विशिष्ट रचना असणाऱ्या पेशींतील भागांना ‘पेशींची अंगके’ म्हणतात. पेशींची अंगके ही ‘पेशींची सूक्ष्म इंद्रिये’ आहेत. पेशीअंगकांमुळे पेशी कार्याचे श्रम विभाजन होते आणि पेशींतील कामे सुलभ होतात.
पेशीअंगके पेशी अंशन (Cell fractionation) पद्धतीने व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने शोधून काढण्यात आलेली आहेत. केंद्रकी पेशीमध्ये असलेल्या पेशीअंगकांची संख्या तुलनेने अधिक आहे. केंद्रकी पेशीअंगकाना स्वत:चे दोन पदरी मेद आवरण असते. आभासी केंद्रकी पेशीअंगकाभोवती प्रथिन आवरण असते.
आभासी केंद्रकी पेशीअंगके (Prokaryotic cell) : आभासी केंद्रकी पेशीमध्ये स्पष्ट केंद्रक नसते. पेशीभित्तिका, पेशीपटल, रायबोसोम, पेशीद्रव ही पेशीअंगके असतात. काही जीवाणू पेशींत केसांसारख्या लांब कशाभिका (Flagella) आणि झालरीका (Pili) असतात. तसेच प्रकाशसंश्लेषक घड्यांनी बनलेली क्लोरोसोम (Chlorosome) व मध्यकाय (Mesosome) आढळतात. जीवाणू पेशीमधील डीएनए (DNA) एका मुख्य गुणसूत्राच्या रूपात असतो, त्यास केंद्रकाभ (Nucleoid) म्हणतात. काही विखुरलेले डीएनए प्लाझ्मिडच्या (Plasmids) स्वरूपात असतो.
(१) पेशीभित्तिका (Cell wall) : स्वत:भोवती निर्माण होणारे हे पेशीअंगक आहे. प्राणी पेशींना पेशीभित्तिका नसते. परंतु, जीवाणू पेशींना आणि वनस्पती पेशींना पेशीभित्तिका असते. जीवाणू पेशींच्या पेशीभित्तिकेत पेप्टिडोग्लायकान (Peptidoglycan), तर वनस्पतींच्या पेशीभित्तिकेत सेल्युलोज (Cellulose) व लिग्निन (Lignin) यांसारखी द्रव्ये असतात. कवक पेशींच्या पेशीभित्तिकेत कायटीन नावाचा पदार्थ असतो. कायटीन अन्य जीवांच्या भित्तिकेत नसते. पेशी भित्तिकेचे मुख्य काम आतील पेशीचे संरक्षण करणे हे असते.
(२) पेशीपटल (Cell membrane) : पेशीपटल पातळ, लवचिक, प्रथिने आणि मेद पदार्थांच्या दुहेरी थरांनी बनलेले असते. पेशीचे स्वतंत्र अस्तिव पेशीपटलामुळे टिकते.
(३) तंतुकणिका (Mitochondria) : स्पष्ट केंद्रकी वनस्पती आणि प्राणी पेशींत असतात. त्यांची संख्या सु. एक पासून दोन हजारांपर्यंत असू शकते. तंतुकणिकेमध्ये स्वतंत्र जीनोम असतो. त्यांचे पुनरुत्पादन स्वतंत्रपणे होते. तंतुकणिकांना प्रथिने आणि मेद पदार्थांच्या थरांची दोन पटले असतात. बाह्य पटल गुळगुळीत, सपाट आणि आतील पटल अनेक घड्यांचे असते. घड्यांमुळे आतील पटलाचा पृष्ठभाग अनेक पटींनी विस्तृत होतो. तंतुकणिकांतील विकरांमुळे पेशी श्वसन व पर्यायाने ऊर्जानिर्मिती करू शकतात, म्हणून तंतुकणिका या ‘पेशीचे ऊर्जा केंद्र’ आहेत.
एकेकाळी स्वतंत्रपणे जगणारे काही जीवाणू योगायोगाने दृश्यकेंद्रकी पेशीत (Eukaryotic cell) सामावले गेले. तेथे त्यांना सुरक्षित आसरा मिळाला आणि आश्रयदात्या पेशींना सुलभतेने ऊर्जा मिळू लागली. अशा जीवन पद्धतीला अंतर्सहजीवन (Endosymbiosis) असे म्हणतात.
(४) लवके (Plastids) : वनस्पती पेशींत आढळणाऱ्या अंड्याच्या आकाराच्या, पुनरुत्पादनाने स्वत:ची संख्यावाढ करू शकणाऱ्या या पेशीअंगकांत तंतुकणिकांसारखे बाह्य व अंतर्पटल असते. अंतर्पटलाच्या आतील जागेत एकावर एक ठेवलेल्या नाण्यांच्या गटासारख्या दिसणाऱ्या हरीतलवकांच्या घड्यांत हरितद्रव्य (Chlorophyll) असते. हरितलवके (Chloroplast) प्रकाशसंश्लेषण क्रियेमधून ग्लुकोज आणि स्टार्च बनवतात. काही लवकांत हरितद्रव्याऐवजी लाल, पिवळा, निळा इत्यादी रंगद्रव्ये (Pigments) असतात. रंगलवके (Chromoplast) फुलाच्या पाकळ्या, फळांच्या साली यांत आढळतात. ती कीटकांना परागणासाठी व प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरतात. नीलहरीत शैवाल (सायनोबॅक्टेरिया) यांसारख्या जीवाणूमध्ये हरितलवके प्रारंभी निर्माण झाली. वनस्पती पेशीमध्ये त्यांचा समावेश पेशीय भक्षणाने झाल्यावर आता हरीतलवके पेशीअंगक बनली आहेत. हरीतलवकांना स्वतंत्र जीनोम असतो. त्यांचे पुनुरुत्पादन स्वतंत्रपणे होते.
(५) गॉल्जीकाय (Golgi complex) : पेशीअंगक वनस्पती आणि प्राणी पेशींत असते. स्त्रावी पेशींत ते अधिक विकसित असते आणि स्पष्ट दिसते. एकावर एक वसलेल्या गोल पोकळ चपट्या तबकड्यांसारखी गॉल्जीकाय अंगकाची रचना असते. गॉल्जीकाय अंगकात निर्माण झालेले पदार्थ नंतर पेशीपटलाकडे व शेवटी पेशीबाहेर पाठवले जातात. गॉल्जीकाय, अंतर्द्रव्य जालिका आणि पेशी केंद्रक यांची पटले एकमेकांना जोडलेली असतात. या घनिष्ट संबंधांमुळे गॉल्जी पिंड, अंतर्द्रव्य जालिका आणि पेशी केंद्रक यांतील विविध पदार्थांचे संश्लेषण आणि त्यांची पेशीतील वाहतूक सुरळीत होते .
(६) रिक्तिका (Vacuoles) : काही जीवाणू पेशींत रिक्तिका असतात. प्राणी पेशींत बहुधा रिक्तिका नसतात. परंतु, बहुतेक वनस्पती पेशींत रिक्तिका असतात. विविध प्रकारच्या रिक्तिकांमध्ये अन्नपदार्थ, उत्सर्जित करण्यायोग्य पदार्थ, रंगद्रव्ये, पाणी व खनिजे इत्यादींचा साठा केला जातो.
(७) अंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic reticulum) : अंतर्द्रव्य जालिकेचे एक टोक केंद्रक पटलाला चिकटलेले असते. सर्व दृश्यकेंद्रकी वनस्पती, कवक व प्राणी पेशी यांत अंतर्द्रव्य जालिका असते. अंतर्द्रव्य जालिका परस्परांना जोडलेल्या अनेक पोकळ नळ्या आणि पोकळ चकत्यांनी बनलेली असते. अंतर्द्रव्य जालिकेच्या काही पृष्ठभागावर रायबोसोम चिकटलेले असतात (Rough Endoplasmic Reticulum). अशा भागात प्रथिन संश्लेषणाचे काम होते. रायबोसोम विरहित अंतर्द्रव्य जालिकेमध्ये (Smooth Endoplasmic Reticulum) मेद पदार्थाचे आणि ग्लायकोजेनचे संश्लेषण होते.
(८) लयकारिका (Lysosomes) : दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये लयकारिका आढळतात. गोल आणि अतिसूक्ष्म अशा या अंगकांचा इतर अंगकांशी सहज संयोग होऊ शकतो. लयकारिकांत जल अपघटक विकरे (Hydrolases) असतात, निकामी पेशीअंगकांचे व परजीवी जीवाणूंचा नाश लयकारिकेमुळे होतो.
(९) कशाभिका आणि रोमक (Cilia & Flagella) : ही केसांसारखी लांब पेशीअंगके पेशीच्या स्थलांतरासाठी आणि पेशीसंपर्कातील पदार्थांच्या वहनासाठी उपयुक्त असतात.
(१०) सूक्ष्म रोमक (Microvilli) : ही पेशीसंपर्कातील पदार्थांच्या शोषणासाठी उपयुक्त अशी पेशीअंगके आहेत.
(११) रायबोसोम (Ribosome) : हे आभासी केंद्रकी आणि स्पष्ट केंद्रकी अशा दोन्ही प्रकारच्या पेशींत असणारे प्रथिन संश्लेषणासाठी उपयुक्त असे सूक्ष्म कण आहेत.
(१२) पेरॉक्सिसोम (Peroxysom) : पुनरुत्पादनाने स्वत:ची संख्यावाढ करू शकणाऱ्या या पेशीगोलक अंगकांतील विकरे ऑक्सिडीकरण प्रक्रियांत उपयोगी पडतात.
(१३) तारक केंद्र (Centriole) : पेशीकेंद्रकाजवळ स्थित असते. ट्युब्युलिन (Tubulin) प्रथिनाने बनलेल्या या मुख्यत: प्राणी पेशीत सहज दिसणाऱ्या पेशीअंगकांचा पेशीविभाजन आणि रोमकांना आधारक म्हणून उपयोग होतो. कर्षकेंद्रकामध्ये लवके आणि तंतुकणिकांप्रमाणे पुनरुत्पादन क्षमता असते.
(१४) पेशीकेंद्रक (Nucleus) : बहुसंख्य केंद्रकी पेशींत एक आणि क्वचित जास्त संख्येने आढळणारे हे अंगक पेशींच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवते. पेशीकेंद्रकात केंद्रकपटल (Nuclear membrane), पेशीकेंद्रकरस (Nucleoplasm), पेशीकेंद्रकी (Nucleolus) आणि क्रोमॅटिन (Chromatin) यांचा समावेश होतो. क्रोमॅटिन म्हणजे पेशीतील जनुकीय भाग डीएनएच्या रेणू व आधारक प्रथिनाच्या स्वरूपात असतो. जनुकीय माहिती साठविणे, तिचा वापर करून प्रथिने व अन्य सजीव जाती तसेच विशिष्ट रेणू निर्माण करणे, पेशींचे विभाजन करणे, सजीवांचे पुनरुत्पादन करणे अशी महत्त्वाची कामे पेशीकेंद्रक करते.
(१५) पेशीद्रव (Cytoplasm) : पेशीतील द्रवपदार्थ म्हणजे पेशीरस यास पेशीअंगक मानले जाते. सर्व पेशीअंगकांभोवती पेशीद्रव असतो. पेशीभित्तिका या पेशीअंगकाच्या आतील बाजूस पेशीपटल व त्यात पेशीद्रव असतो.
पहा : अंतर्द्रव्य जालिका, केंद्रक, जीवाणू पेशी, तंतुकणिका, पेशी, पेशीनाश, पेशीमृत्यू, प्राणी पेशी, वनस्पती पेशी.
संदर्भ :
- https://www.shmoop.com/biology-cells/prokaryotic-cells.html
- https://courses.lumenlearning.com/wm-biology1/chapter/reading-unique-features-of-plant-cells/
- https://www.dummies.com/education/science/anatomy/organelles-and-their-functions/
- https://micro.magnet.fsu.edu/cells/plantcell.html
- https://www.thoughtco.com/all-about-animal-cells-373379
समीक्षक : नीलिमा कुलकर्णी