केशवराज सूरी : (? -१३१६ ?). आद्य महानुभाव ग्रंथकारांपैकी एक प्रमुख ग्रंथकार. ‘केसोबास’, ‘केशवराज व्यास’ व ‘मुनी केशिराज’ ह्या नावांनीही ते ओळखले जातात. जन्म मराठवाड्यातील पैठणजवळील वरखेड ह्या गावी. पित्याचे नाव चक्रपाणी. गोपाळपंडित  हा त्यांचा ज्येष्ठ बंधू. श्रीचक्रधरस्वामींचा पट्टशिष्य नागदेवाचार्य हे ह्या दोघांचे गुरू. तथापि महानुभाव पंथाची दीक्षा केशवराज यांनी प्रथम घेतली. नागदेवाचार्याच्या शिष्यवर्गातही त्यांचा मान फार मोठा होता. म्हाइंटाच्या लीळाचारित्रातून श्रीचक्रधरोक्त निवडक सूत्रे (एकूण १,६०९) गोळा करून केशवराज यांनी आपला सिद्धांतसूत्रपाठ हा गद्य ग्रंथ तयार केला. महानुभाव तत्त्वज्ञानाची पायाशुद्ध मांडणी करण्याचे फार मोठे श्रेय त्यांच्याकडे  जाते. सिद्धांतसूत्रपाठ  १२८० च्या सुमाराचा असावा. प्रत्येक महानुभाव पंथीयाच्या नित्यपठनात असलेला हा ग्रंथ आहे. सिद्धांतसूत्रपाठावर झालेल्या अनेक भाष्यांपैकी गुर्जर शिवव्यास  व सिद्धांते हरिव्यास ह्यांनी सु. १४०३ मध्ये रचिलेले आचारस्थळ  विशेष महत्त्वाचे आहे.

दृष्टांतपाठ  हाही केशवराज यांचा एक उल्लेखनीय ग्रंथ. त्यात श्रीचक्रधरस्वामींनी आपले तत्त्वज्ञान विशद करण्यासाठी मु्ख्यतः नागदेवाचार्य, महदंबा (महदाइसा), रामदेव व बाइसा ह्या आपल्या चार शिष्यांना सांगितलेले एकूण ११४ दृष्टांत निवडले आहेत. प्रथम श्रीचक्रधरोक्त सूत्र व दृष्टांत आणि शेवटी केशवराजाने दिलेले दार्ष्टांतिक किंवा त्या दृष्टांताचे सार, अशी पद्धत ह्या ग्रंथात अवलंबिलेली आहे. हा ग्रंथही १२८० च्या आसपासचाच असावा. दृष्टांतपाठावर सु. पन्नास विवरणात्मक ग्रंथ असून त्यांतील विश्वनाथ बासाचा दृष्टांतस्थळ आणि मुरारीबासाचा दृष्टांतमालिकाभाष्य  हे दोन ग्रंथ महत्त्वाचे आहेत. स्वतः केशवराज यांनी दृष्टांतपाठातील विषयांची एक विश्लेषक अनुक्रमणिका तयार केली असून ती ‘लापणिक’ ह्या नावाने ओळखली जाते. मूर्तिप्रकाश हा त्याचा ओवीबद्ध ग्रंथ (ओवीसंख्या ३,०४४). त्यात अत्यंत आदरभावाने केलेले श्रीचक्रधरवर्णन असून श्रीचक्रधरस्वामींची बरीच माहिती आलेली आहे. ह्या ग्रंथात काही प्रमाणात काव्यात्मक अतिशयोक्ती आहे. मूर्तिप्रकाशाची शैली अलंकारप्रचुर असून उपमा हा अलंकार केशवराजाने विशेष कल्पकतेने वापरलेला आहे. केशवराज यांच्या  ‘काव्यवैजयंतीमधील अत्यंत प्रकाशमान रत्न’ अशा शब्दांत डॉ.वि. भि. कोलते ह्यांनी मूर्तिप्रकाशाचे वर्णन केले आहे. मूर्तिप्रकाशाच्या सर्व पोथ्यांत प्रस्तुत ग्रंथाचा आरंभ फाल्गुन शुद्ध १० शके १२१० (इ.स. १२८८) मध्ये केल्याचा उल्लेख आहे. त्यावरून त्याचा रचनाकाल वि.भि. कोलते ह्यांनी शके १२११ (इ. स. १२८९) असा निश्चित केला आहे.

केशवराज यांनी केलेल्या संस्कृत रचनेत रत्नमालास्तोत्र (लीळाचारित्रातील अनेक लीळांचा पद्यानुवाद. श्लोकसंख्या १,८००), ज्ञानकलानिधिस्तोत्र (श्लोकसंख्या ८३) व दृष्टांत स्तोत्र (श्लोकसंख्या १५४) ह्या स्तोत्रांचा प्रामुख्याने अंतर्भाव केला जातो. आपला परम मित्र दामोदरपंडित ह्यास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना एका मद्यप्याच्या तलवारीस केशवराज बळी पडले, अशी आख्यायिका आहे.

संदर्भ :

  • कोलते, वि. भि., संपा. मूर्तिप्रकाश, नागपूर, १९६२.
  • नेने, ह. ना., संपा. श्रीचक्रधरोक्त सूत्रपाठ, नागपूर, १९३६.