(स्वीट फ्लॅग). एक बहुवर्षायू औषधी, सपुष्प वनस्पती. वेखंड ही एकदलिकीत वनस्पती ॲकॉरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲकॉरस कॅलॅमस आहे. या वनस्पतीचे मूलक्षोड औषधासाठी वापरले जाते आणि त्यालाही वेखंड म्हटले जाते. ती मूळची भारत, मध्य आशिया, रशिया, सायबीरिया आणि पूर्व यूरोप येथील असून जपान, अमेरिका, चीन या देशांतही लागवडीखाली आहे. ती मुख्यत: पाणथळ व दलदलीच्या जागी वाढते. भारतात सिक्कीम येथे सु. १,८६० मी. उंचीवर तसेच काश्मीर, मणिपूर व नागा टेकड्या या प्रदेशांत ती आढळते. ॲकॉरस प्रजातीत ॲकॉरस कॅलॅमस आणि ॲकॉरस ग्रॅमिनीयस या केवळ दोन जाती आहेत.
वेखंडाचे जमिनीतील खोड म्हणजेच मूलक्षोड. ते मधल्या बोटाएवढे जाड, १.८ ते २.५ सेंमी. व्यासाचे, मांसल असते. मूळ तपकिरी रंगाचे, सुगंधी व शाखायुक्त असून ते जमिनीत सरपटत वाढते. पाने उभी, मुळापासून निघालेली (मूलज), पिवळसर हिरवी, टोकदार, बिनदेठाची, समांतर शिरांची व दोन रांगांमध्ये येतात. केवळ पानथळ जागी वाढलेल्या वेखंडाला फुलोरे येतात. फुलोरा छदकणिश स्वरूपाचा असून तो ५–१० सेंमी. लांब, किंचीत वाकडा आणि रंगाने हिरवा असतो. त्यावर आवरण म्हणजेच छद नसते. फुले द्विलिंगी, फिकट हिरवी व सुगंधी असतात. परिदलपुंज फण्यासारखी असून ती सहा असतात. पुंकेसर सहा, अंडाशय (अविकसित फळ) तीन कप्प्यांचे असून त्यातील प्रत्येक कप्प्यात दोन बीजके (अविकसित बीजे) असतात. फळ पिवळे, भोवऱ्यासारखे व श्लेष्मासारख्या पदार्थाने भरलेले असून पिकल्यावर पाण्यात पडते आणि त्याचा प्रसार घडून येतो.
आयुर्वेदानुसार वेखंड मूत्रल, वायुनाशी, कृमिनाशक, वांतिकारक, विरेचक व भूक वाढविणारे आहे. त्याचा उपयोग पोटदुखी, ताप, दमा, खोकला, घशातील खवखव (श्वासनलिका दाह) इत्यादींवर केला जातो. वेखंडाच्या वाळलेल्या खोडाचे चूर्ण सुगंधी व औषधी असते. ते कडू, तिखट व उष्ण असते. काही सुगंधी पदार्थांमध्ये वेखंड वापरतात. तसेच काही मद्यांमध्ये (जिन, बीर) त्याचा वापर केला जातो. वेखंडाच्या वाळलेल्या खोडामध्ये १.५–३.५ % पिवळट व उडून जाणारे सुगंधी तेल असते. मुळांमध्ये ॲकॉरीन हे ग्लुकोसाइड असते. मुळाचे चूर्ण कृमिउत्सर्जक (जंत काढून टाकणारे) असते.
वेखंडाची ॲकॉरस ग्रॅमिनीयस ही जाती सिक्कीममध्ये (सु. १,८०० मी. उंचीवर) तसेच खासी टेकड्यांच्या प्रदेशांत आढळते. तिला जपानी वेखंड म्हणतात. जपानमध्ये तिचा औषधी उपयोग केला जातो.