(लिव्हिंग वर्ल्ड). आपल्या भोवतालची सृष्टी निर्जीव आणि सजीव यांची बनलेली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा समावेश सजीवसृष्टीत केला जातो. सजीवसृष्टीला ‘जीवसृष्टी’ असेही म्हणतात. सजीव आणि निर्जीव यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. सजीवांमध्ये हालचाल (चलनवलन), संवेदनक्षमता, चयापचय, प्रजनन, वृद्धी आणि मृत्यू अशा काही विशिष्ट जीवन प्रक्रिया घडून येत असतात. निर्जीवांमध्ये जीवन प्रक्रियांचा अभाव असतो.
सजीवांची निश्चित अशी एक व्याख्या करणे अवघड आहे. मात्र, सजीवांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म किंवा लक्षणे असतात. त्यानुसार सजीव आणि निर्जीव यांच्यातील भेद लक्षात येतात. सजीवांचे शरीर पेशींनी बनलेले असते; त्यांना विशिष्ट आकार आणि आकारमान असते; त्यांना ठरावीक आयु:काल आणि मृत्यू असतो; शिवाय चयापचय, पोषण, श्वसन, उत्सर्जन, वृद्धी, संवेदनक्षमता आणि प्रतिसाद, चलनवलन, प्रजनन, पर्यावरणाशी अनुकूलन आणि उत्क्रांती अशी लक्षणेही त्यांच्यात दिसून येतात. या विविध लक्षणांपैकी काही लक्षणे निर्जीवांमध्येही आढळतात. मात्र कोणत्याही निर्जीवात एका वेळी एखादे-दुसरेच लक्षण आढळते. सजीवांत ही सर्व लक्षणे एकत्रितपणे आढळतात.
सजीवसृष्टीचा अभ्यास करायचा झाल्यास प्रथम सजीवांचा आकार व आकारमान, स्वरूप, जीवनपद्धती इ. लक्षणांमध्ये असलेले साम्य आणि भेद लक्षात घ्यावे लागतात. सजीवांमधील सारखेपणा आणि भेद यांचा अभ्यास करून समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविले गेले आहेत. सजीवांच्या गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. साधारणपणे उत्क्रांतीचा मागोवा घेऊन सजीवसृष्टीचे वर्गीकरण केलेले असून वर्गीकरणात १००% अचूकता येणे, अवघड आहे. यासाठी वर्गीकरण थोडे लवचिक ठेवण्यात आले असून कालानुरूप त्यात सुधारणा किंवा बदल करण्यात येतात. या वर्गीकरणानुसार सजीवांचे सर्वात व्यापक गट म्हणजे सृष्टी. तसेच सर्वात प्राथमिक गट म्हणजे जाती (स्पिशीज). प्रत्येक जातीचा सजीव अन्य जातींतील सजीवांहून वेगळा असतो. सजीवांच्या सु. ८० लाखांपेक्षा जास्त जाती आहेत. या आविष्काराला ‘जैवविविधता’ म्हणतात.
सजीवसृष्टीची व्यापक स्तरावरची विभागणी प्रथमत: वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी अशा दोनच गटांत करण्यात आली. ही विभागणी अपुरी आहे असे आढळल्यामुळे नंतर वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा अशी विभागणी केली गेली. प्रोटिस्टामध्ये सर्व सूक्ष्मजीवांचा समावेश करण्यात आला. परंतु ती परिपूर्ण न वाटल्याने तिचे प्रोटिस्टा आणि मोनेरा हे दोन स्वतंत्र गट करून चार वेगवेगळ्या सृष्टी मानल्या गेल्या. पुढे हेही वर्गीकरण अपुरे पडल्यामुळे रॉबर्ट एच. व्हिटाकर (१९६९) याने पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती अस्तित्वात आणली. त्यानुसार मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, वनस्पती आणि प्राणी अशा पाच सृष्टी अस्तित्वात आल्या. सध्याची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही सजीवांची पेशीरचना (आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी), सजीवांची रचना (एकपेशीय, बहुपेशीय), पेशीभित्तिका, पोषण पद्धती (शोषण, प्रकाशसंश्लेषण, अंतर्ग्रहण) या गुणधर्मांवर आधारित आहे.
मोनेरा सृष्टी : या सृष्टीत एकपेशीय सजीवांचा समावेश केला जातो. पेशी आदिकेंद्रकी असून पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक किंवा अंगके नसतात. हे सजीव स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. हालचालीसाठी कशाभिका आणि झलरिका (पिलाय) असतात. उदा., एश्चेरिकिया कोलाय, नॉस्टॉक, ॲनाबिना (पाहा : मोनेरा सृष्टी).
प्रोटिस्टा सृष्टी : या सृष्टीत एकपेशीय, दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. पेशींमधील केंद्रक पटलबद्ध असून पेशीअंगके असतात. यांपैकी काही सजीव स्वयंपोषी, तर काही परपोषी असतात. हालचालीसाठी कशाभिका, पक्ष्माभिका आणि छद्मपाद असतात. उदा., अमीबा, यूग्लीना (पाहा : प्रोटिस्टा सृष्टी).
फंजाय सृष्टी : फंजाय यांना कवके असेही म्हणतात. या सृष्टीतील सजीव बहुपेशीय असतात. अपवाद फक्त किण्व (यीस्ट) आहे, कारण ते एकपेशीय असते. कवकांच्या पेशी दृश्यकेंद्रकी असून पेशींमध्ये असंख्य, पटलबद्ध, सूक्ष्म केंद्रके आणि पेशीअंगके असतात. यातील बहुसंख्य सजीव परपोषी असून ते कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. म्हणून त्यांना मृतोपजीवी म्हणतात. पेशीभित्तिका कायटीन अथवा सेल्युलोज यांपासून, तर काहींमध्ये ती दोन्हींपासून बनलेली असते. काही कवके तंतू रूपी असतात. पेशीद्रवात हरितलवके नसतात. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही. उदा., पक्सिनिया ग्रॅमिनीस (गव्हावरील तांबेरा), ग्लुगिया स्टेफनी (पाहा : फंजाय सृष्टी).
वनस्पतिसृष्टी : वनस्पती बहुपेशीय असतात. वनस्पतीतील पेशी दृश्यकेंद्रकी असतात. त्यांच्या पेशींना पेशीभित्तिका असून पेशींमध्ये हरितलवके असतात. वनस्पती स्वयंपोषी आणि अचल असतात. इतर सर्व सजीव अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. उदा., स्पायरोगायरा, जेलिडियम.
प्राणिसृष्टी : प्राणी बहुपेशीय असतात. प्राणी पेशी दृश्यकेंद्रकी असतात. प्रद्रव्यपटल हेच पेशीचे बाह्यतम आवरण असते. ते हालचाल करतात. प्राणी परपोषी असतात. उदा., समुद्रतारा, खेकडा, जलव्याल (हायड्रा) (पाहा : प्राणिसृष्टी).
अलीकडच्या काळात झालेल्या आनुवंशिकीच्या अभ्यासातून कोणत्याही सजीवाचे नेमके पूर्वज कोण हे शोधणे शक्य झाले आहे. यातून असे दिसून आले आहे की मोनेरा सृष्टीतील सजीवांचे दोन असे गट आहेत की, प्रत्येक गटातील सजीव एकाच पूर्वजापासून उत्क्रांत किंवा विकसित झालेले आहेत. या दोन गटांना जीवाणू (बॅक्टेरिया) आणि आर्किया म्हणतात. त्यामुळे काही जीवशास्त्रज्ञ या दोन गटांना वेगळ्या सृष्टी मानतात. त्यांच्या या मतानुसार जीवसृष्टी सहा वेगवेगळ्या सृष्टींची बनलेली आहे.
सजीवसृष्टीमध्ये विषाणूंना स्थान दिलेले नाही. कारण विषाणूंमध्ये निर्जीव अणि सजीव या दोन्हींची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे विषाणू हे निर्जीव आणि सजीव यांच्यामधील संक्रमणावस्था आहे, असे मानतात. सजीवसृष्टीच्या संदर्भातील सर्वात मूलभूत प्रश्न – सजीवांची उत्पत्ती कशी झाली हा आहे. यासंदर्भात अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत.