दृष्टांतपाठ : केशवराजाचा एक उल्लेखनीय ग्रंथ त्यात श्रीचक्रधरस्वामींनी आपले तत्त्वज्ञान विशद करण्यासाठी मुख्यतः नागदेवाचार्य, महदंबा (महदाइसा), रामदेव व बाइसा ह्या आपल्या चार शिष्यांना सांगितलेले एकूण ११४ दृष्टांत यात ग्रंथनिविष्ट आहेत. प्रथम श्रीचक्रधरोक्त सूत्र व दृष्टांत आणि शेवटी केशवराजाने दिलेले दार्ष्टान्तिक किंवा त्या दृष्टांताचे सार, अशी पद्धत ह्या ग्रंथात अवलंबिलेली आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्र परिभ्रमणाच्या काळात अनुयायांना केलेल्या निरूपणात अनेक सूत्र आहेत. ही सूत्रे (वचने) तत्त्वज्ञानात्मक आणि मानवी व्यवहारावर, वर्तनावर नेमकं भाष्य करणारी आहेत. यातील बहुतेक सूत्रे अल्पाक्षरी आणि धर्मशास्त्रीय परिभाषेत आहेत. श्रीचक्रधरांच्या सोबतचा अनुयायी वर्ग जसा विद्वान पंडितांचा होता तद्वतच तो सामान्य संसारिकांचा, स्त्रियांचा होता. या श्रोत्यांना सांगितलेले तत्त्वज्ञान कळण्यासाठी स्वामी कथन पद्धतीने त्यांच्याच भाषेत (लोकभाषेत), वेगवेगळ्या उदाहरणांचा, कथांचा दाखला द्यायचे. स्वामींनी सूत्रनिरूपणार्थ दिलेले दाखले, उदाहरणे म्हणजेच दृष्टांत होत. सूत्र सुलभीकरणाच्या पुष्टयर्थ दिलेला दाखला म्हणजेच दृष्टांत होय. कोणत्याही वस्तुचं अंतिम आणि निश्चित रूप पाहणे म्हणजे दृष्टांत अशी दृष्टांताची व्याख्या करण्यात आली आहे. दृष्ट+अंत:= द्रष्टांत या विग्रहावरुन याची प्रचिती येते.

लीळाचरित्रातून श्रीचक्रधरनिरूपीत असे अनेक दृष्टांत आले आहेत. यातील ११४ दृष्टांत वेगळे काढून केशिराजबासांनी (केसोबास) दृष्टांतपाठ केले. सूत्रपाठ वेगळे करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच. दृष्टांतपाठाची रचना त्रिखंडात्मक आहे. प्रत्येक दृष्टांताचे तीन भाग पडतात. शिरोधार्य सूत्र आणि त्यावरील श्रीचक्रधरांचे दृष्टांत तर शेवटचे दार्ष्टान्तिक केसोबासांचे अशी ही दुहेरी रचना आहे. म्हणजे सूत्र, दृष्टांत श्रीचक्रधरोक्त तर दार्ष्टान्तिक केशिराजांनी तयार केले आहे. म्हणजे दृष्टांतपाठ हा ग्रंथ एका दृष्टीने संकलनात्मक तर दुसऱ्या दृष्टीने टीकात्मक आहे. कारण स्वामींच्या सूत्र, दृष्टांतावर केशिराजांनी दार्ष्टान्तिक रूपाने टीकाही लिहिली आहे.

दृष्टांतपाठातील दोन तृतीयांश भाग (सूत्र आणि दृष्टांत) जर श्रीचक्रधरोक्त असेल तर केशिराजबासांचे कर्तृत्व ते काय? ते केवळ संकलनकर्तेच का? असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. परंतु केसोबास केवळ संकलनकार नव्हते तर ते सूत्रांचे साक्षेपी संपादकही होते. दृष्टांतावर दार्ष्टान्तिक लिहिणे हे त्यांच्या कर्तृत्वाचे एक अंग आहेच पण त्याचबरोबर ११४ दृष्टांतांचा अन्वय लावणे हे महत्वाचे दुसरे अंग. दृष्टांतपाठात ११४ दृष्टांत ज्या क्रमाने आलेले आहेत त्याच क्रमाने ते श्रीचक्रधरांनी निरूपण केले होते असे मात्र नाही. केवळ कालानुक्रमे निरूपिलेल्या दृष्टांतांचा संग्रह करणे एवढाच केसोबासांचा हेतू नव्हता तर त्यांना दृष्टांताच्याद्वारे स्वामींचा जीवोद्धरणाचा सिद्धांत पटवून द्यायचा होता. त्याला उपयुक्त पडतील असेच दृष्टांत निवडले आणि परमेश्वर अवतरणापासून ते त्यांनी जीवाला मोक्षप्राप्ती करून देईपर्यंतच्या निरनिराळ्या अवस्था प्रमाणे क्रमशः मांडणी केली.

दृष्टांतांची क्रमवार मांडणी करण्याच्या या पद्धतीलाच पंथीय परिभाषेत अन्वय लावणे असे म्हणतात. दृष्टांतांची निवड व त्यांचा अन्वय लावण्याचे महत्त्वपूर्ण काम केशिराजबासांनी केले. अर्थात या महत्वपूर्ण कामात नागदेवाचार्यांची भूमिका महत्वाची होती. कारण सूत्रपाठ करताना असो की दृष्टांतपाठ करताना असो केसोबासांनी ‘भटोबासांते पुसपुसों’च केल्याची नोंद स्मृतीस्थळाने केली आहे. उपरोक्त नोंदी प्रमाणे केसोबासांनी वेगळे काढलेले दृष्टांत जसेच्या तसे लीळाचरित्रातून घेतले असे म्हणणे पूर्णार्थाने योग्य ठरणार आहे. कारण यातले अनेक दृष्टांत असे आहेत की त्यांचा उल्लेख तेवढा लीळाचरित्रातून आलेला आहे, समग्र दृष्टांत नाही. ‘मग सर्वज्ञें दृष्टांत निरुपिला’ एवढेच म्हणून लीळाचरित्र थांबते. तसेच काही ठिकाणी लीळाचरित्र दृष्टांताचा केवळ निर्देश न करता त्याचे अल्पमात्र निरूपण करते. याचा अर्थ असा की केशिराजबासांना असे दृष्टांत स्वतः आठवून लिहावे लागले असतील. म्हणजेच सूत्राप्रमाणे ‘दृष्टांत ‘ ही श्रीचक्रधरांचे असले तरी बऱ्याच दृष्टांताची मांडणी आणि शब्दयोजना (काही प्रमाणात) ही प्रत्यक्ष केशिराजबासांची आहे.

श्रीचक्रधर निरूपण करीत असताना एखादे वचन, सूत्र उच्चारीत व क्वचित प्रसंगी त्याच्या स्पष्टीकरणार्थ दृष्टांत देत अशी एक साधारण समजूत आहे. परंतु दृष्टांतपाठातील  काही दृष्टांतावर कोणतेही शिरोधार्य सूत्र नाही, काही दृष्टांतावर एकापेक्षा अनेक (दोन किंवा तीन) सूत्र शिरोधार्य आहेत, काहीवर एकच सूत्र शिरोधार्य आहे, काही ठिकाणी एकाच सूत्राखाली दोन – तीन दृष्टांत आहेत. मग हे कसे? बरं, एकाच दृष्टांतावर दोन – तीन सूत्रे असतील तर ते ही एका प्रकरण वशातील नाहीत .म्हणजे तीन सूत्रे तीन प्रकरणाच्या किंवा तीन प्रसंगाच्या वेळी निरूपिलेले, पण केसोबासांनी ते एकत्र आणले आणि त्याखाली दृष्टांत दिला. यावरुन आपल्या असे लक्षात येते की दृष्टांतपाठ रचताना केशिराजांची दृष्टी बीजभूत सूत्रांच्या क्रमावर अथवा वर्गावर नसून त्यांच्या अर्थावर व त्यातील आशयावर होती. दृष्टांतपाठात जसे तत्वदर्शन आहे तसेच समाजदर्शनही आहे. स्वामींच्या दृष्टांत देण्याच्या पद्धतीवरुन आपणास त्यांची सुक्ष्म अवलोकन दृष्टी आणि मानवी स्वभावाचे अचूक ज्ञान याचा प्रत्यय येतो. दृष्टांतपाठातील भाषेचे स्वरूप संमिश्र स्वरूपाचे आहे. सूत्रांची भाषा शास्त्रीय, दृष्टांताची लौकिक तर दार्ष्टान्तिकाची भाषा पंडिती वळणाची आहे.

केशिराजबासांचा हा ग्रंथ तत्वज्ञान, समाजदर्शन, दृष्टांतसौंदर्य व भाषाशैली अशा सर्वच दृष्टीने अपूर्व असून यादवकालीन मराठी गद्याच्या लौकिक व पंडिती वळणाचा तो प्रातिनिधीक ग्रंथ आहे एवढे मात्र निश्चित. दृष्टांतपाठावर सु. पन्नास विवरणात्मक ग्रंथ असून त्यांतील विश्वनाथ बासाचा दृष्टांतस्थळ  आणि मुरारीबासाचा दृष्टांतमालिकाभाष्य  हे दोन ग्रंथ महत्त्वाचे आहेत. स्वतः केशवराजाने दृष्टांतपाठातील विषयांची एक विश्लेषक अनुक्रमणिका तयार केली असून ती ‘लापणिक’ ह्या नावाने ओळखली जाते.

संदर्भ :

  • कोलते, वि.भि.(संपा), श्रीचक्रधर – दर्शन, महाराष्ट्र शासन,१९८२.
  • तुळपुळे,शं.गो., महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय,व्हिनस प्रकाशन, पुणे,१९७६.