समुद्रपुष्प : (१) युर्टिसिना कोलंबियाना, (२) मेट्रिडियम फार्सीमेन.

(सी अनिमोन). सागरी परभक्षी प्राण्यांचा एक गट. ॲक्टिनियारिया गणातील आंतरगुही संघातील प्राण्यांना सामान्यपणे समुद्रपुष्प म्हणतात. या प्राण्यांचे रंग अनिमोन प्रजातीतील फुलांसारखे आकर्षक असल्याने त्यांना ‘सी अनिमोन’ असे इंग्लिश नाव पडले आहे. प्रवाळ, जेलिफिश, जलव्याल इ. प्राण्यांशी ते जवळ आहेत. परंतु त्यांच्या जीवनचक्रात जेलिफिशमध्ये असते तशी छत्रिक (मेडुसा) अवस्था नसते. समुद्रपुष्पे सर्व समुद्रात आढळतात; मोठ्या आकाराची समुद्रपुष्पे सामान्यपणे उष्ण समुद्रात आढळतात. बहुधा ती एकेकटी राहतात, तर काहींच्या वसाहती असतात. समुद्रपुष्पांच्या शरीराचा व्यास १–५ सेंमी. आणि लांबी १.५–१० सेंमी. असते. त्यांच्या आकारमानात विविधता आढळते. काही समुद्रपुष्पे खूप मोठी असतात. जसे यूर्टिसिना कोलंबियानास्टायकोडॅक्टायला मेर्टेन्सी या जातींचा व्यास सु. १ मी. पेक्षा जास्त असतो, तर मेट्रिडियम फार्सीमेन ही जाती सु. १ मी. पेक्षा लांब असते.

समुद्रपुष्पाचे शरीर सामान्यपणे दंडगोलाकार असते. त्याच्या वरच्या बाजूला रुंद, पसरट बिंब (तबकडी) असते आणि या तबकडीच्या मध्यभागी मुखद्वार (तोंड) असते. तोंडाभोवती अनेक शुंडके (स्पर्शके) असतात आणि त्यांवर दंशपेशी असतात. शुंडके फुलांच्या पाकळ्यांसारखी असतात; ती आत वळलेली असतात किंवा भक्ष्य पकडण्यासाठी विस्फारलेली असतात. तोंडाखाली शरीर सपाट व मऊ असते. समुद्रपुष्पाच्या काही जातींमध्ये तबकडीखालचा भाग आकुंचित झालेला असतो, त्याला मुंडक म्हणतात. तोंडापासून आखूड नलिकाकार अन्ननलिका (ग्रासिका) शरीरपोकळीत जाते. तोंडाच्या खालील अन्ननलिकेच्या भागाला ग्रसनी म्हणतात. अन्ननलिका देहभित्तीला अरीय पडद्यांनी जुळलेली असते. या पडद्यांमुळे देहगुहा अनेक कोशांत विभागलेली असते. जेव्हा हा प्राणी आकुंचित होतो तेव्हा तबकडी, शुंडके आणि मुंडक ग्रसनीच्या भागात दुमडली जातात आणि मजबूत समाकुंचनी स्नायूंद्वारे धरून ठेवली जातात. या जागी देहभित्तीला घडी पडत असून तिच्याद्वारे समुद्रपुष्प आकुंचन पावल्यावर त्याचे रक्षण होते. अन्ननलिकेच्या विरुद्ध बाजूंना मुखाच्या कोपऱ्यात दोन खाचा असतात, त्यांना सायफोनोग्लिफ म्हणतात. या खाचा नेहमी उघड्या असतात; यातून पाण्याचा प्रवाह आत-बाहेर जात असतो आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. समुद्रपुष्पांची अन्ननलिका पूर्ण विकसित झालेली नसते. त्यांची अन्ननलिका (अन्य आंतरगुही व चपटकृमी संघातील प्राण्यांप्रमाणे) पोट व गुदद्वार असे दोन्ही कार्य करते. त्यांच्यात अन्न आत घेणे आणि अपशिष्टे बाहेर टाकण्याचे कार्य एकाच छिद्राद्वारे होते, म्हणजे गुदद्वार व तोंड एकच असते.

समुद्रपुष्पाचे बहुशुंडक (पॉलिप) एखाद्या खडकाला चिकटलेले असतात, परंतु त्यांच्या काही जाती वाळूत किंवा चिखलात पडून राहतात आणि काही पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तरंगतात. एका ठिकाणी ते काही आठवडे किंवा काही महिने राहू शकतात. त्यांच्या तळाला चिकटून ते सरपटू शकतात; मात्र त्यांची हालचाल एवढी हळू असते की डोळ्यांना सहसा जाणवत नाही. काही वेळा ते आधारापासून सुटतात आणि नवीन जागी जाऊन स्थिरावतात. त्यांच्या काही जाती उड्या मारत, पुढे सरकतात आणि पोहू शकतात. पोहताना ते शुंडकांची हालचाल वेगाने करतात. काही जाती गोलाकार होऊन प्रवाहाबरोबर तरंगत किंवा वाहत जातात. समुद्रपुष्पांच्या शरीरात उभ्या, आडव्या व तिरक्या स्नायूंच्या पट्ट्या असल्याने ते आकारात बदल करू शकतात; ते शरीर वळवू शकतात किंवा वाकवू शकतात.

समुद्रपुष्पे परभक्षी व मांसाहारी असतात. त्यांच्या हालचालींवर मर्यादा असल्याने त्यांच्या शुंडकांवर पडणाऱ्या अन्नावर ते अवलंबून असतात. दंशपेशीला स्पर्श झाल्यास दंशपेशी फुटतात आणि त्यातून लहान सुईसारख्या पोकळ नलिका वेगाने बाहेर पडून भक्ष्याच्या शरीरात घुसतात. त्यांद्वारे दंशपेशींच्या पुटिकेत असलेली विषारी संयुगे भक्ष्याच्या शरीरात टोचली जातात. या विषामुळे भक्ष्याच्या चेतासंस्थेवर परिणाम झाल्याने त्याची हालचाल थांबते. अशा भक्ष्याला समुद्रपुष्पे आपल्या तोंडाकडे ओढतात आणि शुंडकांनी पकडून अन्ननलिकेत ढकलतात. पकडलेले भक्ष्य गिळण्यासाठी ते तोंड रुंदावतात. खेकडे, मृदुकाय व लहान मासे ते गिळून टाकतात, न पचलेले अन्न ते मुखावाटे बाहेर टाकतात. ते भरपूर अन्न खातात आणि झटपट आकाराने मोठे वाढतात. उपासमार झाल्यास ते आक्रसत जातात, परंतु त्यांचे स्वरूप बदलत नाही.

समुद्रपुष्पांचे पुनरुद्भवन लैंगिक तसेच अलैंगिक पद्धतीने होते. लैंगिक पद्धतीत भिन्न प्राण्यांकडून शुक्रपेशी व अंडपेशी निर्माण केले जातात आणि ती तोंडावाटे बाहेर सोडली जातात. अंडपेशीचे फलन शरीराच्या आत किंवा पाण्यात होते. फलित अंडपेशीपासून प्लॅन्यूला डिंभ निर्माण होतात, आधाराला चिकटेपर्यंत ते वाहत जातात आणि त्यांच्यात रूपांतरण होऊन लहान समुद्रपुष्प तयार होतात. अलैंगिक प्रजनन आश्चर्यकारक असते आणि ते मुकुलन, खंडीभवन किंवा द्विखंडन अशा प्रकारे घडून येते. अँथोप्लुरा प्रजातीतील समुद्रपुष्पे विभागली जातात आणि त्यांपासून सारखेच रंग, खुणा असलेले समद्रपुष्पांचे गट तयार होतात. अँथोप्लुरा स्टेल्युला आणि गोनॅक्टिनिया प्रॉलिफेरा या जाती आडव्या विभागल्या जातात; विभाजनापूर्वी त्यांच्या शरीराच्या मध्यावर अर्धवट विकसित शुंडके दिसून येतात. काही जातींमध्ये खंडीभवन घडते. या प्रक्रियेत त्यांच्या तळाकडील काही भाग वेगळा होतो, त्याचे खंडीभवन होऊन नवीन कृंतक पिढी जन्माला येते.

अनेक समुद्रपुष्पे आणि ठराविक एकपेशीय शैवालांच्या जाती यांच्यात साहचर्य आढळते. अशा शैवालांच्या काही जाती समुद्रपुष्पांची शुंडके व मुखबिंब येथे वाढतात. समुद्रपुष्पांना या शैवालांनी प्रकाशसंश्लेषण क्रियेत तयार झालेला ऑक्सिजन तसेच ग्लिसरॉल, ग्लुकोज, ॲलॅनीन इ. उत्पादिते मिळतात; शैवालांना समुद्रपुष्पांपासून पुरेसा सूर्यप्रकाश आणि सूक्ष्मभक्षकांपासून संरक्षण मिळते.