पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील डोंगराला बसविलेली जाळी

प्रस्तावना : आपत्तींचा प्रभाव कमी करून जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शमन होय. याची दुसरी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल : “शमन म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या नुकसानीची तीव्रता कमी करणे किंवा त्याचे हानिकारक परिणाम कमी करणे”. भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन त्याची तीव्रता कमी करण्यासाठी विविध पातळींवर केलेले उपाय म्हणजे शमन होय. शमन हा आपत्कालीन व्यवस्थापन आणि जोखीम व्यवस्थापन यांचा आपत्तीपूर्व तयारीचा एक टप्पा किंवा घटक आहे.

आपत्तीपूर्व वा नंतर मानवी आणि आर्थिक हानींची परिणामकारकता कमी करण्यासाठी (जोखमीचे विश्लेषण करणे, जोखीम कमी करणे आणि जोखमीविरुद्ध विमा उतरविणे) हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपत्ती कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी येऊ शकते आणि जर त्यासाठी आपण तयार नसलो, तर त्याचे परिणाम गंभीरही असू शकतात. शमन प्रभावी होण्यासाठी पुढील कारवाई होण्याची गरज असते : १. एखाद्या ठिकाणी सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतील, तर त्या ठिकाणी वारंवार होणार्‍या आपत्तीचा इतिहास, भौगोलिक, भौतिक तसेच सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणे/आढावा घेणे. तेथील लोकांना राहण्यासाठी तंबू उभारणे, आपत्तिकालात घ्यावयाची खबरदारी आणि मदतकार्य यांसंदर्भात योग्य प्रशिक्षण देणे आणि भूकंपाला प्रतिसाद देण्याकरिता नियोनजबद्ध तयारी करणे. शिवाय घरे, इमारती, धरणे, बंधारे, पूल इत्यादींचे भूकंप-प्रतिरोधक बांधकाम करणे.

डॉप्लर हवामान रडार स्थानक, कैलासगिरी, विशाखापटनम्.

२. जगातील बहुतांश भागांमध्ये, विशेषत: मानवी वास्तव्य असलेल्या भागांमध्ये, भूस्खलनामुळे मानवी जीवन आणि उपजीविकेला वारंवार धोका निर्माण होत असतो. त्यामुळे प्रामुख्याने सावधगिरीच्या माध्यमांतून अशा प्रकारचे धोके कमी केले जाऊ शकतात. उदा., भूस्खलनाचा इतिहास असलेल्या क्षेत्रांमधून लोकसंख्या मर्यादित करून त्या परिसरातील लोकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करणे, चढ-उतार असणार्‍या विशिष्ट प्रकारच्या जमिनीच्या वापरावर मर्यादा घालणे अथवा अशा परिसरात मानवी वस्ती स्थापनेस मज्जाव करणे आणि देखरेखीवर आधारित आपत्ती पूर्वसूचना प्रणाली-तंत्रज्ञान स्थापित करणे. तसेच पूर, त्सूनामी, दरडी कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या नुकसानीचे शमन करण्यासाठी योग्य नियोजनाच्या माध्यमातून सज्ज राहणे. उदा., महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटात दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होत असते. तसेच रस्ते बंद होऊन वाहतूक खोळंबते. या धोक्यासाठी उपाय म्हणून घाटातील रस्त्याच्या बाजूच्या बुरुजांना, डोंगरकडांना जाळी बसविणे वगैरे.

पूर्वसूचना प्रणाली : एखादी आपत्ती येण्याची पूर्वकल्पना जनसमुदायास देण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्याला पूर्वसूचना प्रणाली असे म्हणतात. जसे की,‍ चक्रीवादळ येणार आहे, हे आपणास रडार या तंत्रज्ञानाकडून समजते. रडार हे उपकरण उपग्रहाच्या मदतीने फोटो नियंत्रण कक्षास पुरवितो. त्यानुसार समुद्रकिनारी असलेल्या गावांना सतर्क केले जाते. त्यामुळे चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी वेळ मिळतो. उदा., भारत व शेजारील राष्ट्रांत २०१९ साली आलेल्या फॅनी चक्रीवादळाची पूर्वसूचना कैलासगिरी, विशाखापटनम् येथे असलेल्या डॉप्लर हवामान रडार स्थानकाने दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव व वित्त हानी टाळता आली.

 

संदर्भ :

समीक्षक : सतीश पाटील