पौर्णिमा : चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावरून परावर्तित झाल्यामुळे आपल्याला चंद्र प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो. खरे तर पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांसोबत फेरी घेत सूर्याभोवती फिरत आहेत. चंद्राच्या परिभ्रमणातील त्याच्या पृथ्वीच्या संदर्भात असणाऱ्या विविध स्थानांमुळे त्यावर पडणाऱ्या प्रकाशित भागाचेच दर्शन आपल्याला होत असते. त्यामुळेच आपल्याला चंद्राच्या विविध कला दिसतात. जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो त्या स्थितीला अमावास्या, तर जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते त्या स्थितीला आपण पौर्णिमा म्हणतो. चंद्राच्या सातत्याने होणाऱ्या चलनातील पौर्णिमा किंवा अमावास्या हे दोन्ही एक विशिष्ट स्थिती येणारे क्षण आहेत. या स्थिती दिवसाच्या २४ तासात कधीही येऊ शकतात. त्यामुळे पौर्णिमेचा किंवा अमावास्येचा (त्या तिथीचा) कालावधी नेहमी वेगळ्या वेळी सुरू होतो आणि वेगळ्या वेळी संपतो. हे आपल्याला पंचांगावरून समजू शकते. जर सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा (चंद्राच्या स्थितीनुसार; तिथीनुसार) असेल, तर तो दिवस पौर्णिमेचा आहे असे समजतात. जर सूर्योदयाच्या वेळी अमावास्या (चंद्राच्या स्थितीनुसार; तिथीनुसार) असेल, तर तो दिवस अमावास्येचा आहे असे समजतात.

पौर्णिमा : पौर्णिमेच्या स्थितीमध्ये चंद्राच्या पृथ्वीकडील संपूर्ण पृष्ठभागावर सूर्यकिरण पडल्यामुळे आपल्याला तो पूर्ण भाग दिसतो. या स्थितीमध्ये सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असते. यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील कोन १८० अंश असतो, म्हणजेच ते प्रतीयुतीमध्ये असतात. दोन एकापाठोपाठ येणाऱ्या पौर्णिमांमधील कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा असतो. या कालावधीला आपण चांद्रमास अथवा महिना असे म्हणतो.

ज्या पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अनुक्रमे एका रेषेत येतात, तेव्हा आपल्याला चंद्रग्रहण दिसू शकते. परंतु प्रत्येक पौर्णिमेला मात्र चंद्रग्रहण दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्राच्या भ्रमणकक्षेचे प्रतल आणि आयनिक वृत्त म्हणजे सूर्याचा भासमान मार्ग या प्रतलांमध्ये सुमारे ५९’ (५ अंश ९ मिनिटे) एवढा कोन आहे. या प्रतलांच्या तिरपेपणामुळे जरी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेत आले, तरी दरवेळी ते एका प्रतलात येत नाहीत.  ही दोन्ही प्रतले एकमेकांना दोन ठिकाणी छेदतात. या दोन बिंदूंना पातबिंदू असे म्हणतात, तसेच आपण त्यांना राहू आणि केतू असेही म्हणतो. जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यातील पातांच्या एका पातबिंदूच्या सरळ रेषेत, अर्थात एका प्रतलात आले, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल अशी स्थिती निर्माण होते. पृथ्वीच्या सावलीत चंद्र येतो आणि चंद्रग्रहण होते.

पृथ्वीची सावली ही गडद छाया व उपछाया (विरळ छाया) अशी दोन प्रकारची असते. चंद्रग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीच्या ज्या छायेमधून प्रवास करताना दिसतो, त्यावरून चंद्रग्रहण कसे दिसेल ते ठरते. पृथ्वीच्या दोन्ही सावल्यांचा व्यास हा चंद्राच्या व्यासापेक्षा आकाराने बराच मोठा आहे. अर्थात, संपूर्ण चंद्रबिंब कोणत्याही सावलीत सापडू शकते. चंद्र पातबिंदूपासून अधिक दूर असेल, तर तो फक्त विरळ सावलीतूनच जातो. या चंद्रग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. पृथ्वीच्या विरळ छायेत असल्याने हे ग्रहण डोळ्यांना फारसे जाणवत नाही. मात्र चंद्र पूर्णपणे गडद छायेमध्ये आला तर खग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा काही भाग विरळ छायेत आणि काही भाग जर गडद छायेत असेल तर खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.

दर पौर्णिमेला पात रेषेवर चंद्र असत नाही. त्यामुळे पृथ्वीची सावली दर पौर्णिमेला चंद्रावर पडत नाही. अर्थात, दर पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही.

आपल्याला दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रबिंबाचा आकार दरवेळी समान दिसत नाही. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करतो. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर नेहमी बदलत असते. तो कधी पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे उपभू स्थानी असतो (३,६३,३०० ते ३,५६,४०० किमी अंतरावर) तर कधी तो सर्वात दूर म्हणजे अपभू स्थानी (४,०६,१०४ ते ४,०६,७०० किमी अंतरावर) असतो. जेव्हा चंद्र उपभू स्थानी असतो तेव्हा चंद्रबिंब हे सर्वात मोठे दिसते आणि या वेळी जर पौर्णिमा असेल, तर त्याला ‘महाचंद्रबिंब’ (सुपर मून) म्हणतात. या चंद्रबिंबाची तेजस्विता देखील अशा वेळी अधिक दिसते. तसेच एका इंग्रजी महिन्यात जर दोनदा पौर्णिमा आली, तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रबिंबाला नीलचंद्र (ब्लू मून) असे म्हणतात.

एका चांद्रवर्षामध्ये बारा पौर्णिमा येतात, म्हणजेच बारा महिने असतात. या बारा महिन्यांची भारतीय नावे आणि पौर्णिमा यांचा जवळचा संबंध आहे. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचे चंद्रबिंब ज्या नक्षत्राच्या सन्निध दिसते, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव दिले जाते. उदा., पौर्णिमेचे चंद्रबिंब जेव्हा चित्रा नक्षत्राजवळ असते, त्या महिन्याला चैत्र महिना असे नाव दिले गेले आहे. याचे एक कोष्टक सोबत दिले आहे.

चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला समुद्राच्या भरती-ओहोटीचे परिणाम अनुभवास येतात. पौर्णिमेच्या वेळेस भरतीची सर्वोच्च पातळी असते तिला ‘उधाणाची भरती’ असे म्हणतात.

प्राचीन काळापासून पौर्णिमेला खास महत्त्व आहे. अनेक धर्मांमध्ये विविध पौर्णिमा प्रसिद्ध आहेत. चैत्री पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून साजरी होते. अनेक ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्राही चैत्र महिन्यात साजऱ्या होतात आणि त्यांची सांगता चैत्री पौर्णिमेला असते. चैत्र महिन्यात शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौरी पूजन आणि हळदीकुंकू समारंभ करण्याचीही राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक ज्ञातींमध्ये रूढी आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री पुजली जाते. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा तर श्रावण पौर्णिमेला राखीपौर्णिमा आणि नारळीपौर्णिमा साजरी होते. भाद्रपद पौर्णिमा ही पितरांच्या शांतीसाठी पूजनीय मानली जाते. अश्विन पौर्णिमेला कोजागिरी साजरी होते. कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. फाल्गुनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. अशा प्रकारे भारतीय लोक प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही उत्सव साजरा करतात.

जैन व बौद्ध धर्मीय लोकदेखील पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या महत्त्व देतात.

उत्तर भारतात चांद्रमास हा पौर्णिमान्त म्हणजे महिन्यातला शेवटचा दिवस पौर्णिमेचा, तर महाराष्ट्रात अमावास्यान्त महिना म्हणजे अमावास्या हा चांद्रमासाचा शेवटचा दिवस धरला जातो.

संदर्भ :

  • खग्रास, प्रदीप नायक, मुंबई
  • चंद्रलोक, प्रा. मोहन आपटे, पुणे

समीक्षक : आनंद घैसास