ताम्र भस्म हे ताम्र (तांबे) या धातूपासून आयुर्वेदीय भस्म पद्धतीने तयार केले जाते. आयुर्वेदानुसार ताम्र धातूचे नेपाल व म्लेंच्छ असे प्रमुख दोन प्रकार आहेत. यातील भस्म तयार करण्यासाठी नेपाल जातीचे ताम्र हे योग्य मानले आहे.

ताम्र भस्म

ताम्र शोधन : कोणत्याही धातूचे भस्म तयार करण्यापूर्वी त्याची शुद्धी केली जाते. या क्रियेमुळे धातूमधील अशुद्ध भाग निघून जातो व काही प्रमाणात धातू मृदू होतो, ज्यामुळे भस्म तयार करणे सोपे जाते. ताम्र शोधनासाठी रसशास्त्रीय ग्रंथात अनेक पद्धती सांगितल्या आहेत, त्यातील काही प्रमुख पुढील प्रमाणे आहेत —

(१) गोमूत्र, लिंबू रस  किंवा चिंचेचा कल्क आणि टाकणखार यामध्ये तांब्याचे पत्रे तीन तास शिजवल्यास तांब्याची शुद्धी होते.

(२) तांब्याचे पत्रे गोमूत्रात तीन तास उकळावेत म्हणजे ते शुद्ध होतात.

(३) तांब्याच्या पत्र्यांना लिंबू रस व सैंधव मीठ यांचा लेप करावा व अग्नीत तापवून सौविरकात विझवावे. ही कृती सात वेळा केली असता तांबे शुद्ध होते.

(४) तांब्याचा कीस करावा. तो ताकात पाच दिवस भिजत घालावा, रोज धुवून पुन्हा दिवसभर ताकात भिजवून ठेवावा. पाच दिवसानंतर कीस धुवून कोरडा करावा आणि चोवीस तास तेलात भिजत ठेवावा. नंतर अग्नीवर तेल जळून जाऊन कीस लाल होईपर्यंत तापवावा; लाल झाल्यावर थोडे थोडे ताक शिंपडावे व कीस खाली-वर करावा. परत लाल करून ताक शिंपडावे अशी कृती सात वेळा करावी याने ताम्र शुद्ध होते.

ताम्र मारण / भस्म करण्याची कृती : (१) पारा व गंधक यांची कज्जली लिंबू रसात खलून त्याचा लेप शोधन केलेल्या तांब्याच्या पत्र्यांना लावावा. हे पत्रे शरावसंपूटात घालून मातकपड करून तीन गजपुटे दिल्यानंतर चूर्ण तयार होते, हेच ताम्र भस्म होय.

(२) एक भाग गंधक व एक भाग ताम्र घ्यावे. एका परळामध्ये (विशिष्ट प्रकारच्या पात्रामध्ये) निम्मा गंधक खाली पसरून त्यावर शोधन केलेले ताम्र पत्रे ठेवून उरलेला गंधक वरून पसरावा, दुसरे परळ यावर उपडे ठेवून मातीने संधिलेप करावा. यास ८ ते ९ तास अग्नी द्यावा, थंड झाले की वस्त्रगाळ करून चूर्ण करावे म्हणजे ताम्र भस्म तयार होते.

(३) शोधन केलेला तांब्याचा कीस घेऊन त्याला तिळवण, उतरण, लिंबू रस यांच्या प्रत्येकी चौदा भावना देऊन गजपुट द्यावे, याने मोरपंखी रंगाचे ताम्र भस्म तयार होते.

गुणधर्म : शुद्ध ताम्र भस्म स्वच्छ उजेडात धरून पाहिल्यास मोरपिसाच्या रंगाप्रमाणे दिसते, त्यात चंद्रिका बिलकुल दिसत नाहीत. दह्यामध्ये कालविले असता त्याचा रंग हिरवा होत नाही, असे ताम्र भस्म शुद्ध झाले झाले आहे समजावे. ताम्र भस्म हे तीक्ष्ण, उष्ण, मधुर व  कषाय रसाचे असते.

उपयोग : ताम्र भस्म हे सर्व रोगनाशक म्हणून सांगितले आहे. परंतु, प्रामुख्याने त्याचा उपयोग श्वास, कास, क्षय, पांडू, अग्निमांद्य, अरोचक, गुल्म, प्लिहा वृद्धी, यकृत विकार या रोगांमध्ये होतो. तीक्ष्ण व उष्ण असल्यामुळे पित्त विकारांवर जास्त प्रमाणात ताम्र भस्म वापरू नये. कफज व्याधींवर याचा जास्त उपयोग होतो. नेहमी शुद्ध ताम्र भस्म वापरावे, अशुद्ध ताम्र भस्म वापरल्यास उलटी, भ्रम, अतिसार, शूल, रक्तस्त्राव, ज्वर हे विकार होऊ शकतात.

पहा : भस्म प्रक्रिया, भस्मे, आयुर्वेदीय.

संदर्भ :

  • कृष्णगोपाल, रसतंत्रसार व सिद्धप्रयोग संग्रह, ताम्र भस्म, कृष्णगोपाल आयुर्वेद भवन, राजस्थान, २०१०.
  • गंगाधरशास्त्री गुणे, आयुर्वेदीय चिकित्साप्रबोध, आयुर्वेदीय औषधीगुणधर्मशास्त्र, ताम्र भस्म, आयुर्वेदाश्रम फार्मसी लिमिटेड, अहमदनगर, १९५१.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे