मुंडी, पीटर : (१५९६–१६६७). ब्रिटिश व्यापारी, प्रवाशी आणि इतिहासकार. त्याचा जन्म इंग्लंडमधील दक्षिण कोर्नवॉल प्रांतातील पेरीन येथे झाला. त्याचे वडील रिचर्ड मुंडी हे माशांचा व्यापार करत असत. पीटर वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांबरोबर फ्रान्समधील रूवन (Rouen) येथे गेला. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात तो फ्रेंच भाषा शिकला. वयाच्या पंधराव्या वर्षी पीटरने कॅप्टन जॉन डेव्हिस याच्याकडे मदतनीस (केबिन बॉय) म्हणून नोकरी पतकरली. पुढे तो चार्ल्स पार्कर याच्याबरोबर स्पेनमधील सिविल या शहरात गेला. तेथे त्याने स्पॅनिश भाषा शिकून घेतली. पीटर भारतात तीन वेळा आला होता. या सर्व प्रवासाचे विस्तृत वर्णन त्याने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले आहे. भेटी दिलेल्या स्थळांचे वर्णन, रेखाचित्रे, नकाशे, प्रवासास लागलेला वेळ आणि शहरांमधील अंतरे आदी त्याच्या लेखनाची वैशिष्ट्ये.
पीटरची ३० पौंड पगारावर ईस्ट इंडिया कंपनीत नेमणूक झाली (१६२७). ६ मार्च १६२८ रोजी त्याने भारतात येण्यासाठी ब्लॅकवेल सोडले व ३० सप्टेंबर १६२८ रोजी तो सुरतला पोहोचला. या प्रवासात ३० मार्च १६२८ रोजी रोमजवळ साखरेच्या ७०० पेट्या लादलेली दोन जहाजे त्याने पाहिली. सुरतला पोहोचण्यास १३,७१३ मैलांचा प्रवास केल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. भारतात त्याची नेमणूक सुरतच्या वखारीत कारकून या पदावर झाली. व्यग्रतेमुळे त्याला सुरतच्या बाहेर फिरण्यास जाता आले नाही; मात्र त्याने सुरतच्या वखारीत ३५ माणसे काम करत असल्याचे लिहिताना सुरत शहराचे वर्णन केलेले आहे. त्याच बरोबर तेथील किल्ला, तलाव, सती प्रथा यांबद्दलही वर्णन केले आहे.
सुरतच्या वखारीत मुंडीची नेमणूक येणाऱ्या जाणाऱ्या पत्रांची नोंद करणाऱ्या ‘रजिस्टर’ या पदावर झाली. नंतरच्या वर्षात तो स्वाली येथे गेला. तेथे तो पोर्तुगीजांशी झालेल्या कराराचा साक्षीदार झाला. पुढे पीटर आणि जॉन यार्ड यांची नेमणूक आग्र्यातील वखारीच्या प्रमुखाचा दुय्यम अधिकारी म्हणून झाली. त्याचे काम वखारीतील पैशांचा हिशोब ठेवणे हे होते. आग्र्याला जाताना तो थाळनेर, चोपडा, यावल मार्गे बऱ्हाणपूरला आला. त्याला बऱ्हाणपूर येथे बुंदीच्या राजा राव रतनसिंग हाडा यांच्याकडून थकीत रक्कम घ्यायची होती. त्याने दख्खनच्या मोहिमेवर गेलेल्या लष्करासाठी बऱ्हाणपूरकडे रसद घेऊन जाणारा दीड मैल लांबीचा बैलांचा तांडा बघितला. येथून पुढे नरवर, ग्वाल्हेर, धोलपूरमार्गे आग्र्याला पोहोचला. या प्रवासात त्याने ग्वाल्हेर शहराचे व किल्ल्याचे वर्णन केले आहे. सुरत ते आग्रा हे अंतर ३९६ कोस म्हणजे इंग्लिश मैल ५५१.५ असल्याचे त्याने नमूद केले आहे. या प्रवासास त्याला ५३ दिवस लागले. येथून पुढे तो जलेसर, सिकंदर राव, अक्राबादमार्गे जाताना वाटेत त्याने मिनारांवर मानवी मुंडकी लटकवून ठेवल्याचे बघितले. याच बरोबर गुलामांचा बाजार सुद्धा बघितल्याचे तो लिहितो. पुढे त्याने कर्णवास येथे गंगा नदी ओलांडल्याचे लिहिताना यात त्याने पाहिलेल्या गंगेचे वर्णन केले आहे. येथून परतताना त्याने शेरगड येथे सोरामीठ घेतल्याचे लिहून ठेवले आहे. शेरगड, आग्रा, फिरोजाबाद या मार्गावर जहांगीरने दोन्ही बाजूंस सावलीसाठी कडूलिंबाची झाडे लावल्याचे त्याने लिहिले आहे. फिरोजाबादबाहेर त्याने एका बदली झालेल्या सरदाराची छावणी बघितली. तो लिहितो, ‘राजा आपल्या सरदारांच्या बदल्या दर तीन ते चार वर्षानंतर करतो.’ तो पुढे लिहितो की, ‘यमुना नदीत मालाची वाहतूक करणाऱ्या ३ ते ४०० टनांच्या बोटी असून त्या पुढे गंगा नदीतून प्रवास करत पाटण्यापर्यंत जातात व परत येतात.’
पीटरने आग्र्यानंतर पाटण्याकडे प्रवास सुरू केला. वाटेत त्याने १४००० बैलांचा तांडा बघितल्याचे लिहिले आहे. पुढे तो झाशीमार्गे अलाहाबादला आला. त्याने अलाहाबादच्या किल्ल्याचे वर्णन केले आहे. तसेच सासाराम येथील शेरशहा सुरीचे थडगे बघितल्याचे तो लिहितो. पुढे तो पाटण्याला पोहोचला (सप्टेंबर १६३२). आग्रा ते पाटणा हे अंतर २५३ कोस म्हणजे ३७९.५ मैल असल्याचे व प्रवासाला ३९ दिवस लागल्याचे तो लिहितो. पाटण्याजवळील महत्त्वाची बंदरे व त्यांचे अंतर, तसेच बाजारातील वस्तूंचे भाव त्याने नमूद करून ठेवले आहेत. येथून तो आग्र्याला परतला. सुरत, आग्रा ते पाटणा हे अंतर त्याने १००० मैल असल्याचे लिहिले आहे.
पीटरने १६३३ चा पावसाळा सुरतमध्ये काढला. पुढे नोव्हेंबरमध्ये त्याची नेमणूक स्वाली येथील बंदरावर प्रमुख म्हणून झाली. १६३४ मध्ये रॉयल मेरी या जहाजातून तो आपल्या मायदेशी परतला. यानंतर १६३५-३६ मध्ये त्याने भारत व जपानला भेट दिली. १६४०–४७ या काळात त्याने हॉलंड, रशिया, प्रशिया आणि पोलंड या देशांना भेटी दिल्या. १६५५-५६ मध्ये तो परत भारतात व्यापारासाठी आला. येथून परतल्यावर त्याने आपले लेखन पूर्ण केले.
अठराव्या शतकात कॉर्निश इतिहासकार थॉमस टोनकिन आणि थॉमस फिशर यांना पीटरचे लेखन लंडनमधील इंडिया ऑफिसमध्ये मिळाले. तसेच काही लेखन विल्यम फॉस्टर यांना बोदलीयन ग्रंथालयात (Bodleian Library) सापडले. पुढे सर रिचर्ड टेंपल यांनी एकूण पाच खंडांत पीटरचे प्रवासवर्णन प्रसिद्ध केले.
संदर्भ :
- Temple, Sir Richard Carnac, The Travels Of Peter Mundy In Europe And Asia vol. 1 to 5, The Hakluyt Society, Cambridge.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर