पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मनुष्याला आनंद मिळू शकतो. पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक ज्ञानात भर पडते. जसे, गालॅपागस बेटावरील फिंच आणि इतर पक्ष्यांच्या निरीक्षणातून चार्ल्स डार्विन यांना नैसर्गिक निवडीतून जाती-उत्पत्ती होते, याची कल्पना आली. पक्ष्यांच्या अभ्यासातून ‘पक्षिविज्ञान’ (ऑर्निथोलॉजी) ही प्राणिविज्ञानातील एक स्वतंत्र शाखा विकसित झाली आहे. पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांचे वर्गीकरण करण्यास मदत होते. यात पक्ष्यांचे आकार, पिसारा, रंग, अधिवास, वर्तन या बाबींचा विचार केला जातो. भारतात डॉ. सलीम अली या पक्षितज्ज्ञाने पक्षी निरीक्षणाचा पाया घातला. भारत आणि लगतच्या देशांत फिरून त्यांनी पक्षी निरीक्षण केले आणि पक्ष्यांविषयी माहितीचा प्रसार केला.

पक्षी निरीक्षणात मुले किंवा प्रौढ दोघेही सहभागी होऊ शकतात. पक्षी निरीक्षण उघड्या डोळ्यांनी, दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा पक्ष्यांचे आवाज ऐकून देखील करता येते. मात्र, त्यासाठी काही पथ्ये आणि नियम पाळावे लागतात. या छंदाच्या जोपासनेसाठी आवश्यक साहित्य लागते. यात पक्ष्यांवरील एखादे पुस्तक आणि नोंदवही, सोयीस्कर पोशाख, डोक्यावर टोपी, एक चांगल्या क्षमतेची दुर्बिण, शक्य असल्यास कॅमेरा इ. वस्तू असल्यास हा छंद जोपासायला अधिक मजा येते. पक्ष्यांविषयीच्या पुस्तकांचे वाचन आणि त्याबद्दल चिंतन आधी करून ठेवलेले चांगले असते. विशिष्ट अधिवासात पक्षी निरीक्षणासाठी जाताना त्या परिसरात कोणते पक्षी आढळतात याची यादी करून ठेवल्यास उपयुक्त ठरते. तसेच दुर्बिण व कॅमेरा ही उपकरणे हाताळायची माहिती आणि कौशल्य असावे लागते. बागा, नदीचे काठ, धरणे, सरोवरे, माळरानांवर पक्षी येऊ शकतील अशी झाडे किंवा तत्सम ठिकाणे आणि गावातील दाट झाडीचे एखादे ठिकाण पक्षी निरीक्षणास उपयोगी ठरते.

पक्षीनिरीक्षणातील काही क्षण

पक्षी निरीक्षणासाठी सकाळची वेळ नेहमी सोयीस्कर ठरते. कारण रात्रभराच्या उपवासानंतर सकाळी पक्षी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, असे ठिकाण दूरवर असल्यास पहाटे वेळेवर त्या ठिकाणी जाऊन बसावे लागते. दुपारी उन्हाच्या वेळी पक्षी आडोशाला दडून बसतात. म्हणून शक्यतो दुपारची वेळ पक्षी निरीक्षणासाठी योग्य नसते. पक्षी निरीक्षणाला मोठी गर्दी करून चालत नाही. किमान एखादा तरी अनुभवी सदस्य सोबत असावा लागतो. अशा ठिकाणी आपापसात मोठ्याने बोलणे टाळावे लागते. भडक रंगांच्या पोशाखांऐवजी परिसराशी मिळतेजुळते, खाकी किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालावे लागतात. पायात रबरी तळवे असलेले बूट घालतात. अत्तरे किंवा इतर सुगंधी द्रव्ये लावू नयेत. आयपॅड, मोबाईल वगैरे साधनांवर गाणी व वाद्यसंगीत वाजवू नये. कोणीही आरडाओरड करू नये. गाणी म्हणू नयेत. पळापळ, हातवारे इत्यादी कटाक्षाने टाळावे. पक्ष्यांना जाणवू न देता पक्षी निरीक्षण लपून राहूनच करावे. आपल्यासोबत पाणी आणि थोडेसे कोरडे अन्न बाळगावे. अशा सहलीत स्वत:ला आणि सोबत्यांना जपावे. अनावश्यक धाडस करून जीव धोक्यात घालू नये. पक्ष्यांच्या घरट्याजवळ जाणे, त्यातील अंडी अथवा पिले यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये.

निरीक्षण सहलीतील कामाच्या नोंदी आणि निरीक्षणाचे तपशील व बारकावे सोबत असलेल्या वहीमध्ये लिहावेत. त्यात जागा, वेळ, दिनांक, निरीक्षकाचे नाव, प्रत्यक्ष त्या पक्ष्याच्या आकाराबद्दल, रंग-रूपाबद्दल लिहिताना माहीत असलेल्या पक्ष्यांचा तौलनिक उल्लेख करावा. पक्ष्याच्या पिसांचा रंग, चोचीचा रंग, पायांचा रंग, त्यांची ठेवण यांचा उल्लेख करावा. तसेच पक्षी काय करीत होता याबद्दलही लिहिले पाहिजे. विशेषत: खाणे, घरटे बांधणे, भांडणे, प्रणयाराधन इ. गोष्टींचा उल्लेख पाहिले असल्यास आवर्जून करावा.

पक्षी निरीक्षणाच्या छंदातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात. सर्वांत प्रथम यातून निर्भेळ आनंद मिळतो. आपण जिथे भटकंती करतो, त्या परिसराशी आपला मैत्रीभाव वाढतो. निसर्गाशी आपले नाते दृढ होत जाते. नोंदी जपून ठेवल्या तर कालांतराने पक्ष्यांच्या जातींच्या वावराचा, आपल्या भागात होत आलेल्या बदलांचा इतिहास अनायासे लिहिला जातो. म्हणून आपल्या नोंदवहीत लिहिण्याच्या माहितीचे योग्य संयोजन होण्यासाठी विचारपूर्वक आखणी करून ठेवावी. पक्षी निरीक्षणाला सुरुवात करण्याबरोबरच एखादा गट किंवा मंडळ स्थापन करावे. इतर पक्षी निरीक्षण व निसर्गप्रेमी मंडळांशी संपर्क करावा व माहितीची देवाणघेवाण करावी.