निकितीन, अफानासी : (१४३३ – १४७२). (अफानस न्यिकीत्यिन). भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी. रशियातील त्वेर येथे त्याचा जन्म झाला. मॉस्कोच्या वायव्येस सु. १६० किमी. असलेल्या कालीनीन या शहरी हा व्यापार करीत असे. व्यापारानिमित्त १५ व्या शतकात तो भारतात आला. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाश्याआधी पंचवीस वर्षे आलेला पहिला यूरोपियन प्रवासी म्हणून निकीतीन ओळखला जातो. १४६६ ते १४७२ या त्याच्या प्रवासातील काळात एकूण तीन वर्षे तो भारतात राहिला.

अफानासी निकितीनचे स्मारक, फीओडोशिया (क्रिमिया), युक्रेन.

निकीतीन रशियातील व्होल्गा नदीतून प्रवास करत बुझान येथे पोहोचला. तेथून निघून तो अस्त्रखान येथे पोहोचला. तेथे त्याला लुटण्यात आले. तेथून तो एका जहाजातून व्होल्गा नदीच्या मुखापाशी पोहोचला. तेथेही परत त्याचे जहाज लुटले गेले. पुढे कॅस्पियन समुद्रातून प्रवास करत तो डर्बेंट येथे पोहोचला. वाटेत त्याचे छोटे जहाज वादळात सापडून फुटले. पुढे जॉर्जिया, आर्मेनिया, इराण, मस्कत मार्गे प्रवास करत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दिव बंदरात उतरून खंबायतमार्गे  चौल येथे तो आला. येथे काही दिवस राहून तो पायी प्रवास करत पालीमार्गे जुन्नर येथे पोहोचला. तेथे काही दिवस वास्तव्य करून तो बिदरमार्गे गुलबर्गा येथे पोहोचला. तेथून तो आळंद मार्गे दाभोळ बंदरावर आला. येथून त्याने बोटीने परतीचा प्रवास सुरू केला. पुढे दोन महिन्याचा प्रवास करून तो इथिओपियात पोहोचला. तेथून निघाल्यावर तो मस्कत मार्गे इराणच्या किनाऱ्यावरील ऑरमुझ येथे उतरला. तेथून जमिनीवरून प्रवास करत लारमार्गे शीराझ येथे पोहोचला. तेथून पुढे तो याझ्ड, ताब्रीझ, तुर्कस्तान मधील सिवास मार्गे काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील ट्रेबझोन या शहरात पोहोचला. १४७२ मध्ये तो युक्रेनमधील कीवमार्गे आपल्या गावी म्हणजेच त्वेर येथे परतत असताना त्याचा मृत्यू झाला.

निकीतीन याने लिहिलेले खझेनिये जा त्री मर्या (इं. शी. ‘व्हॉयेज अक्रॉस थ्री सीजʼ) हे प्रवासवृत्त उल्लेखनीय आहे. प्रवासाच्या काळात त्याने लिहिलेल्या संस्मरणिका या प्रवासवृत्तात आहेत. आपल्या सहा वर्षांच्या प्रवासकाळातील अनुभव, लोकांचे वर्णन, त्यानी प्रवास केलेल्या शहरातील अंतरे, त्याला लागलेला वेळ यांचे वर्णन त्याने आपल्या प्रवासवृत्तात केले आहे. तसेच प्रवासात आलेली नैसर्गिक विघ्ने, त्याची झालेली लूट, झालेल्या लढाया यांबद्दलही विस्तृत लेखन केले आहे. भारतातील तत्कालीन समाज, त्यांच्या चालीरीती, त्यांचे धार्मिक विधी, तत्कालीन राजे व सरदारांची जीवनशैली यांची जिवंत आणि वेधक चित्रे त्याने त्याच्या प्रवासवृत्तात रंगवली आहेत. भारतीय वास्तुकला, मंदिरांची सजावट, भारतातील निसर्गसौंदर्य यांचे सुंदर वर्णन त्याने केले आहे.

भारतात तो दिव बंदरात उतरून खंबायतमार्गे चौल येथे पोहोचला. चौलला त्याने ‘चीवील’ असे म्हटले आहे. तेथील लोकजीवनाचे उत्तम वर्णन त्याने केले आहे. येथील माणसे खूप कमी कपडे घालतात, पुरुष आणि स्त्रियांचा वर्ण काळा आहे, येथील लोकांना गोऱ्या माणसांबद्दल खूप कुतूहल वाटते, येथील श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून कापड घेतात आणि दुसरे एक कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात, असे वर्णन त्याने केलेले दिसून येते. चौलहून आठ दिवसांचा जमिनीवरील प्रवास करून निकितीन पाली येथे पोहोचला. पाली ते जुन्नर या प्रवासाला त्याला सोळा दिवस लागले व चौल ते जुन्नर हे अंतर एकशे तीस मैल असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. जुन्नर येथे तेव्हा बहमनी सरदार असदखान होता व तो तेथील हिंदू लोकांबरोबर गेली वीस वर्षे युद्ध करत होता, तसेच त्याच्याजवळ उत्तम प्रतीचे अनेक घोडे आणि हत्ती असून त्याचे सैनिक खुरासन, अरेबिया व तुर्कस्तान येथील आहेत, असे तो म्हणतो.

जुन्नर येथे तो चार महिने होता. जुन्नरचे वर्णन करताना त्याने लिहिले आहे की, येथे सगळीकडे खूप पाणी आणि चिखल असून हे शहर एका खडकाळ बेटावर वसलेले आहे. येथील रस्ता खूप अरुंद असल्याने एकावेळी एकच माणूस येऊ शकतो. पुढे असेही म्हटले आहे की, येथे दारू ही एका मोठ्या मडक्यात बनवली जाते, येथील माणसे घोड्यांना वाटाणे खायला घालतात आणि आपल्या जेवणात साखर व लोणी घालून बनवलेली खिचडी व भाज्या खातात. तेथे त्याच्या जीवनात घडलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्याने केले आहे. एकदा असदखानाने त्याचा घोडा आपल्या ताब्यात घेतला व घोडा परत हवा असल्यास त्याला मुस्लीम धर्म स्वीकारण्याची अट घातली. यासाठी त्याला चार दिवसांची मुदत देण्यात आली होती, पण त्याचवेळी खुरासनचा महंमद नावाचा एक मोठा सरदार तेथे आला असताना निकितीनने आपले गाऱ्हाणे त्याच्यासमोर मांडले. तेव्हा महंमदाने असदखानाला त्याला सोडून देण्याची आज्ञा केली. हा घोडा भारतात येताना ऑरमुझ येथे शंभर रुबल किमतीला विकत घेतला होता, जो त्यांनी नंतर भारतात आल्यावर विकून टाकला. पुढे त्याने असे वर्णन केले आहे की, येथे मसाले सोडून इतर वस्तू खूप महाग मिळतात. येथे येणारा माल हा समुद्री मार्गाने येत असल्याने आमच्या सारख्या लोकांना तो खूप महाग मिळतो. येथून नंतर तो पुढे चाळीस दिवस प्रवास करून बिदर मार्गे गुलबर्गा येथे गेला. हे अंतर एकशे सत्तावन मैल असल्याचे तो म्हणतो. येथील सैनिक हे अनवाणी प्रवास करतात. काही लोक हातात ढाल आणि तलवार घेऊन तर काही लोक धनुष्यबाण घेऊन फिरतात. येथील सैन्यात पुढे पायदळ आणि मागून चिलखत घातलेले हत्ती असतात. त्यांच्या पाठीवर हौदा असून त्यात बारा माणसे बंदुका आणि भाले घेऊन बसतात असे त्याने त्याने म्हटले आहे. गणपती व हनुमान या देवतांना हत्तीचे व माकडाचे तोंड असलेल्या देवता म्हणून त्याने वर्णिले आहे.

निकितीनच्या लेखनात जरी अतिशयोक्तीपूर्ण वर्णन असले, तरी त्याच्या वर्णनात विविध शहरे, धार्मिक पद्धती, देवदेवता, समाज, राजवैभव, त्यांचे पराक्रम, त्यांचे शौक यांबद्दल खूप माहिती मिळते. पाचशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या प्रवासवृत्तामुळे भारताबद्दल परदेशी लोकांमधे खूप उत्सुकता निर्माण झालेली होती, असे दिसते. प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार रशियन साहित्यात आणण्याचे श्रेय निकितीनकडे जाते.

 

संदर्भ :

  • Major, R. J. Ed., India In The Fifteen Century : Being A Collection of Narratives of Voyages to India, London, 2010.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : महेश तेंडुलकर