पुष्य नक्षत्र : नक्षत्र चक्रातील पुष्य हे आठवे नक्षत्र आहे. कर्क राशीत या नक्षत्राचा समावेश होतो. कर्क हा तसा अतिशय अंधुक तारकासमूह आहे. यातील कुठल्याही ताऱ्यांची दृश्यप्रत 4 पेक्षा जास्त नाही. त्यातील डेल्टा कँक्री (असेलस ऑस्ट्रॅलिस) तारा हा नेमका आयनिक वृत्तावर आहे . त्या ताऱ्याकडून एकमेकींशी साधारण १२० अंशांच्या कोनात उत्तरेस एक (गॅमा ते आयोटा ताऱ्यांपर्यंत) तर दक्षिणपूर्वेस (अल्फापर्यंत) आणि दक्षिणपश्चिमेस (बीटापर्यंत) अशा दोन रेषा काढल्या, तर कर्क राशीतील मुख्य ताऱ्यांपर्यंत पोहोचतात. यातला डेल्टा तारा म्हणजेच पुष्य नक्षत्राचा योगतारा. या ताऱ्याच्या जवळ कर्केतला सुप्रसिद्ध खुला तारकागुच्छ आहे, ज्याला ‘मधाचे पोळे’ किंवा ‘प्रेसेप – बी हाइव्ह’ असे म्हणतात. मेसिएच्या यादीत त्याला ‘M 44’ म्हणतात किंवा न्यू जनरल कॅटलॉगमध्ये ‘NGC 3632’. डेल्टा हा तारा आपल्या पासून सु. १३१ प्रकाश वर्षे दूर आहे. हा नारिंगी रंगाचा राक्षसी तारा असून सूर्यापेक्षा ५३ पट जास्त तेजस्वी आणि आकारमानाने सूर्यापेक्षा ११ पट मोठा तारा आहे. त्याची दृश्यप्रत +३.९ आहे.
कर्क राशीसंबंधी ग्रीक पुराणात ‘हर्क्युलस’ बाबत एक मजेदार कथा आहे. कर्क म्हणजे खेकडा अशी बहुतेक सगळीकडे समजूत आहे. पण इजिप्शिअन लोकांनी कर्केत खेकड्या ऐवजी ‘भृंग=भुंगा’ आहे अशी कल्पना केलेली दिसते. गुरु हा ग्रहमालेतील पाचवा आणि मोठा ठळक दिसणारा ग्रह वैदिक काळात वामदेव या ऋषींना प्रथम पुष्य नक्षत्राजवळ दिसला. तो तारका नव्हे, तर तो ग्रह आहे हे त्यांना त्याच्या स्थान बदलावरून समजून आले, असा उल्लेख तैत्तिरीय उपनिषदातील एका श्रुती मध्ये येतो. याच कारणासाठी गुरूला पुष्याचा अधिपती मानले जाते, तर पुष्याला गुरूचे जन्मस्थान मानले जाते.
गुरुवारी जर चंद्र पुष्य नक्षत्रात असेल, तर त्याला पंचांगात गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात.
समीक्षक : आनंद घैसास