(हॉर्मोन्स). प्राणी किंवा वनस्पती यांच्यातील संदेशवाहक रासायनिक संयुगाला ‘संप्रेरक’ म्हणतात. पेशींच्या, ऊतींच्या वा इंद्रियांच्या क्रियांचे नियंत्रण, नियमन तसेच त्यांच्यात समस्थिती राखण्याचे कार्य संप्रेरकांद्वारे होते. संप्रेरके सजीवांच्या विशिष्ट भागात निर्माण होतात, परंतु त्यांचे परिणाम इतर भागात होतात. संप्रेरके शरीराच्या निरनिराळ्या भागात रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करतात आणि वेगवेगळ्या इंद्रियांच्या कार्यांत समन्वय घडवून आणतात. मानवात तसेच इतर प्राण्यांमध्ये वाढ, विकास आणि प्रजनन इ. बाबींवर संप्रेरके नियंत्रण राखतात. वनस्पतींमध्ये वाढीसंबंधीच्या अनेक बाबींचे संप्रेरके नियमन करतात. एखाद्या सजीवात विशिष्ट संप्रेरक तयार होत नसल्यास प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो, तर दोषयुक्त संप्रेरकामुळे प्राणी, वनस्पती खुजे राहतात किंवा एकदम उंच वाढतात. मानवामध्ये संप्रेरके ज्या ग्रंथीपासून स्रवतात तेथे रक्तप्रवाहात मिसळतात, त्यांच्या लक्ष्यापर्यंत ते वाहून नेले जातात आणि आपले कार्य करतात. ज्या ऊतींवर किंवा अवयवांवर संप्रेरकांचा परिणाम होतो, तेथील पेशींवर संप्रेरक-ग्राही असेल, तरच संप्रेरकांचा परिणाम होतो. संप्रेरके अत्यंत सूक्ष्म प्रमाणात स्रवतात. त्यांचे कार्य पूर्ण झाले की ग्राही पेशी संप्रेरकांना निष्प्रभ करतात. अतिरिक्त संप्रेरके यकृत आणि रक्तप्रवाहामधून वृक्कावाटे शरीराबाहेर टाकली जातात.
संप्रेरकांच्या आणि चेतासंस्थेच्या कार्यप्रक्रिया दोन्ही सारख्याच असतात. मात्र दोन्ही प्रक्रियांमध्ये, प्रक्रियेचे परिणाम कसे घडले, परिणामांचा कालावधी किती टिकला आणि व्याप्ती केवढी होती इत्यादींनुसार फरक असतो. संप्रेरकांचे परिणाम सावकाश होतात, प्रभाव दीर्घकाळ टिकतो आणि शरीरभर होतो. चेतासंस्थेचा प्रतिसाद तत्काळ येतो, प्रभाव अल्पकाळ राहतो आणि विशिष्ट भागापुरताच असतो.
ब्रिटिश वैज्ञानिक विल्यम बेलिस आणि अर्नेस्ट हेन्री स्टार्लिंग यांना १९०२ मध्ये पचनक्रियेतील काही महत्त्वाच्या क्रिया रासायनिक संयुगांमुळे म्हणजे संप्रेरकांमुळे नियंत्रित होतात, असे आढळून आले. त्यानंतर मनुष्याच्या शरीरातील सु. ५० संप्रेरके वैज्ञानिकांनी शोधून काढली असून जिवंत ऊतींपासून संप्रेरके मिळवणे, तसेच प्रयोगशाळेत संप्रेरक कृत्रिमरीत्या संश्लेषित करणे याची तंत्रे वैज्ञानिकांना माहीत झाली आहेत.
मानवी संप्रेरके
मनुष्याच्या शरीरातील बहुतेक संप्रेरके अंत:स्रावी ग्रंथींद्वारे स्रवतात (पाहा : कु. वि. भाग १ – अंत:स्रावी ग्रंथी). या ग्रंथींमध्ये मुख्यत: दोन अधिवृक्क (ॲड्रिनल) ग्रंथी, चार परावटू (पॅराथायरॉइड) ग्रंथी, जनन ग्रंथी (गोनॅड), पीयूषिका (पिट्युटरी; पोष) ग्रंथी आणि अवटू (थायरॉइड) ग्रंथी यांचा समावेश होतो. काही संप्रेरके जठर, स्वादुपिंड या इंद्रियांच्या अंत:स्रावी ऊतींद्वारे निर्माण होतात. संप्रेरकांद्वारे होणारे निरनिराळ्या शारीरक्रियांचे नियमन तसेच नियंत्रण यांनुसार त्यांचे गट केले जातात. यात शरीराद्वारे अन्नाचा वापर, शरीराची वाढ तसेच विकास, लिंग आणि प्रजनन, रक्तसंघटनातील नियमितपणा, आणीबाणीच्या परिस्थितीत शरीराचा प्रतिसाद आणि संप्रेरकाचे स्वत:वरचे नियंत्रण इत्यादींचा समावेश होतो.
चयापचयीन संप्रेरके : शरीरातील अन्नाचे रूपांतर ऊर्जा आणि ऊतीनिर्मितीसाठी होताना ‘चयापचय’ प्रक्रियांतील वेगवेगळ्या टप्प्यांचे नियमन संप्रेरकांद्वारे होते. उदा., जठर, लहान आतडे यांच्याद्वारे अनेक पाचक संप्रेरके स्रवली जातात. ही संप्रेरके अन्नपचन करणाऱ्या पाचक रसांवर नियंत्रण ठेवतात.
पचलेल्या अन्नाचे कण रक्तप्रवाहात शिरतात, तेव्हा रक्तातील शर्करेचे ‘ग्लुकोजचे’ प्रमाण वाढते. रक्तातील ग्लुकोजचा वापर शरीरातील पेशींनी कसा करावा, याचे नियमन इन्शुलीन आणि ग्लुकॅगॉन ही संप्रेरके करतात. ही संप्रेरके स्वादुपिंडाद्वारे स्रवली जातात. थोडक्यात, अन्नपचनानंतर रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे स्वादुपिंड इन्शुलीन स्रवते. इन्शुलीन पेशींना रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये साठवण्याची सूचना देते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते; हे ग्लुकोज काही पेशी ऊर्जा म्हणून वापरतात, तर यकृताच्या किंवा स्नायूंच्या पेशींमध्ये हे ग्लुकोज ग्लायकोजेनच्या स्वरूपात इंधन म्हणून साठवले जाते. पुढील चार-सहा तासांनंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते, तेव्हा स्वादुपिंड ग्लुकागॉन स्रवते आणि ते यकृत पेशींना साठलेले ग्लुकोज रक्तात मिसळण्याची सूचना देते. अशा प्रकारे पेशींना पुन्हा ऊर्जेचा पुरवठा होतो. स्वादुपिंडाकडून इन्शुलीन कमी प्रमाणात स्रवले, तर मधुमेह उद्भवतो.
अवटू ग्रंथीद्वारे थायरॉक्सिन आणि ट्राय-आयोडो-थायरोनीन ही संप्रेरके स्रवतात. पेशींकडून अन्नाचा वापर ऊर्जा मुक्त करण्यासाठी कसा होतो, यावर ती नियंत्रण ठेवतात. ही संप्रेरके अतिप्रमाणात स्रवली, तर शारीरिक व भावनिक क्षोभ उदा., उत्तेजित होणे, स्नायू दुर्बल होणे, नाडी व श्वसनक्रिया वेगाने होणे, वजन घटणे इत्यादी उद्भवतात. परंतु, ही संप्रेरके कमी प्रमाणात स्रवली, तर शरीराचे तापमान कमी होणे, मानसिक आणि शारीरिक शिथिलता येणे, वजन वाढणे अशी लक्षणे आढळतात. ऊर्जानिर्मितीबरोबर अन्नाचा वापर ऊतीनिर्मितीसाठी कसा करावा यासाठी ही संप्रेरके मदत करतात. अशा रीतीने ही संप्रेरके पेशींद्वारे नवीन प्रथिननिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अवटू ग्रंथीद्वारे स्रवलेली संप्रेरके शरीराची वाढ आणि विकास यांचेही नियमन करतात. गर्भावस्थेत अवटू संप्रेरकांची कमतरता झाल्यास जन्मलेले अर्भक खुजे वाढू शकते किंवा मतिमंद होऊ शकते.
अन्नाचा वापर करून पेशी नवीन ऊतीनिर्मिती कशी करतात, यावर अन्य काही संप्रेरकेदेखील नियंत्रण ठेवतात. ग्लुकोकॉर्टिकॉइडे हा संप्रेरकांचा गट कर्बोदके (शर्करा आणि स्टार्च), मेद आणि प्रथिने यांच्या चयापचयाचे नियमन करतो. यात कॉर्टिकोस्टेरोन, कॉर्टिसोल आणि कॉर्टिसोन ही संप्रेरके येतात. ग्लुकोकॉर्टिकॉइडे प्रत्येक अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकाकडून स्रवली जातात. इन्शुलीन आणि पीयूषिका ग्रंथीने स्रवलेली वृद्धी संप्रेरक सोमॅटोट्रोपीन यांच्याद्वारे नवीन ऊतींचे नियमन होते. वृद्धी संप्रेरक अन्नाचा वापर वेगळ्या प्रकारे नियंत्रित करतात. ती ऊर्जेकरिता पेशींना ग्लुकोजऐवजी मेद वापरण्यासाठी उद्दीपित करतात आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली ठेवतात. ग्लुकोजची अशी पातळी मेंदूचे कार्य नीट चालण्यासाठी आवश्यक असते.
वाढ आणि लिंग संप्रेरके : अर्भक ते प्रौढ अशी वाढ होताना मनुष्याच्या शरीरात अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडतात, तसेच शारीरिक बदल होतात. यांत वृद्धी संप्रेरके महत्त्वाची भूमिका बजावतात. बालवयातील वाढीचे नियमन वृद्धी संप्रेरके करतात. परंतु, बालवयातील संप्रेरकांची निर्मिती सदोष असल्यास ती अर्भके खुजी राहतात किंवा खूप उंच वाढतात. प्रौढ वयात वृद्धी संप्रेरके ऊतींचे आकार व त्यांची संरचना योग्य प्रमाणात राखतात. इन्शुलीन, ग्लुकोकॉर्टिकॉइडे आणि थायरॉक्सिन ही संप्रेरकेदेखील ऊतींची वाढ आणि निगा यांत महत्त्वाची भूमिका निभावतात.
पौगंडावस्थेत म्हणजेच ११ ते १५ वयाच्या कालावधीत मुलांमुलींची वाढ आणि शारीरिक बदल वेगाने होतात. पौगंडावस्थेत मुलामुलींच्यात घडणारे बदल संप्रेरकांमुळे नियंत्रित होतात. पौगंडावस्थेच्या प्रारंभी पीयूषिका ग्रंथीजवळ असलेल्या अध:श्चेतक (अधोथॅलॅमस) या मेंदूच्या भागाद्वारे, मोठ्या प्रमाणात गोनॅडोट्रोपीन-स्रावी संप्रेरक स्रवते. या संप्रेरकाची क्रिया पीयूषिका ग्रंथीवर होते. त्यामुळे पीयूषिका ग्रंथी उत्तेजित होऊन पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, एफएसएच) आणि पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हॉर्मोन, एलएच) ही गोनॅडोट्रॉपिक संप्रेरके स्रवतात. ही संप्रेरके जनन ग्रंथींवर (पुरुषांमध्ये वृषणे आणि स्त्रियांमध्ये अंडाशय) प्रभाव टाकतात. एफएसएच आणि एलएच यांच्या प्रभावामुळे मुलामुलींच्या जनन ग्रंथीची वाढ होते आणि ती मोठ्या प्रमाणात लिंग संप्रेरके स्रवू लागतात. मुलांमध्ये अँड्रोजेन म्हणजेच टेस्टोस्टेरोन व अँड्रोस्टेरोन तर मुलींमध्ये इस्ट्रोजेने (स्त्रीमदजने) व प्रोजेस्टेरोन (प्रगर्भरक्षक) ही संप्रेरके तयार होतात. या संप्रेरकांवर अवटू, पीयूषिका, अंडाशय आणि वृषण इ. ग्रंथींचे नियमन असते. मुलांमध्ये वृषणातील लायडिख पेशी टेस्टोस्टेरोन निर्माण करतात, तसेच शुक्रजनक पेशीतून शुक्रपेशी तयार होतात. त्यामुळे मुलांमध्ये वृषणाची व शिश्नाची वाढ होते, त्यांची उंची वाढते, आवाज घोगरा होतो, मिसरूड फुटून दाढी येते, अंगावरची लव वाढून केस राठ होतात आणि काखेत, जांघेत, जननेंद्रियांजवळच्या भागात, छातीवर व क्वचित पाठीवर केस उगवतात. मुलींमध्ये इस्ट्रोजेने संप्रेरकांमुळे वयाच्या १०–११ व्या वर्षापासून अंडाशय व गर्भाशय वाढून अंड पक्व होते, बाह्यजननेंद्रियातून पांढरा स्राव येऊ लागतो आणि मासिक पाळी सुरू होते, स्तनांची वाढ होते, तसेच स्तन, ओटीपोट, नितंब, मांड्या येथे चरबी साठू लागते आणि स्तनांचे व नितंबांचे आकार हळूहळू वाढतात. स्त्रियांच्या शरीरात एफएसएच, एलएच, इस्ट्रोजेने आणि प्रोजेस्टेरोन इ. संप्रेरके मिळून कार्य करतात आणि मासिक पाळी नियंत्रित ठेवतात. तसेच प्रोजेस्टेरोन हे संप्रेरक गर्भारपणातील प्रक्रियांचे नियमन करते.
रक्तसंघटन संप्रेरके : निरोगी रक्तामध्ये रासायनिक पदार्थ ठराविक पातळीत असतात. जर या पदार्थांची पातळी खूप कमी किंवा खूप जास्त झाली, तर शरीराची हानी होऊ शकते. रक्ताचे संघटन एका सामान्य स्थितीत राहावे, म्हणून अनेक संप्रेरके मिळून कार्य करतात. परावटू ग्रंथीने स्रवलेले पॅराथोर्मोन आणि अवटू ग्रंथीने स्रवलेले कॅल्सिटोनीन मिळून रक्तातील कॅल्शियमची पातळी कायम राखतात. मिनरलोकॉर्टिकॉइडे या अधिवृक्क गटाने स्रवलेल्या संप्रेरकांमुळे रक्तातील पाणी आणि क्षार यांचे संतुलन राखले जाते. त्यांपैकी ॲल्डोस्टेरोन हे संप्रेरक रक्तदाब नियमित राखण्याचे कार्य करते. अध:श्चेतकाद्वारे व्हॅसोप्रेसीन हे संप्रेरक स्रवते, परंतु ते पश्च पीयूषिकेत साठवले जाते आणि तेथून सोडले जाते. ते रक्तातील पाण्याची पातळी नियमित ठेवते.
ताण संप्रेरके : आपण रागावतो, घाबरतो किंवा जखमी होतो, अशा वेळी अधिवृक्क ग्रंथीच्या आंतरमध्यकाकडून ॲड्रिनॅलीन (एपिनेफ्रिन) आणि नॉरॲड्रिनॅलीन (नॉरएपिनेफ्रिन) ही संप्रेरके स्रवली जातात आणि शरीराला दडपण झेलण्यासाठी तयार करतात. उदा., ॲड्रिनॅलीनमुळे हृदयाची धडधड वाढते, स्नायूंकडे रक्तप्रवाह वाढतो आणि रक्तातील शर्करा वाढते. ग्लुकोकॉर्टिकॉइडे गटातील संप्रेरकेदेखील तणावाला जुळवून घेण्यासाठी शरीराला मदत करतात.
अंत:स्रावी नियंत्रक संप्रेरके : ही इतर संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम करतात. पीयूषिका ग्रंथीच्या अग्र भागातून स्रवणारी एफएसएच आणि एलएच संप्रेरके यांद्वारे जनन ग्रंथीच्या स्रवण्याचे नियमन होते. अग्र पीयूषिका ग्रंथी ही अवटु-उद्दीपक संप्रेरक (थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, टीएसएच) आणि ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोपिक संप्रेरक (एसीटीएच) स्रवते. टीएसएच हे अवटू ग्रंथीला थायरॉक्सिन स्रवण्यासाठी उद्दिपित करते. एसीटीएच हे अधिवृक्क बाह्यकाला उद्दिपित करत असल्याने ग्लुकोकॉर्टिकॉइडे, मिनरलोकॉर्टिकॉइडे आणि ॲड्रिनल लिंग संप्रेरके यांचे स्रवणे वाढते.
काही बाबतीत, एका संप्रेरकाच्या प्रभावामुळे दुसरी वेगळी ग्रंथी स्रवते. अशा संप्रेरकांना ‘स्रावी संप्रेरके’ म्हणतात. जसे अध:श्चेतकाद्वारे स्रवलेल्या संप्रेरकांमुळे अग्र पीयूषिकेच्या कार्याचे नियमन होते. गोनॅडोट्रोपीन-स्रावी संप्रेरकामुळे एफएसएच आणि एलएच स्रवतात. इतर स्रावी संप्रेरके पीयूषिकेला उद्दीपीत करून एसीटीएच, टीएसएच आणि वृद्धी संप्रेरक यांच्या निर्मितीला मदत करतात. अग्र पीयूषिकेचे प्रोलॅक्टिन हे संप्रेरकही अध:श्चेतकाद्वारे नियमित होते. स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूध स्रवायला प्रोलॅक्टिन मदत करते.
अध:श्चेतक या मेंदूच्या भागाचे एक महत्त्वाचे कार्य चेतासंस्था आणि अंत:स्रावी संस्था यांना जोडणे, हे आहे. शरीराची ज्ञानेंद्रिये पर्यावरणातील बदलांची माहिती गोळा करतात आणि चेतासंस्थेमार्फत मेंदूकडे नेतात. तसेच शरीरातील आंतरिक पर्यावरणाची माहिती मेंदूकडे येते. ही माहिती मेंदू अध:श्चेतकाकडे पोहोचवतो, संप्रेरकांची गरज असल्यास अध:श्चेतकाकडून एखादी कळ दाबल्याप्रमाणे स्रावी संप्रेरके स्रवली जातात आणि त्यांच्याद्वारे पीयूषिका ग्रंथी उद्दीपित होते. परिणामी पीयूषिकेकडून आवश्यक ते संप्रेरक स्रवण्याचे कार्य सुरू होते.
मनुष्याच्या शरीरातील महत्त्वाच्या संप्रेरकांमध्ये ऑक्सिटोसीन आणि रिलॅक्सिन यांचाही समावेश होतो. या संप्रेरकांचा प्रभाव प्रसूतीच्या वेळी आवश्यक असतो. ऑक्सिटोसीन हे अध:श्चेतकाद्वारे निर्माण होते आणि पश्च पीयूषिकेत साठवले आणि स्रवले जाते. अंडाशय रिलॅक्सिन निर्माण करते. त्यामुळे जनन मार्ग शिथिल होऊन रुंदावतो. प्रसूतीच्या वेळी ऑक्सिटोसीनमुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचित होतात. या दोन्ही संप्रेरकांच्या प्रभावामुळे आकुंचन-शिथिलीकरण झाल्याने प्रसूती घडून येते. तसेच स्तनपानासाठी अर्भक जेव्हा मातेला बिलगते तेव्हा ऑक्सिटोसीनमुळे मातेला पान्हा फुटतो.
संप्रेरक पश्चप्रदाय यंत्रणा : संप्रेरके पेशींतील अनेक क्रियांचे नियंत्रण करतात. बहुसंख्य संप्रेरकांचे स्रवणे पश्चप्रदाय यंत्रणेने (फिडबॅक मेकॅनिझम) नियंत्रित होते. यात एखाद्या प्रणालीतून मिळालेल्या प्रदायातील (आउटपुट) काही भाग आदायाच्या (इनपुट) ठिकाणी जाऊन त्यावर परिणाम करतो आणि त्यामुळे प्रदायाची पातळी कमी-अधिक होते. जर या यंत्रणेने प्रदायाची पातळी कमी झाली तर तो ऋण पश्चप्रदाय, वाढली तर तो धन पश्चप्रदाय. अवटू ग्रंथीचे नियमन हे ऋण प्रदायाचे चांगले उदाहरण आहे. अध:श्चेतकातून टीआरएच (थायरोट्रोपीन रिलीजिंग हॉर्मोन) स्रवते, ते पीयूषिकेकडे जाऊन तिला टीएसएच स्रवण्यास उद्दीपित करते. परिणामी अवटू संप्रेरके स्रवली जातात व रक्तात मिसळतात. अवटू संप्रेरकांची रक्तातील पातळी वाढली की अध:श्चेतकातून टीआरएच स्रवणे आणि त्यामुळे अंतत: अवटू संप्रेरके स्रवणे थांबते. याउलट स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूध स्रवण्याच्या क्रियेत धन पश्चप्रदाय असतो. पीयूषिकेतून स्रवणारे प्रोलॅक्टिन स्तनग्रंथींना दूध स्रवण्यास उद्दीपित करते. मूल स्तनपान करत असताना स्त्रीच्या स्तनग्रंथींकडून जे चेतासंदेश मेंदूकडे जातात त्यांच्यामुळे पीयूषिका उद्दीपित होऊन अधिक प्रोलॅक्टिन आणि त्याच्या परिणामी अधिक दूध स्रवले जाते. धन पश्चप्रदायाचे दुसरे उदाहरण पश्च पीयूषिकेतून स्रवणाऱ्या ऑक्सिटोसीन या संप्रेरकाबाबत आढळते. प्रसूती होत असताना गर्भाशयाचे आकुंचन ऑक्सिटोसिनच्या नियंत्रणाखाली होते. जोपर्यंत अपरा बाहेर येऊन प्रसूती पूर्ण होत नाही तोपर्यंत पीयूषिकेतून ऑक्सिटोसीन स्रवणे चालूच राहते.
इतर प्राण्यांमधील संप्रेरके : इतर पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये, खासकरून सस्तन प्राण्यांमध्ये, मनुष्यात जी संप्रेरके असतात तीच संप्रेरके असतात. अनेक संप्रेरकांची संरचना आणि प्रभाव मानवी संप्रेरकांसारखाच असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरात संप्रेरके पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत, अशा व्यक्तींवर उपचार करताना डॉक्टर काही वेळा प्राण्यांद्वारे स्रवलेली संप्रेरके वापरतात.
अपृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरातील काही संप्रेरके वाढ आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. जसे, मधमाशा आणि फुलपाखरे यांच्यात वाढ होत असताना होणाऱ्या बदलांवर, तसेच कीटकांतील कात टाकण्याच्या क्रियेवर विशिष्ट संप्रेरकांचे नियंत्रण असते.
वनस्पती संप्रेरके
वनस्पतींमध्ये मुळे, खोडे यांसारख्या वाढणाऱ्या ऊतींच्या टोकांला संप्रेरके निर्माण होतात. या संप्रेरकांमुळे वनस्पतींची वाढ प्रभावित होते, म्हणून त्यांना ‘वृद्धी नियामक’ म्हणतात. त्यांचे तीन प्रकार आहेत; (१) ऑक्सिन, (२) सायटोकायनीन आणि (३) जिबरलीन.
(१) ऑक्सिन : वनस्पतींच्या विविध भागांवर ऑक्सिनचे परिणाम होतात. विशेषकरून मुळे, खोड यांच्या पेशींची वाढ ऑक्सिनमुळे होते. ते प्रथम त्यांची लांबी वाढू देते आणि वाढ झाल्यानंतर ती मर्यादित करते. ते खोडांना गुरुत्वाकर्षणापासून दूर म्हणजे जमिनीच्या वरील बाजूस आणि सूर्यप्रकाशाकडे वळवण्यासाठी उद्युक्त करते. अनेक वनस्पतींमध्ये फांदीच्या टोकाला असलेली कळी ऑक्सिन स्रवते. त्यामुळे तिच्याखाली वाढणाऱ्या कळीची वाढ खुंटते आणि कडेच्या फांद्यांचा वाढण्याचा वेग मंदावतो. यातून वाचलेली ऊर्जा वनस्पती उंच व मजबूत होण्यासाठी वापरतात. फळांच्या वाढीसाठी तसेच पाने, फळे पिकण्यापूर्वी खाली पडू नयेत यासाठी ऑक्सिन कार्य करते.
(२) सायटोकायनीन : हे संप्रेरक वनस्पतीतील पेशीविभाजनावर नियंत्रण ठेवते. ऑक्सिनबरोबर ते मिळून कार्य करते आणि वनस्पतीची वाढ नियमित ठेवते. वनस्पतीच्या कोणत्या पेशीपासून मूळ, खोड किंवा पान तयार होईल, हे निश्चित करण्यासाठी सायटोकायनीन आवश्यक असते.
(३) जिबरलीन : वनस्पती उंच व मोठी होण्यासाठी जिबरलीन आवश्यक असते. खुजा वनस्पतींच्या खोडावर जिबरलिनचा वापर केल्यानंतर त्या उंच व मोठ्या वाढल्याचे आढळून आले आहे. काही वनस्पतींमध्ये ते फुलांच्या उमलण्याची प्रक्रिया नियमित ठेवते. सुप्तावस्थेतील बियांवर, कळ्यांवर जिबरलिनची फवारणी केल्यास बिया रुजतात, तसेच कळ्या उमलतात.
यांशिवाय ॲब्सिसिक आम्ल वनस्पतीची वाढ रोखते आणि सुप्तावस्थेला चालना देते, तर इथिलीन फळे पिकण्याची प्रक्रिया लवकर घडवून आणते.
संप्रेरकांचे उपयोग : वैद्यकक्षेत्रात ज्या रुग्णांमध्ये संप्रेरकांची कमतरता आहे अशा रुग्णांवर डॉक्टर संप्रेरकांचा वापर करतात. संप्रेरक चिकित्सेमुळे आजाराच्या लक्षणांवर मात करणे सहज शक्य झाले आहे. संप्रेरक चिकित्सा आजार पूर्णत: बरा करीत नाही, परंतु त्यामुळे आजार अंशत: नियंत्रित राहतो. उदा., मधुमेह, अवटुन्यूनता, त्वचाजाड्य (मिक्सेडेमा) इ. आजारांवर संप्रेरक चिकित्सेचा वापर करतात. तर काही परिस्थितीत आजार थेट संप्रेरक अभावाशी संबंधित नसतात, परंतु तेथे सुद्धा संप्रेरकांचा वापर करतात. उदा., संधिवात, दमा यांसारख्या आजारांवर कॉर्टिसोन संप्रेरकाची औषधे देतात. काही वेळा शरीराच्या कार्यांत बदल करण्यासाठीही संप्रेरके देतात. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन ही स्त्रीजन्य संप्रेरके असतात. या गोळ्यांमुळे स्त्रीचा अंत:स्रावी समतोल बदलतो, त्यामुळे तिची मासिक पाळी नियंत्रित होते आणि गर्भधारणा टाळली जाते.
कृषिक्षेत्रात धान्याच्या उत्पादनाशी संबंधित विविध बाबींसाठी शेतकरी ऑक्सिन हे संप्रेरक संश्लेषित स्वरूपात वापरतात. काकडी, टोमॅटो, पपई यांच्या बिया ऑक्सिन संप्रेरकाने प्रभावित केल्या की बीरहित (सीड्लेस) फळे मिळतात. सफरचंदांची फळे झाडावरून अकाली पडू नयेत म्हणून ऑक्सिन फवारतात. यांशिवाय शेतात वाढलेल्या तणावर ऑक्सिन फवारल्यास त्यांची पाने इतकी मोठी वाढतात की, त्या तणाला खाद्य न मिळाल्याने ते सुकून मरते. जनावरांच्या वाढीकरिता संप्रेरके वापरतात. इस्ट्रोजेन या संप्रेरकाचा वापर केल्यास जनावरे धष्टपुष्ट होतात. मात्र काही देशांत यावर बंदी घातली गेली आहे. गायीच्या दूधाचे प्रमाण वाढवण्यासाठी बोव्हिन सोमॅटोट्रोपीन (बीएसटी) हे कृत्रिमरित्या संश्लेषित केलेले संप्रेरक वापरतात.