मूल्यनिर्धारण प्रणाली (Capital – Asset Pricing Model) विकसित केली. जोखीमयुक्त मालमत्ता गुंतवणुकीचे मिश्र पर्याय उपलब्ध असतील, तर गुंतवणूकदारांना त्यांपैकी फायदेशीर पर्यायाची निवड करणे सुलभ होते. ज्यांना अधिक उत्पन्नाचा हव्यास असतो, ते जोखीमयुक्त मालमत्तांतील (रोख्यांतील) गुंतवणुकीला जादा प्राधान्य देतात; तर जे कमी उत्पन्नाची अपेक्षा ठेवतात, ते बँक मुदत ठेवसारख्या सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याबरोबरच गुंतवणुकीला संभाव्य जोखमीचे अंदाज वर्तवण्याचे तंत्रही त्यांनी विकसित केले. स्टॅनफोर्ड विद्यापीठात अध्यापनाबरोबरच गुंतवणूकक्षेत्रातील विविध संधीसंबंधीचे संशोधन त्यांनी चालू ठेवले. तेथे त्यांनी  गुंतवणूकविभाजन (Portfolio Allocation) व निवृत्तिवेतननिधीची गुंतवणूक यांबाबत विशेष संशोधन केले. मे-रीन लिंच ॲण्ड वेल्स फार्गो यांसारख्या प्रख्यात गुंतवणूकपेढ्यांना मोलाचा सल्ला त्यांनी दिला. सदर पेढ्यांच्या माध्यमातून आपल्या आर्थिक सिद्धांतांना-प्रणालीला व्यवहारात आणण्याची संधी त्यांना लाभली. १९८६ मध्ये फ्रँकरसेल कंपनीच्या सहकार्याने त्यांनी शार्पे-रसेल रिसर्च या नावाने पेढी स्थापन केली. त्या पेढीद्वारे गुंतवणूकविषयक संशोधन व मार्गदर्शन करण्याचे काम चालू ठेवले. सध्या ते  इकॉनॉमिस्ट ऑफ पीस ॲण्ड सेक्युरिटी या संघटनेचा विश्वस्त म्हणून काम पाहात आहे.

https://www.youtube.com/watch?v=hk13eB1Eix8

शार्पे यांचे स्वत: लेखक व सहलेखक म्हणून लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : बेसिक : ॲन इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर प्रोग्रामिंग यूजिंग दि बेसिक लँग्वेज (१९६७), दि इकॉनॉमिक्स ऑफ कॉम्प्युटर (१९६९), पोर्टफोलिओ थिअरी ॲण्ड कॅपिटल मार्केट (१९७०), इज फायनान्सियल ॲनालिसीस युजलेस? : दि प्रोसीडिंग्ज ऑफ ए सेमिनॉर ऑन दि इफिशंट कॅपिटल मार्केट ॲण्ड रॅण्डम वॉक हायपोथेसिस (१९७५), इन्व्हेस्टमेन्ट (१९७८), असेट अलोकेशन टूल्स (१९८७), लीन्स गाइड टू स्टँप कलेक्टिंग सॉफ्टवेअर ॲण्ड कलेक्टिंग ऑन (१९९७), इन्व्हेस्टमेन्ट (१९९९–सहलेखन), फंडामेंटल्स ऑफ इन्व्हेस्टमेन्ट (२०००–सहलेखन), इन्व्हेस्टमेन्ट थर्ड कॅनेडियन एडिशन इन्स्ट्रक्टर्स मॅन्युअल विथ सोल्यूशन (२००२), विल्यम एफ. शार्पे : सिलेक्टेड वर्क्स (२०१२). शिवाय त्यांचे अनेक संशोधनपर लेख नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.

शार्पे यांना नोबेल पुरस्काराबरोबरच त्यांच्या अर्थशास्त्रातील संशोधनकार्याबद्दल व अर्थशास्त्रातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल यूसीएल विद्यापीठाचे मेडल तसेच डेपॉल (Chicago) अलिकान्ते (Spain), व्हिएन्ना विद्यापीठ (Austria) यांच्याकडून मानद डॉक्टरेट्स आणि डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स किताबाने सन्मानित करण्यात आले.

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा