(ॲपल). एक फळ वनस्पती. सफरचंद ही वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॅलस प्युमिला आहे. गुलाब, रासबेरी, स्ट्रॉबेरी इ. वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. सफरचंद या वनस्पतीचे मूळस्थान पूर्व यूरोप आणि मध्य आशिया येथील असून ती मॅलस सिल्व्हेस्ट्रिस स या वन्य जातीपासून उत्पन्न झालेली आहे. सफरचंदाची मॅलस सिल्व्हेस्ट्रिस ही जाती मध्य आशियात अजूनही वन्य स्थितीत आढळते. फळांसाठी जगात अनेक ठिकाणी मॅलस प्युमिला या जातीची लागवड केली जाते. तिचे आतापर्यंत सु. ७,५०० पेक्षा जास्त बागायती प्रकार विकसित केले गेले आहेत.
सफरचंद हा पानझडी वृक्ष लागवडीखाली साधारणत: २–५ मी. उंच वाढतो. मात्र वन्य स्थितीत तो सु. १२ मी. उंच वाढू शकतो. पाने साधी, दंतुर, गडद हिरवी, एकाआड एक, ४–१० सेंमी. लांब, सवृंत असून पानांच्या खालच्या पृष्ठभागावर किंचीत लव असते. कोवळी पाने संपूर्ण लवदार असतात. ती दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती टोकदार असतात. फुले मोठी, पांढरी किंवा फिकट गुलाबी, आकर्षक आणि पानांबरोबरच ५-६ च्या फुलोऱ्यात (वल्लरी पुष्पबंधात) येतात. फुलोऱ्यात ४–६ फुले असून मधले फूल सर्वांत आधी उमलते. फुलात निदलपुंज आणि दलपुंज प्रत्येकी पाच असतात. फुलांत पुंकेसर सु. २० असून ती निदलपुंजाला चिकटलेली असतात. जायांग अध:स्थ, ३–५ संयुक्त दलांचे असून पुष्पाधाराने वेढलेले असते. फळ आभासी, गोलसर आणि रंगाने पिवळसर, लाल किंवा गडद तांबडे असते. तसेच ते वरून मध्यभागी किंचित खोलगट आणि खालून काहीसे चपटे असते. सामान्यपणे सफरचंदाचा गर म्हणून खाल्ला जातो तो भाग म्हणजे वाढलेले पुष्पासन असते. मूळ फळ या वाढलेल्या पुष्पासनाच्या आत असते व त्यात सु. १० बिया असतात. म्हणून सफरचंद हे एक आभासी फळ आहे, असे मानतात. गर चवीला गोड व कुरकुरीत असतो.
सफरचंदाच्या बहुतेक वृक्षांमध्ये दोन वेगळ्या परंतु एकाच झाडावरच्या फुलांमध्ये परागण झाले तरी फळनिर्मिती होत नाही. त्यासाठी त्यांच्यात परपरागण घडवून आणावे लागते. परपरागणासाठी फुलांच्या मोसमात परागकण वाहक म्हणून मधमाशीचा वापर करतात. तसेच पुरेसे परागकण उपलब्ध होण्यासाठी क्रॅब ॲपल नावाच्या सफरचंदाच्या वन्य जातींची लागवड सफरचंदाच्या बागांमध्ये करतात.
सफरचंदाच्या १०० ग्रॅ. फळामध्ये पाणी सु. ८५%, कर्बोदके १३% इ. घटक अधिक प्रमाणात असतात. याखेरीज क जीवनसत्त्व आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे असतात. सफरचंदाच्या मुळाची साल कृमिनाशक, संमोहक आणि थंडावा देणारी आहे. त्याचे लाकूड कठीण व मजबूत असते. त्यापासून हत्यारांचे दांडे, नळ्या, छड्या, हातोड्याची डोकी बनवितात. पिकलेल्या फळांपासून रस, वाइन, सायडर, शिर्का, ब्रँडी तयार करतात. अतिसार, स्कर्व्ही इ. आजारांवर सफरचंदे उपयुक्त समजली जातात. सफरचंदाची फळे अधिक काळ टिकतात. सुक्या फळांचा उपयोग बेकरी उद्योगात करतात. सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइड संयुगे असतात.