सुगंधी आणि स्वादकारक पदार्थ देणारी एक आरोही (आधारावर चढणारी) आमरी (ऑर्किड) वनस्पती. व्हॅनिला या वनस्पतीचा समावेश ऑर्किडेसी कुलातील व्हॅनिला प्रजातीत केला जातो. या प्रजातीत सु. ११० जाती असून त्यांपैकी व्हॅनिला प्लॅनिफोलिया, व्हॅ. पम्पोना आणि व्हॅ. ताहितेन्सिस या तीन मुख्य जाती लागवडीखाली आहेत. या प्रजातीतील वनस्पतीच्या शेंगांपासून व्हॅनिला हा सुगंधी व स्वादकारक द्रव मिळविला जातो.
व्हॅनिला प्लॅनिफोलिया ही वनस्पती मूळची मेक्सिको देशातील असून मादागास्करसारख्या उष्ण प्रदेशांतही तिची लागवड केली जाते. या वनस्पतीचे खोड लांब व मांसल असते. एखाद्या वेलीप्रमाणे ते हवाई मुळांच्या साहाय्याने इतर झाडांना चिकटून वाढते. तिची मुळे जमिनीतही वाढतात. ही वनस्पती सु. ३५ मी. लांब वाढते. पाने जाड, चामड्यासारखी, गडद हिरव्या रंगाची असून एकाआड एक, आयताकृती, अंडाकृती असतात. फुले स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात येतात. फुले फार कमी वेळ उमललेली राहतात; सकाळी उमललेली फुले मध्यान्हानंतर कोमेजतात. एका स्तबकावर साधारणपणे २० ते १०० फुले असून ती मोठी व आकर्षक असतात. फुले रंगाने पांढरी, हिरवी, पिवळट हिरवी किंवा मोतिया असून ती आकाराने तुतारीसारखी असतात. निदलपुंज व दलपुंज एकमेकांना जुळलेले असतात. पुंकेसर वरच्या बाजूला आणि कुक्षीवर लटकलेले असतात. फुले उमलल्यानंतर कोमेजून जाईपर्यंत जर परागण झाले नाही तर फुले गळून पडतात. या फुलांमध्ये हमिंग पक्षी (गुंजारव पक्षी) व मेलिपोना मधमाशी यांच्याद्वारे परागण घडून येते. ज्या ठिकाणी हमिंग पक्षी किंवा मेलिमोना मधमाशी नसते तेथे फुलांचे परागण कृत्रिमरीत्या लाकडी सुईने करतात. फुले सुगंधी असल्यामुळे हमिंग पक्षी आकर्षित होतात. फळ शेंग प्रकारचे असून १०–२० सेंमी. लांब, मांसल असून तीत अनेक लहान बिया असतात. शेंगा ८-९ महिन्यानंतर पक्व होतात.
व्हॅनिलाच्या ताज्या फळांना स्वाद नसतो. त्यामुळे फळे विशिष्ट विकरांच्या साहाय्याने मुरवितात. मुरविण्याच्या प्रक्रियेमुळे व्हॅनिलाच्या शेंगाना विशिष्ट स्वाद येतो. या पद्धतीमध्ये काढलेली फळे ओल येण्यासाठी रात्रभर ढीग लावून ठेवतात आणि दिवसा उन्हात वाळवितात. साधारणपणे दहा दिवसांनंतर फळे गडद चॉकलेटी तपकिरी रंगाची होतात. ती तबकांत पसरून हवेशीर जागी सावलीत ठेवतात. फळे मुरविण्यासाठी व सुकविण्यासाठी ४-५ महिन्यांचा काळ लागतो. मुरविलेल्या फळांवर व्हॅनिलाच्या स्फटिकांचे पातळ आवरण येते. त्यामुळे त्यांना गोड व वैशिष्ट्यपूर्ण स्वाद येतो. व्हॅनिलिन या सुगंधी पदार्थामुळे या फळांना वास येतो. व्हॅनिलाचे आवरण येणारी फळे उत्तम समजली जातात. निसर्गतः व्हॅनिला फळाच्या मांसल बाह्यावरणात नसतो, परंतु तो अस्तरावर असलेल्या अंकुरकांच्या उंचवट्यांतून स्रवला जातो आणि तो बियांना वेढणाऱ्या दाट, तेलकट द्रवातून पाझरतो. व्हॅनिला अर्क मिळविण्यासाठी मुरविलेली व वाळविलेली फळे चिरडून अल्कोहोलने त्यांचे निष्कर्षण करतात. व्हॅनिला अर्काचा उपयोग विविध पेये, मेवामिठाई, आइस्क्रीम, बेकरी पदार्थ यांच्यात केला जातो.
व्हॅनिला ताहितेन्सिस ही जाती मुख्यत: ताहिती बेटांवर आढळते. या वनस्पतीची फळे तांबूस तपकिरी रंगाची असून ती व्हॅ. प्लॅनिफोलिया जातीच्या फळांपेक्षा कमी सुवासिक असतात. मात्र त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण स्वाद असतो. व्हॅ. पम्पोना ही जाती मुख्यत: मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात आढळते. या वनस्पतीचे खोड व पाने व्हॅ. प्लॅनिफोलिया जातीच्या खोड व पाने यांच्यापेक्षा जाड असतात.