रुक्मिणीस्वयंवर : महानुभाव पंथाच्या सातीग्रंथांत नरेंद्रकृत रुक्मिणीस्वयंवर  या ग्रंथाचा समावेश आहे. महानुभाव पंथाच्या महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सातीग्रंथांत समावेश असणं यातच कवी नरेंद्राचे आणि त्याच्या रुक्मिणीस्वयंवराचे मोठेपण सिद्ध होते. कवी नरेंद्र हा महानुभाव पंथाच्या पहिल्या पिढीतील महत्त्वाचा कवी. तो महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्यांच्या समकालीन. रुक्मिणीस्वयंवरासहच तो पंथात दाखल झाला. त्याने नागदेवाचार्यांकडून पंंथाची दिक्षा घेतली आणि रुक्मिणीस्वयंवर  त्यांच्या स्वाधीन केले. कवी नरेंद्र आणि त्याचे रुक्मिणीस्वयंवर पंथात दाखल होण्याची घटना स्मृतीस्थळातील ‘ नरिंद्रबासा भेटी अनुसरण’ या स्मृतीत आलेली आहे. कवी नरेंद्र हा नृसिंह आणि साल या दोन कवी भावांबरोबर राजा रामदेवरायाच्या दरबारात दरबारी कवी होता. भावांच्या सांगण्यावरुन ‘पापापुरश्चरण’ होण्यासाठी त्याने द्वारकेचा रामहाटू (श्रीकृष्ण) वर्णन केला. रुक्मिणीस्वयंंवर लिहिले. ते काव्य आणि त्यातील कथानक राजाला एवढे आवडले की त्याने नरेंद्राकडे प्रचंड मोबदल्यात त्या ग्रंथाचे कवित्व बहाल करण्याची मागणी केली. परंतु कवी नरेंद्राने स्वाभिमानी बाणा दाखवत राजाला ‘ ना राजेहो : आमुचेया कविकुळा बौलू लागेल’ असे खडे बोल सुनावले आणि राजाला नकार दिला. या घटनेमुळे पुढे राजाश्रयाचा आणि एकूणच संसाराचा उबग येऊन त्याने नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाची दिक्षा घेतली. आपसूक नरेंद्राबरोबरच रुक्मिणीस्वयंवर ही महानुभाव पंथात दाखल झाले.

साधरणत: शके १२१४-१५ मध्ये लिहिल्या गेलेले, अठराशे ओवीसंख्या असलेले रुक्मिणीस्वयंवर पंथात दाखल होताना मात्र केवळ नऊशे ओव्यांचेच म्हणजे अपूर्णावस्थेत होते. म्हणून ते नऊशे ओव्यांचेच गृहीत धरायचे. राजाच्या धाकाने मुळ अठराशे ओव्यांपैकी एका रात्रीतून तिघा भावांनी प्रत्येकी तीनशे याप्रमाणे नऊशे ओव्या खतवून काढल्या, ज्या आज शिल्लक आहेत त्या घेऊनच नरेंद्र पंथात आले. श्रीकृष्ण – रुक्मिणी विवाहाची कथा या ग्रंथात वर्णिली आहे. श्रीकृष्ण हे महानुभावांच्या पंचकृष्णातील पहिले अवतार. त्यामुळे श्रीकृष्ण चरित्र हा महानुभावांच्या आवडीचा आणि भक्तीचा विषय. रुक्मिणी हरण आणि विवाह ही घटना श्रीकृष्ण चरित्रातील महत्त्वाची आणि तेवढीच रोमांचक. म्हणूनच मध्ययुगीन काळात अनेकांनी ही कथा वर्णिली आहे. रुक्मिणीस्वयंवरावर मराठीत जवळपास पंचवीसपेक्षा अधिक आख्यानकाव्य उपलब्ध आहेत. त्यापैकी एकोणीस रुक्मिणीस्वयंवरे केवळ महानुभाव पंथात आहेत. रुक्मिणीस्वयंवराची संख्या एवढी जास्त असण्याचे कारण म्हणजे ही कथा अवीट तर आहेच पण त्याचबरोबर रुक्मिणी ही श्रीकृष्णाची केवळ राणीच नव्हे तर उत्कट भक्तही आहे. तिच्या विवाहाची कथा म्हणजे परमेश्वर-भक्त यांच्या मिलनाची कथा आणि भक्त-भगवंत ऐक्याची कथा आहे. ही सर्वसामान्य विकारवश माणसाच्या विवाहाची कथा नव्हे, तर ती प्रत्यक्ष जगदीश्वराच्या विवाहाची कथा आहे. म्हणून ती कथा आपण वर्णन करावी असे वाटणे स्वाभाविक आहे.याच भूमिकेतून कवी नरेंद्रानेही रुक्मिणीस्वयंवर केले आहे.

नरेंद्राच्या आविष्कारात असणारी तेजस्विता आणि दिपवून टाकणारा प्रतिभाविलास वाचकाला स्तिमित करणारा आहे. वर्णनाची विपुलता आणि कथानकाची मंद प्रगती यावरून कवी नरेंद्रापुढे विदग्ध संस्कृत महाकाव्याचा आदर्श होता असे वाटते. पुराणातील सत्वसंपन्न पुरुषांच्या चरित्रातील कथा, रुपगुणयुक्त नायिका, उद्यानक्रीडा, जलविहार, रतिक्रिडा,विवाह इ. अलंकारिक वर्णने, गुणालंकाराने भरलेली भाषाशैली आदी महाकाव्याचे गुण रुक्मिणी स्वयंवरात दिसतात. म्हणूनच महाकवी नरेंद्र असे गौरवाने म्हटले जाते. सृष्टीसौदर्याची वर्णने करण्यात नरेंद्राचा हातखंडा दिसतो. अस्ताचलावरील सूर्य, सायंकालीन अंधकार, दिव्यांची दिप्ती, चंद्रोदय, वनोपवनाचे सौदर्य, वसंतऋतुचा विलास इ. वर्णने वाचकाला खिळवून ठेवतात. नरेंद्राने केलेले सायंकाळचे वर्णन अप्रतिम आहे. यातील शब्दचित्रे इतकी बोलकी आहेत की ती वाचताना मूळ वस्तू समोर उभी राहिल्याचा भास होतो. विरहाने व्यथित झालेल्या रुक्मिणीचे  नरेंद्राने ” डावा हातु उसिसा घातला :उजिवा ह्रदयावरि ठेविला:जैसा जीवेंसी देवो धरिला :निसुटैल म्हणौनि।।”असे वर्णन केले आहे. एकूणच नरेंद्राच्या शब्दांची मृदुता, कल्पनांचे सौदर्य, रसांची सांद्रता, उचित-अनुचिततेचा विवेक, प्रमाणबद्धता व मुख्य म्हणजे संयम या सर्व गुणांचा संगम नरेंद्राच्या रुक्मिणीस्वयंवरात झालेला आहे. त्यामुळेच हरग्रिव पंडिताने कवी नरेंद्राच्या अनुषंगाने काढलेले स्मृतीस्थळातील ‘ सकळापरिस हा कवी चतुर’ हे उद्गार सार्थ वाटतात.

संदर्भ :

  • आवलगावकर, रमेश, नरेंद्र, एकनाथ, सामराज यांची रुक्मिणीस्वयंवरे : एक चिकित्सा, चंद्रकला प्रकाशन, पुणे, १९९६.
  • कोलते, वि.भि., नरेंद्र विरचित रुक्मिणीस्वयंवर, अरुण प्रकाशन, मलकापूर,१९६६.