सूत्रपाठ : महानुभावांचे तत्त्वज्ञान विवेचन करणारा ग्रंथ. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी निरूपीत तत्त्वज्ञान यात आले आहे. श्रीचक्रधरांनी आपल्या परिभ्रमणाच्या काळात अनेकदा भक्तांना, शिष्यांना उद्देशून वेळप्रसंगी निमित्त करुन उपदेश केला, निरूपण केले. निरूपणातील हा उपदेश अतिशय मोजक्या शब्दात पण सूत्ररूपाने आला आहे. निरूपणातील महत्त्वाच्या, ठळक, आशयगर्भ विधानांना सूत्र म्हटले जाऊ लागले.( जशी बसवेश्वरांची ‘वचने’ तशी चक्रधरांची ‘सूत्रे’). म्हाइंभटाने संकलित केलेल्या लीळाचरित्रातून श्रीचक्रधर चरित्र आले आहे. यातील लीळांमध्ये, प्रसंगामध्ये श्रीचक्रधरांच्या तोंडची तत्त्वज्ञानपर, आचारधर्मपर, वर्तन नियमन करणारी वचने आली आहेत. ही श्रीचक्रधरमुखीची वचने निवडून नागदेवाचार्यांसारख्या अधिकारी पुरुषांकडून त्यातली सत्यापसत्यता पडताळून, त्यांचे वर्गीकरण करुन, परस्पर अन्वय जोडून केशिराजबास यांनी सूत्रपाठ सिद्ध केला आहे.

शके १२१२-१२१३ च्या सुमारास केशिराजबासांनी सूत्रपाठाचे लेखन केले. या ग्रंथात एकूण १२५५ सूत्र आहेत. श्रीचक्रधर स्वामी म्हणजे महानुभावांसाठी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार. म्हणून ईश्वरमुखीची सूत्र त्यांना प्राणाहून प्रिय आणि पवित्र होत. श्रीचक्रधरांच्या पश्चात महानुभावांना ‘वचनरुप ईश्वर’ जवळ असावा वाटणे स्वाभाविक आहे. या स्वाभाविकतेतूनच सूत्रपाठाची निर्मिती झाली. इतकं महत्त्वपूर्ण काम करणारी नागदेवाचार्य सोडल्यास केशिराजबासाइतकी अधिकारी व्यक्ती त्यावेळी तरी पंथात दुसरी कोणी नव्हती. त्यांच्या धारणाशक्तीवर आणि कर्तृत्वावर स्वतः नागदेवाचार्यांना विश्वास होता. कारण केशिराजबास प्रत्यक्ष नागदेवाचार्यांचेच शिष्य. नागदेवाचार्यांनी केलेल्या ‘माझे शास्त्र पंडिता – केसोदयांसी चर्चा करितां उजळे’ या विधानावरून केशिराजबासांची पात्रता लक्षात येते. केशिराजबासांनी सूत्रपाठाची निर्मिती नागदेवाचार्यांच्या संमतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. स्मृतीस्थळातील ‘मग केसोबासीं भटोबासांते पुसपुसों अनुक्रमे प्रकरणान्वयो लाविला : जे जयाचें नाम तें तया (प्रकरण) ठेविले:’ या स्मृतीवरून ते आपल्या लक्षात येते. श्रीचक्रधरांच्या चरित्रसंदर्भाने असो की सूत्रसंदर्भाने असो ‘पुसोपुसो’ नोंद करण्याची, पडताळून पहाण्याची महानुभावांची संशोधक वृत्ती लीळाचरित्राप्रमाणे सुत्रपाठ निर्मितीच्या वेळीही जागरूक होती. ‘सूत्रपाठ’ हा ग्रंथ महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे. म्हणूनच महानुभाव पंथीयांनी त्याची कसोशीने व निष्ठापूर्वक जपणूक केली. सूत्रपाठाचं महत्त्व सांगताना ह.ना.नेने ‘ रामदासी लोकांना जसा दासबोध तसा महानुभावांना सूत्रपाठ‘ असे म्हणतात. सूत्रपाठाला ‘ महानुभावांचे वेद ‘ असंही म्हटलं जातं. यावरुन त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येते. सूत्रपाठातील साडेबाराशेपेक्षा जास्त असलेल्या सूत्रांची विभागणी सोळा प्रकरणात केली आहे. पूर्वी, पंचकृष्ण, पंचनाम, अन्यव्याव्रत्ती, युगकर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, उद्धरण, असतीपरी, महावाक्य, निर्वचन, आचार, आचारमालिका, विचार, विचारमालिका हे ते प्रकरणे होत. यापैकी आचारमालिका आणि विचारमालिका या दोन प्रकरणाचे संकलन परसरामबास आणि रामेश्वरबास यांनी केले आहे.

आजही महानुभाव पंथात महावाक्य, आचारमालिका, विचारमालिका या प्रकरणाचे निरोपण सोहळे होतात हे विशेष. दिनचर्येतही पंथीय संन्यासी, उपदेशी साधक सूत्रपाठाची पारायणे, नित्यपठण करतात. अनेक पंथीय विद्वानांनी संपूर्ण सूत्रपाठ  मुखोद्गत केल्याचे आढळून येते. सूत्रपाठाचा विषय तात्विक असला तरी अनेक सूत्र वाङ्मयीन दृष्ट्या सुंदर आहेत. अल्पाक्षरत्व हे सूत्राचं मुख्य लक्षण सूत्रपाठातील सर्वच सूत्रातून दिसून येतं. सूत्रपाठातील काही सूत्रांचे दोन भाग पडतात. एक भाग वचनरूप असतो, तर दुसरा वचनार्थरूप म्हणजे स्पष्टीकरणात्मक असतो. सूत्रपाठातील वचनांचा अर्थ कसा जाणून घ्यावा हेही श्रीचक्रधरांनी ‘अर्थु तो प्रकरणवसें’ या सूत्रातून सांगून ठेवले आहे.

ज्यापद्धतीने सूत्रपाठाची निर्मिती लीळाचरित्रातून झाली त्याचप्रमाणे सूत्रपाठ पूढील सर्व तात्विक ग्रंथाचे मूळ ठरले. सूत्राचा अर्थ लावणारे चोवीस पक्ष, लापिका, वेगवेगळे पाठ हे सर्व निर्माण झाले. तात्पर्य,श्रीचक्रधरोक्त सूत्रपाठ हा महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचाच नव्हे तर त्यांच्या सर्व भावी साहित्याचा पाया ठरला.

संदर्भ :

  • तुळपुळे,शं.गो., महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, व्हिनस प्रकाशन, पुणे, १९७६.