कर्करोग हा अनेक रोग एकत्र येऊन झालेला असतो. त्यामुळे या रोगात कोणतेही लक्षण दिसू शकते. त्याचप्रमाणे कर्करोगाची व्याप्ती किती आहे आणि त्याने किती अवयवांना अथवा इंद्रियांना धोका पोहोचवला आहे, त्यावर कर्करोगाची लक्षणे अवलंबून असतात. जर कर्करोग मूळ इंद्रियापासून इतरत्र पसरला असेल, तर त्याची लक्षणे इतर अवयवांत दिसून येतात.
अनेक वेळा जिथे कर्करोगाची सुरुवात होते, तिथे तो रोग बराच वाढल्याशिवाय त्याची काहीच चिन्हे अथवा लक्षणे दिसत नाहीत. उदा., स्वादुपिंडाचा कर्करोग. स्वादुपिंडामध्ये जर कर्करोग सुरू झाला, तर त्याची काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु तेथे त्याची वाढ भरपूर प्रमाणात झाली आणि त्यामुळे त्याने मज्जारज्जू व पित्ताच्या नलिकांवर ताण पडला तसेच त्यामुळे त्या बंद झाल्या, तर डोळे व त्वचा पिवळी पडते (कावीळ झाल्यामुळे). परंतु त्यावेळी त्या रोगाची अवस्था पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली असते. अशा वेळी हा कर्करोग झाल्याचे कळते.
कर्करोगाची सामान्य लक्षणे : एखाद्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसून आली तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
(१) अनावश्यक शारीरिक वजनातील बदल : आपले वजन संतुलित राहावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषांना वाटत असते. परंतु त्यासाठी काहीही उपाय करत नसताना (अन्न कमी घेणे किंवा व्यायाम करणे) जर वजन कमी होत असेल, म्हणजे ४ ते ५ किग्रॅ. वजन जर एका महिन्यात कमी होत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. अर्थात थायरॉइड ग्रंथींमुळेसुध्दा हा बदल होऊ शकतो. परंतु वैद्यकीय परीक्षण आवश्यक आहे.
(२) अशक्तपणा किंवा थकवा : थकवा येणे ही अनेक व्याधींचे वा रोगांचे लक्षण आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार कर्करोगाची सुरुवात होत असताना, वाढ होत असताना थकवा जाणवू शकतो. रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया) अथवा बृहदांत्र किंवा जठराचा कर्करोग झाला असता फार मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे अधिक प्रमाणात रक्त गुदद्वारापासून बाहेर फेकले गेल्याने प्रचंड थकवा येऊ शकतो.
(३) कठीण गाठ स्तनाच्या भागात अगर शरीरात इतरत्र कोठेही आढळून येणे : शरीराच्या एखाद्या भागावर जर एखादी गाठ आली, तर ती फारशी त्रासदायक नसते आणि ती कर्करोगाची असतेच असे नाही. परंतु वैद्यांकडून त्याची तपासणी करून घेणे गरजेचे असते. ही गाठ कर्करोगाची अथवा लसीका ग्रंथींना बाधा झाल्यामुळे निर्माण झालेली असू शकते.
(४) लसिका ग्रंथींची वाढ : काखेतील अथवा मानेजवळील लसिका ग्रंथी (Lymph node) जर वाढल्या आणि त्या सतत जर वाढत आहेत असे जर आपल्याला वाटले; तसेच हे जर ४-६ आठवड्यापर्यंत घडत आहे, असे आपल्या लक्षात आले, तर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
(५) त्वचेमध्ये होणारे बदल : शरीरावर चामखीळ असेल अथवा तीळ असेल आणि जर त्याच्या आकारमानात बदल झाला तर ते कर्करोगाचे लक्षण आहे हे अनेक स्त्रियांना माहिती असते. परंतु त्वचेच्या रंगात घडून आलेला बदल विशेषत: तिचे काळे पडणे याकडे स्त्रिया लक्ष देत नाहीत, हे चुकीचे आहे. जर त्वचेवर अनेकदा रक्तप्रवाह दिसत असेल किंवा त्वचेवर खवले दिसून आले आणि ते काही आठवडे झाले तरीसुध्दा गेले नाहीत, तर तातडीने तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
बरा न होणारा फोड, भरून न येणारी जखम तसेच गुप्तांगाच्या अथवा गुदद्वाराजवळ सतत खाज सुटणे हे सुद्धा त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
(६) गिळताना त्रास होणे : जर गिळताना त्रास होत असेल तर आपण कोरडे अन्न न खाता अथवा ज्या अन्नासाठी आपणाला फार चावावे लागणार नाही असे अन्न न खाता आपण रस अथवा पाणी जास्त असलेले पदार्थ वा अन्न खातो. परंतु सातत्याने जर गिळताना त्रास होतो आहे असे आपल्या निदर्शनास आले, तर ते अन्ननलिकेच्या कर्करोगाचे लक्षण आहे हे ओळखून आपण तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा वेळी कर्करोगाची शहानिशा करण्याकरिता रुग्णाच्या छातीचे क्ष-किरण चित्रण करण्यात येते. तसेच अन्ननलिकेची अंतर्दर्शन चिकित्सा (Endoscopy) करून कर्करोगाचे निदान केले जाते.
(७) सातत्याने होणारे अपचन : गरोदरपणाशिवाय जर स्त्रियांमध्ये सातत्याने अपचन होत असेल तसेच पुरुषांमध्ये देखील अनेकदा अपचनाचा त्रास होत असेल; तर तो अन्ननलिकेचा, पोट अथवा घसा या इंद्रियांच्या कर्करोगाचे लक्षण आहे. याबाबत ताबडतोब निदान करून घेणे गरजेचे आहे.
(८) रक्तस्राव : ज्या अवयवांमध्ये अथवा इंद्रियांमध्ये कधीही रक्तस्राव होत नाही अशा ठिकाणी जर कारण नसताना जखम न होता जर रक्तस्राव झाला, जर खोकल्यातून रक्त पडणे, थुंकीतून रक्त पडणे, गुदामधून रक्त पडणे, अथवा लघवीतून रक्त पडणे हे जर घडले तर ताबडतोब कर्करोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.
अनेक वेळा लघवीतून रक्तस्राव होणे हे मूत्राशयाच्या अथवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असते. गुदद्वारातून रक्तस्राव होणे हे मोठ्या आतड्याच्या आणि थुंकीतून रक्तस्राव होणे हे फुप्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे.
(९) सातत्याने येणारा खोकला : सामान्य व्यक्तीला जर फ्ल्यू झाला असेल, थंडी वाजून येत असेल अथवा अधिहर्षता (Allergy) असेल, तर त्याला खोकला होतो आणि त्याचा प्रादुर्भाव होतो. परंतु आवाजात बदल होऊन निर्माण झालेला भरपूर खोकला ३-४ आठवड्यांपेक्षा अधिक काळ असेल, तर दुर्लक्ष करू नये. हा खोकला कर्करोगाचाही असू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
यासाठी घशाची तपासणी केली जाते. तसेच फुप्फुसाच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करून तज्ञ कर्करोगाचे निदान करतात. विशेषत: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी याकडे लक्ष द्यावे.
(१०) तोंडामध्ये होणारे बदल : भारतीय स्त्रियांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. परंतु ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागातील स्त्रियांमध्ये विडी ओढण्याचे, तंबाखू खाण्याचे, मशेरी लावण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा स्त्रियांना गालाच्या आतील भागात अथवा जिभेवर पांढरा चट्टा दिसला, तर ही सर्व लक्षणे तोंडाच्या कर्करोगाची आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
भारतामध्ये गुटखा खाण्याचे, तंबाखू चघळण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे जिभेवर पांढरा पट्टा अथवा डाग पडतात, याला ल्युकोप्लॅकिया असे म्हणतात. ही तोंडाच्या कर्करोगाची प्रथम पायरी आहे. लवकर निदान झाले तर या कर्करोगापासून मुक्तता मिळवता येऊ शकते.
(११) सातत्यान ताप येणे : आपणाला जर ताप आलेला असेल आणि जर तो फ्लूचा अथवा इतर कोणत्याही विषाणू अथवा जीवाणूच्या प्रादुर्भावाने झाला नाही, हे वैद्यांनी सांगितले असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.
अनेकदा असे दिसून आले आहे की, कर्करोगाची वाढ मूळ जागा सोडून इतर ठिकाणी होत असताना म्हणजेच कर्करोगाचे संक्रमण (Metastasis) होताना ताप येतो. तसेच रुग्णाला लिंफोमा अथवा रक्ताचा कर्करोग झाल्यावर लगेचच भरपूर प्रमाणात ताप येतो. त्यामुळे अशा तापाकडे दुर्लक्ष करू नये.
(१२) पोटामध्ये (उदरामध्ये) सातत्याने दुखणे आणि नैराश्य जाणवणे : जर एखाद्या व्यक्तीला सातत्याने पोटामध्ये अथवा उदरामध्ये वेदना जाणवू लागल्या, तर ही स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. या कर्करोगाच्या वेळी रुग्णास कावीळ होऊ शकते. त्याचप्रमाणे त्याच्या गुदाचा रंग बदलतो आणि मूत्राचा रंग काळा होतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी तज्ञ स्वनातीत चाचणी (Ultrasound test) अथवा संगणकीकृत छेदचित्रण (CT scan) या परीक्षणांद्वारे कर्करोगाचे निदान करतात.
या सर्व लक्षणांखेरीज स्त्री आणि पुरुष यांमध्ये काही विशेष लक्षणे देखील दिसून येतात. त्यांची वैद्यकीय चिकित्सा करून घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांमध्ये आढळणारी विशेष लक्षणे : अनेक स्त्रियांमध्ये असा समज आहे की, कर्करोग हा श्रीमंतांचा अथवा म्हातारपणी होणारा रोग आहे. त्यामुळे बहुतांशी तरुण स्त्रिया त्यांना कळून आलेल्या कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांना स्तनांमध्ये गाठ जाणवत असते. परंतु त्या या गोष्टीकडे ही दुधाची गाठ आहे, ती आपोआप विरून जाईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर बहुतांश स्त्रियांमध्ये या गाठीचे रूपांतर स्तनाच्या कर्करोगात होते. त्यामुळे खालीलपैकी कोणतेही लक्षण दिसून आले, तर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(१) अंग वाढणे : अनेक स्त्रियांमध्ये वजन न वाढता अंग मोठे होते, परंतु त्यांना त्याची जाणीव होत नाही. हे स्त्रीबीजांडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. पोटात दुखणे, कंबरेत दुखणे, फारसे काही न खाता पोट भरल्यासारखे वाटणे, लघवीला जाण्याची घाई वाटणे हीसुध्दा स्त्रीबीजांडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे अनेक आठवडे आढळून आली, तर तज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक आहे.
(२) स्तनामध्ये बदल : स्तनामध्ये गाठ आढळून येणे, स्तनाची त्वचा लालसर व जाड होणे, स्तनाचा दाह होणे, स्तन सुजणे ही जर लक्षणे सातत्याने काही आठवडे दिसून आली तर ती स्तनाच्या कर्करोगाची सुरुवात असू शकते. त्याचप्रमाणे स्तनाग्रातून स्राव बाहेर येत असेल (दुग्धपानाशिवाय), अथवा दोन्ही स्तनाग्रातून रक्त बाहेर येत असेल, स्तनाग्रे स्तनाच्या आतील बाजूस घुसलेली दिसत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
अशा वेळी तज्ञ स्तनपरीक्षण (Mammography), स्वनातीत चाचणी (Ultrasound test) करून कर्करोगाची निश्चिती करतात.
(३) मासिक पाळीमधील रक्तस्राव : पाळी जाण्याच्या अगोदर स्त्रियांना पाळीमध्ये भरपूर रक्तस्राव होतो. याकडके अनेक स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात. त्याचप्रमाणे गुदद्वारातूनसुध्दा रक्तस्राव होत असतो. अशा वेळी स्त्रियांनी दुर्लक्ष करू नये. त्यांना गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग असण्याची शक्यता असते. त्यांनी ताबडतोब स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे दोन पाळ्यांमध्ये झालेल्या संभोगानंतर होणारा रक्तस्राव, पाळी गेल्यानंतर सुध्दा होणारा रक्तस्राव ही देखील कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
पुरुषांमध्ये आढळणारी विशेष लक्षणे : अनेकदा पुरुषांमध्ये कर्करोगाची काही विशेष लक्षणे दिसून येतात. परंतु प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्करोगाची तीव्रता वाढते.
प्रत्येक पुरुषाने सदरची लक्षणे निदर्शनास येताच तज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ही चिन्हे दिसली वा जाणवली म्हणजे कर्करोग झालाच, असे मानण्याचे कारण नाही. परंतु कर्करोगाची शहानिशा करून घेणे अत्यावश्यक आहे.
(१) स्तनाजवळील जागेमध्ये बदल : पुरुषांना स्तनाचा कर्करोग होत नाही, हा समज चुकीचा आहे. स्तनाजवळील जागेत झालेल्या कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष करू नये. (अ) स्तनाच्या जागेजवळ उंचवटा जाणवणे अथवा सुरकुत्या पडणे, (ब) स्तनाग्र त्वचेच्या आत जाणे, (क) स्तनाग्र अथवा त्याच्या जवळची जागा तांबडी पडणे, (ड) स्तनाजवळच्या जागेजवळ रक्त पडणे, (इ) स्तनाग्रातून स्राव बाहेर पडणे अशी लक्षणे दिसताच ताबडतोब कौटुंबिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.
(२) वेदना : वयोमानानुसार पुरुषांच्या दुखण्याच्या व वेदना होण्याच्या तक्रारी वाढत जातात. काही वेळा या वेदना कर्करोगाच्या पूर्वसूचना असू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या कौटुंबिक वैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
(३) वृषणाच्या आकारात बदल : जर वृषणाचा आकार लहान अथवा मोठा झाला आहे, असे जर वाटले तर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वृषणाच्या पिशवीमध्ये एखादी गाठ असल्याचा संशय आला किंवा हाताने स्पर्श करतेवेळी वृषणाचे वजन वाढले आहे, असे जर वाटले तर त्याकडे सुध्दा दुर्लक्ष करू नये. ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्या. संशोधनाने असे आढळून आले आहे की, वृषणाच्या कर्करोगाची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे लवकरात लवकर त्यांचे निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी रक्त तपासणी, स्वनातीत चाचणी तसेच जीवोतक परीक्षण (Biopsy) या चाचण्या तज्ञांच्या सल्ल्याने त्वरीत करून घ्याव्यात.
(४) लघवीमध्ये होणारे बदल : पुरुषांचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्यांच्या लघवीविषयक अडचणी वाढत जातात. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : (अ) लघवीला वारंवार विशेषत: रात्रीच्या वेळी जावे लागणे; (ब) लघवीला तात्काळ जावे असे वाटणे; (क) लघवीला गेल्यानंतर लघवी पूर्ण झाली नाही, असे वाटणे; (ड) लघवीला सुरुवात करता न येणे; (इ) हसताना अथवा खोकताना थोड्या प्रमाणात लघवी होणे; (फ) लघवीची धार अत्यंत कमी वेगात बाहेर पडणे. अशा प्रकारची लक्षणे ही फक्त वय वाढल्यामुळे पुरुषात दिसून येतात.
पूर:स्थ ग्रंथीची (Prostate gland) वाढ ही कर्करोगाची असू शकते, परंतु अनेकदा ती वाढ कर्करोगाची नसते. याची शहानिशा कर्करोग तज्ञांकडून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पूर:स्थ ग्रंथी कर्करोग परीक्षण (Prostate Cancer Screening, PCS test) केले जाते.
कर्करोगाच्या लक्षणांवरून जर कर्करोगाचे लवकर निदान झाले, तर उपचार लवकर केले जाऊन कर्करोग बरा होण्याची अथवा त्याच्यापासून मुक्तता मिळण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने त्याची भरपूर वाढ झाल्यानंतर निदान होते. यामुळे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.
त्यामुळे आपल्या शरीरात दिसणाऱ्या अथवा जाणवणाऱ्या लक्षणांमुळे आपणाला कर्करोग होईलच असे नाही, परंतु त्याची तपासणी तज्ञांकडे जाऊन करणे आवश्यक असते. व्यक्तीमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसू देत अथवा न दिसू देत तरीदेखील त्याची शहानिशा करण्याचा आग्रह अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि अनेक आरोग्यदायी संस्थांनी धरला आहे. वयाच्या पन्नाशीनंतर कार्यकारी आरोग्य तपासणी (Executive health check-up) करणे आवश्यक आहे, हा विचार आता सर्व ठिकाणी प्रस्थापित होत आहे.
पहा : कर्करोग (पूर्वप्रकाशित).