प्राचीन ग्रीसमध्ये तेथील भौगोलिक व राजकीय परिस्थितीमुळे चित्रकलेच्या अनेक आंतरसंबंधित परंपरा निर्माण झाल्या होत्या. इजीअन कला-संस्कृतीतील मिनोअन आणि मायसीनीअन कला-संस्कृतींचा प्रभाव ग्रीक मुख्यभूमीवर कायमच होता. चित्रकलेच्या परस्पर जोडल्या गेलेल्या अनेक परंपरा प्राचीन ग्रीसमध्ये होत्या. तांत्रिक मतभेदांमुळे त्यांच्यात काही घडामोडी झाल्या. परिणामी चित्रकलेत नवनवीन शैलींची निर्मिती झाली. प्राचीन ग्रीक संस्कृतीत भौमितिक काळातील साधारण इ.स.पू. ९०० ते ७०० या कालावधीतील मृत्पात्रांवर चित्रणाचे पुरावे सापडले आहेत. नंतरच्या आर्ष काळातील प्रामुख्याने इ.स.पू. ६२५ ते ४८० या कालावधीतील मृत्पात्री आणि शिल्पांवर चित्रणाचे प्रमाण वाढत गेल्याने आपोआपच तत्कालीन चित्रकारांना अधिक वाव मिळत गेला. या काळापासून अभिजात कलाकृतींमध्ये दगड व पक्वमृदेच्या रंगविलेल्या फरशा, लाकडी फलकांचे भाग, भित्तिचित्रे आणि मातीच्या कलशांवर केलेले सजावटीचे चित्रण अशा विविध माध्यमांवर चित्रण केलेले आढळते. भित्तिचित्रे आणि कलशांवरील चित्रकला ही नंतर अभिजात काळातही सुरू राहिलेली दिसून येते. अभिजात चित्रकलेतील संगमरवरातील फलक आणि भित्तिचित्रांच्या प्रतिकृती नंतरच्या काळातही उपलब्ध झालेल्या आढळतात. ग्रीकांश काळातील चित्रकलेमध्ये कलशांवरील चित्रणाचे प्रमाण कमी होऊन थडग्यांवरील, घरांवरच्या भितींवरील तसेच थडग्यांचे दगड यांवरील चित्रणाचे प्रमाण वाढलेले दिसते. काही चित्रमय मोझेक (mosaic) कलाकृतीही या काळात निर्माण झाल्याचे आढळते. ग्रीक चित्रकारांनी शिल्पांवर केलेले चित्रणही उच्च दर्जाचे होते. ग्रीकांश काळापर्यंत त्याचे कौतुक वाढत जाऊन शिल्पांवरील चित्रणाचा सराव हा त्याकाळी शिक्षणाचा एक महत्त्वाचा घटक झाला होता.
प्राचीन काळातील ग्रीक कलाकारांबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. नंतरच्या काळातील रोमन तत्त्वज्ञ प्लिनी (इ.स. २३ ते ७९), पॉझनियस (Pausanias, इ.स. १४३-१७६) व इतर लेखकांच्या वर्णनात्मक लेखांतून ग्रीक चित्रकला किती वास्तववादी प्रभाव टाकणारी होती याचे उल्लेख मिळतात. फारच कमी ग्रीक चित्रांच्या प्रती आजपर्यंत जतन होऊ शकल्या असल्या, तरी त्यांवरून त्यांच्या तंत्र व शैलीची माहिती मिळते. नंतरच्या काळातील चित्रांवर दिसून येणारा ग्रीक चित्रकलेचा प्रभाव लक्षणीय आहे. इट्रुस्कन थडग्यात सापडलेल्या मातीच्या कलशावरील चित्र आणि भित्तिचित्रे ग्रीक चित्रशैलीच्या प्रभावाची साक्ष देतात. रोमन काळांमध्ये ग्रीक चित्रांच्या अनेक प्रतिकृती तयार झाल्याचे आढळते. याउलट चित्रण असलेली मृत्पात्री प्राचीन काळापासून हजारोंच्या संख्येने विविध उत्खननांतून मिळाली असली, तरी त्यांचा कोठेही लिखित स्वरूपात उल्लेख आढळत नाही. तरीही मृत्पात्रांवरील चित्रण शैलीवरून जवळजवळ १०००च्या वर मृत्पात्र-चित्रकारांची ओळख पटवण्यात तज्ञांना यश मिळाले आहे.
ग्रीकांची सुरुवातीच्या काळातील चित्रकला मृत्पात्र-चित्रणाबरोबर विकसित होत गेल्याचे आढळते. सुरुवातीच्या काळातील चित्रणाचा विकास मृत्पात्रांवरील समानरेषा, बाह्यरेखा आणि रंगांच्या सपाट भागावर जास्त अवलंबून दिसतो. नंतरच्या काळात नक्षीकाम अजून प्रगत होत गेले; परंतु त्याचबरोबर मृत्पात्र-चित्रणाचे प्रमाण कमी होत गेल्याचे आढळते.
ग्रीक कलाकार ज्या पृष्ठभागांवर चित्रण करायचे. त्यांमध्ये मृत्पात्रांशिवाय प्रामुख्याने भिंती, लाकडांचे व संगमरवराचे फलक, पक्वमृदेच्या लादी अथवा फरशा; कधीकधी हस्तिदंत, चामडे, चर्मपत्र वा तागाचे कापड अशा विविध माध्यमांचा वापर केलेला आढळतो. ह्या पार्श्वभागांपैकी ज्यांना भाजण्याच्या प्रक्रियेतून जावे लागते, अशा पक्वमृदेच्या कलाकृतींव्यतिरिक्त भित्तिचित्रे आणि तावदानांसाठी कितीतरी विविध रंगांचा वापर झालेला दिसतो. भित्तिचित्रांसाठी भित्तिलेपचित्रण व चिकणरंग चित्रपद्धती, संगमरवर आणि लाकडी फलकांवरही चिकणरंग चित्रणपद्धती तसेच लाक्षचित्रण पद्धतींचा वापर केलेला दिसतो. लाक्षचित्रण पद्धती ही प्रथम सातत्याने संगमरवरातील शिल्पे-प्रतिमांवरती, नंतर इ.स.पू. सहाव्या शतकात वास्तुशिल्पांवरील बारकावे दाखविण्यासाठी, पाचव्या शतकात तावदाने व फलकांवर चित्रणासाठी वापरल्याचे आढळते.
बहुतेक ग्रीक शिल्पे मजबूत व चमकदार बहुविध रंगात रंगविलेली आढळतात. ह्या बहुविध रंगातील चित्रणाला ग्रीकमध्ये ‘पॉलिक्रोमी’ असे म्हणतात. शिल्प कांस्य वा दगड यांपैकी कोणत्याही माध्यमात असले, तरी बऱ्याचदा शिल्पाकृतीच्या शरीराचे दर्शनी भाग तसेच नैसर्गिक ठेवून रंगांचे लेपन प्रामुख्याने शिल्पाच्या कपडे व केस यांवरच केले जाई.
प्लिनी, पॉझनियस यांनी उल्लेखिलेल्याप्रमाणे आर्ष काळातील चिकणरंग व लाक्षचित्रण पद्धतींचा वापर करून केलेल्या लाकडी फलकांवरील चित्रणास कलेतील एक आदरणीय रचना म्हणून बघितले जाते. ग्रीक कलाकारांनी आत्मसात केलेली, तैल चित्रांप्रमाणे उठाव व समृद्धता असलेली लाक्षचित्रण पद्धती जास्त कष्टकारक होतीच; पण ही चिकणरंग चित्रणपद्धतीपेक्षा अधिक टिकाऊही होती. या फलक चित्रांमध्ये सामान्यतः मानवाकृती देखावे तसेच व्यक्तिचित्रण आणि स्थिरचित्रणे केलेली आढळतात; परंतु स्वभावतः नाशवंत असलेल्या लाकडाच्या गुणधर्मामुळे फलक चित्रांमधील अनेक उत्तम कलाकृती अथवा त्यांच्या प्रतिकृतीही आजपर्यंत टिकू शकलेल्या नाहीत. फलक चित्रांच्या आजपर्यंत टिकू शकलेल्या फार कमी उदाहरणांमध्ये सुमारे इ.स.पू. ५३० मधील कॉरिंथिया येथील पितसा फलकांचा (Pitsa Panels) समावेश होतो. या लाकडी फलकांवर पांढरा रंग मिश्रित चुन्याचा गिलावा (stucco) देऊन त्यावर काळा, निळा, तांबडा, हिरवा, पिवळा, जांभळा व तपकिरी ह्या रंगाच्या खनिज रंगद्रव्यांनी कुठल्याही छटांशिवाय चित्रण केलेले आढळते. या फलकांवर प्रामुख्याने ग्रीक पुराणदेवता निम्फ (Nymph) च्या पंथाशी संबंधित धार्मिक दृश्यांचे चित्रण केलेले आढळते. अभिजात काळातील फलक चित्रणात चित्रमय आकार वृद्धिंगत होऊन त्यात प्रामुख्याने आकृतीमय दृश्ये, व्यक्तिचित्रे आणि स्थिरचित्रांबरोबरच पौराणिक कल्पनांचा देखील समावेश दिसतो. समतोल प्रमाण व रेषांमधील सौम्यता ठेवत आदर्श सौंदर्याचे प्रतीक मानल्या गेलेल्या नायक व नायिकांची चित्रे काढण्यात चित्रकारांनी यश संपादन केलेले दिसते.
संदर्भ :
- Betancourt, Philip P., Introduction to Aegean Art. Philadelphia, 2007.
- Boardman, J. and Callaghan, P., ‘Western Painting, Greece, Archaic period (c. 625–500 bc)’, Encyclopædia Britannica, 2008.
- Stewart, Andrew F., Classical Greece and the Birth of Western Art, Cambridge, 2008.
- Turner, Jane, ed., The Dictionary of Art. V13. New York : Grove Dictionaries Inc: 471-485, 1996.
- Von Bothmer, Dietrich, Greek Vase Painting, New York, 1987.