स्मृतिस्थळ : स्मृतिस्थळ म्हणजे महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य व त्यांचे शिष्य यांच्या आठवणीचा संग्रह होय. त्याहीपेक्षा असे म्हणता येईल की, श्रीचक्रधर स्वामींनी जे विचार आपल्या शिष्यांना सांगितले त्या विचारांचा आचारधर्म म्हणजे स्मृतिस्थळ. महानुभाव मतानुसार ‘स्मृति’ या शब्दाला विशेष अर्थ असून नागदेवाचार्यांनी श्रीचक्रधर स्वामींच्या वाणीतून निघालेली वचने ऐकून इतरांना जे स्मरणपूर्वक सांगितले ती ‘ स्मृति’ आणि ‘ स्थळ’ म्हणजे ज्यात विवेचन केले जाते ते, अर्थात ग्रंथ.

यावरून स्मृतिस्थळ म्हणजे नागदेवाचार्यांच्या स्मृतींचा, अर्थात त्यांनी चक्रधरांची वचने ऐकून सांगितलेल्या आचारधर्माचा ग्रंथ. महानुभाव पंथात श्रुती, स्मृती, व्रद्धाचार, मार्गरुढी व वर्तमान अशी एक परंपरा आहे. श्रुती म्हणजे स्वामींची वचने, स्मृती म्हणजे श्रीनागदेवाचार्यांनी निश्चित केलेला कृतिरुप आचारधर्म. स्मृतिस्थळाचा लेखक मात्र कोण एक निश्चित सांगता येत नाही. हे स्मृतिस्थळ कोणाही एकाचे नसून ते वेगवेगळ्या महानुभावांनी आपापल्या अनुभवातील स्मृती लिहून काढल्या व पुढे त्याचे विशिष्ट संस्करण होऊन ते स्मृतिस्थळरूपाने ग्रंथित झाले असावे. नागदेवाचार्यांच्या समकालीन आणि ग्रंथातील भाषा यावरुन सुरुवातीच्या काही स्मृतींचा तरी कर्ता कवी नरेंद्र हा वाटतो असे शं.गो.तुळपुळेंनी म्हटले आहे. श्रीनागदेवाचार्यांच्या निधनानंतर एक वर्षाच्या कालावधीत हे स्मृती संग्रहाचे काम झाले असावे. म्हणजेच याचा लेखनकाल शके १२३५ च्या आसपास येतो. लीळाचरित्रातून श्रीनागदेवाचा पूर्वेतिहास आपल्याला समजतो तर पंथाची धुरा खांद्यावर टाकल्यानंतर ती समर्थपणे वाहून नेणारे एक ज्ञानमार्तंड नागदेवाचार्य स्मृतिस्थळात आपल्याला दिसतात. स्मृतिस्थळात एकूण २६१ स्मृती आहेत. स्मृतिस्थळातून श्रीनागदेवाचार्यांच्या परिवारातील व्यक्तींचेही दर्शन होते. केशिराजबास, महदाईसा, नरेंद्र, दामोदर पंडित अशा विद्वान पंडिताबरोबरच नाथोबा, आऊसा, बाईसा या प्रेमळ भक्ताविषयीच्याही स्मृती यात आहेत. श्रीनागदेवाचार्यांच्या सहवासात असलेल्या कितीतरी व्यक्तींचे व्यक्तीचित्रे अत्यंत मोजक्या वर्णनात शब्दांकित झालेली आहेत. म्हणूनच स्मृतिस्थळाविषयी ‘बिनीच्या महानुभाव ग्रंथकारांची माहिती देणारा प्राचीनतम ग्रंथ हाच होय’ असे जे बा.वा.देशपांडे यांनी म्हटले ते अगदी सार्थ होय. लीळाचरित्राप्रमाणेच स्मृतिस्थळाची भाषा ही साधीसुधीच पण विलक्षण प्रभावी आहे. या भाषेत कृत्रिमता न येता भाषेला वाङ्मयीन रूप प्राप्त झाले आहे.

संदर्भ :

  • पठाण, यू.म.(संपा), स्मृतिस्थळ, समर्थ प्रकाशन औरंगाबाद, १९७४.
  • तुळपुळे, शं.गो., महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, व्हीनस प्रकाशन पुणे, १९७६.