व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने आहार आणि विहार यांचे योग्य पालन करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हे नियम देश, काल, वय, प्रकृती यांनुसार वेगळे वेगळे आहेत. परंतु, ऋतुनुसार पाळावयाचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत.

ऋतुचर्या

ऋतुप्रमाणे मनुष्याने आहार विहार नियमांचे पालन केल्याने त्यास दीर्घायुष्याचा लाभ होतो. आयुर्वेदानुसार बारा महिन्यांमध्ये पुढील सहा ऋतूंची गणना होते — शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. प्रत्येकी दोन महिन्यांकरिता एक असे सहा ऋतू होतात.

आयुर्वेद शास्त्रकारांनी प्रत्येक ऋतूची लक्षणे आणि त्यानुसार पाळावयाचे नियम यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ह्या तीन ऋतू काळामध्ये अग्नी शक्तीचे प्राबल्य असते, म्हणून यास ‘आदान’ काल असेही म्हणतात. आदान काळात सूर्याच्या उष्णतेने वातावरणातील व शरीरातील जलांश शोषून घेतला जातो, वायूचा रुक्ष आणि तीक्ष्ण गुण वाढतो. हे बदल शिशिर ऋतूत कमी, वसंत ऋतूत मध्यम आणि ग्रीष्मामध्ये सर्वांत जास्त जाणवतात.

याच्याबरोबर उलट वर्षा, शरद, हेमंत ऋतूस ‘विसर्ग’ काल असेही म्हणतात. यात चंद्राची शक्ती वाढते व सूर्याची शक्ती कमी होते. पावसामुळे वातावरणातील व शरीरातील द्रव अंश वाढतो आणि स्निग्धता बल वाढते, विसर्ग कालामध्ये वर्षा ऋतूत अल्प, शरद ऋतूत मध्यम, हेमंत ऋतूत उत्तम बलवृद्धी होते.

(१) शिशिर ऋतुचर्या : या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात, शारीर रुक्षता काही प्रमाणात वाढते; म्हणून वात वाढवणारे तिखट, कडू, कषय चवीचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच शीत आणि रुक्ष पदार्थ खाऊ नयेत. शिशिर ऋतुकाळात भूक चांगली लागते; म्हणून दूध, दुधाचे पदार्थ, गुळ, नवीन तांदूळ, मांस पदार्थ यांचे सेवन करावे. रोज डोके व संपूर्ण शरीराला तेल लावून गरम पाण्याने स्नान करावे.

(२) वसंत ऋतुचर्या : या ऋतुकाळात वारे दक्षिण दिशेकडून वाहतात. सूर्याची प्रखरता वाढते, त्यामुळे शरद ऋतूत शरीरात साठलेले कफ प्रकुपित होतो. प्रकुपित झालेल्या कफाचे तीव्र वमन, नस्य, कफघ्न औषधे देऊन शमन करावे. हलके व रुक्ष अन्न सेवन करावे, जुने जव, गहू, मध इत्यादी अन्नपदार्थ तसेच जंगली प्राण्यांचे मांस सेवन करावे.

ऋतुचर्या

(३) ग्रीष्म ऋतुचर्या : या काळात सूर्यकिरण फार तीव्र असतात. वारा नैर्ऋत्य दिशेकडून वाहतो. तो पिडादायक असतो, शरीर कफ अतीव उष्म्यामुळे क्षीण होतो, त्यामुळे वात वृद्धी होते. या ऋतूत मधुर, लघु, स्निग्ध, शीत, द्रव आहाराचे सेवन करावे. थंड पाण्याने स्नान करावे. दूध, साखर, तांदूळ, आंबट पदार्थ, मुरंबे, सरबते यांचे सेवन करावे. मद्यासारखे तीक्ष्ण द्रव्याचे सेवन करू नये. दुपारचे वेळी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने वाळ्याचे पडदे लावलेल्या, जेथे झाडांमुळे गारवा आहे अशा जागी व रात्री जेथे गार वारा आहे अशा ठिकाणी झोपावे.

(४) वर्षा ऋतुचर्या : या काळात ग्रीष्म ऋतूत तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडल्याने जमिनीतून वाफा येऊ लागतात, वारे जोराने वाहतात. या ऋतूत अम्ल विपकाने, पाणी गढूळ झाल्याने व अग्नीमंद झाल्याने सर्व दोषांचा प्रकोप होतो. प्रकुपित दोषांना वमन, विरेचन, बस्ती इत्यादी उपक्रमांनी सम स्थितीत आणावे. वर्षा ऋतूत जुने धान्य, मसाला व फोडणी देऊन केलेल्या विविध सुप व सार, जंगल मांस, जुनी अरिष्टे, दह्याची निवळी, गरम पाणी इत्यादींचा आहारात समावेश करावा. आंबट, खारट, स्निग्ध, उष्ण पदार्थांचे सेवन करावे.

(५) शरद ऋतुचर्या : या काळात दिवसा सूर्यकिरणे तीव्र असतात व रात्री हवा थंड असते, या कारणाने वर्षा ऋतूत साठलेले शारीर पित्त प्रकुपित होते. या पित्ताचे शमन करण्यासाठी कडू रसाचे काढे, तूप इत्यादी विरेचनासाठी वापरावे. विरेचनाबरोबर रक्तमोक्षणाचाही उपयोग करावा. मधुर, तुरट, कडू रसाचे पदार्थ खावेत. तांदूळ, मूग, पडवळ, आवळा, मध, साखर, मांस इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा. तीव्र ऊन, दिवसा झोपणे, मद्य, क्षार, दही, तेल इत्यादींचे सेवन करणे तसेच पोटभर जेवण करणे टाळावे.

(६) हेमंत ऋतुचर्या : या काळात थंड वारे वाहू लागतात, अग्नी प्रदीप्त होतो व त्यामुळे भूक जास्त लागते. मधुर, अम्ल, लवण रसयुक्त आहाराचे सेवन भरपूर करावे, व्यायाम करावा. त्यानंतर अंगाला तेल व उटणे लावून गरम पाण्याने स्नान करावे, याने मांस धातू उपचय होतो. आहारात मांस रस, चरबीयुक्त मांस, गूळ, रवा, कणिक, उडीद, ऊस, दूध यांपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर करावा. ताजे सकस अन्न, गरम पाणी, गरम वस्त्रे वापरावीत.

संदर्भ :

  • अम्बिकादत्तशास्त्री, आयुर्वेद तत्वसंदिपिका, सुश्रुतसंहिता सूत्रस्थान अध्याय ६, ऋतुचर्या, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.
  • अरुणदत्त, सर्वांगसुंदर, अष्टांगहृदयम्, ऋतुचर्याध्याय, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००९.
  • ब्रम्हशंकर मिश्र, विद्योतिनी, चरक संहिता, तस्याशितीयाध्याय, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे