धर्म, मानवशास्त्र, मानसशास्त्र आणि वाङ्‌मयाचा अभ्यास यांत वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण संज्ञा. मूळ ‘अँथ्रोपॉमॉर्फिझम’ ह्या ग्रीक संज्ञेसाठी ‘मानवारोपवाद’ ही मराठी संज्ञा. मूळ ग्रीक शब्द ‘अँथ्रोपॉस’ म्हणजे मानव आणि ‘मॉर्फी’ म्हणजे रूप किंवा आकार, यांवरून ही संज्ञा तयार झाली असून तिचा अर्थ मानवाचा किंवा मानवरूपाचा मानवेतरांवर आरोप करणे. मानवी आकार, गुणदोष, भावभावना, विचार, इच्छा, संकल्प, बुद्धिमत्ता आदींचा मानवेतर व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा निसर्गातील घटनांवर आरोप करणे असा तिचा व्यापक अर्थ होतो. बहुतेक धर्मांमध्ये (विशेषतः ईश्वरविद्या व पुराणकथा यांत) ईश्वर ह्या तत्त्वावर हा मानवी गुणांचा वा आकारांचा आरोप अतिशयोक्तीने केलेला असतो.

विविध जलचरांच्या माध्यमातून साकारलेले कल्पित मानवी रूप

ग्रीक-रोमन, ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम तसेच भारतातील वैदिक, हिंदू, बौद्ध, जैनादी धर्मांतील देवदेवतांना मानवी आत्म्याचे गुण वा शक्ती अमर्याद स्वरूपात असल्याची तसेच मानवाप्रमाणेच त्यांचे वर्तन असल्याची वर्णने आढळतात. उदा., युद्ध, प्रेम, राग, वैर, करुणादी भावनांनी त्यांचे वर्तन प्रेरित झाल्याचे दिसते. अनेकदा त्यांच्या वर्तनात मानवी इच्छा व आवडीनिवडींचेही प्रतिबिंब पडलेले दिसते. उदा., ग्रीक देवता डीमीटर (अनेकदा ती परिचारिकेच्या रूपातही दाखविली आहे) ही निसर्गातील विविध ऋतू तसेच खाण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याच्या पिकांची वाढ यांच्याशी संबंधित देवता मानली आहे.

बायबलमधील ‘जुन्या करारा’तही ईश्वर हा मानवी गुणयुक्त असल्याचे अनेक निर्देश आढळतात. ईश्वराचा हात व आवाज यांचे अनेक उल्लेख तेथे आहेत.

वेदांतील इंद्र, वरुण, सविता इ. देवता ह्या केवळ निसर्गातील विलक्षण व अलौकिक शक्तीच नव्हेत, तर त्यांच्या ठायी मानवी गुणांचा आरोपही केला आहे. इंद्र हा पराक्रमी वीर राजा, तर वरुण व सविता कायदे करणारे व न्यायान्यायाचा निवाडा करणारे अधिपती होत. कला, कवित्व, ज्ञान, दया, करुणा, उपकार, कृपा, संतोष, शौर्य, प्रीती, द्वेष, लोभ, मोह इ. मानवी गुणच त्यांच्या ठायी पराकाष्ठेने वसत आहेत. राम, कृष्ण, शिव, गणेश, मारुती, विष्णू इ. हिंदू देवतांचे स्वरूपही असेच आहे. या देवतांच्या ठिकाणी अतिशय उदात्त मानवी गुण तसेच मानवाचे दोषही आहेत. मत्सर, लोभ, लहरीपणा, द्वेष, स्तुतिप्रियता इ. दोष त्यांच्या ठायी आहेत. बौद्ध व जैन धर्मांतही मानवी रूपगुणयुक्त काही देवता उदा., महायान बौद्धांमध्ये बोधिसत्त्वाची विविध रूपे–मंजुश्री, मैत्रेय, अवलोकितेश्वर इ.–तसेच जैन धर्मातही शासनदेवता चक्रेश्वरी, अंबिका, पद्मावती, ज्वालामालिनी इ. तसेच विद्यादेवता सरस्वती तसेच श्री, ऱ्ही, बुद्धी, धृती, लक्ष्मी इ. देवता मानवी रूपगुणयुक्त मानल्या आहेत. ‘माणसापेक्षा अतिशय श्रेष्ठ आणि विश्वातील सर्व शक्तींपेक्षा अधिक शक्तिमान असा माणूस (परम पुरुष) तो (ईश्वर) आहे अशी श्रद्धा सर्व प्रथित धर्मांच्या मुळाशी आहे’ तसेच ‘स्थिर राष्ट्र व स्थिर समाज या रूपाने अस्तित्वात आलेल्या मानव संघांनी मानुषदेहधारी व मानवगुणयुक्त देव जन्माला घातले’, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे.

मानवी रूपगुणांचे आरोपण जेव्हा मानवाहून खालच्या प्राणिवर्गावर किंवा जड वस्तूंवर, निसर्गावर, घटनांवर केले जाते, त्यांतही मानवारोपवादाचेच प्रतिबिंब पडलेले दिसते. उदा., ‘सिंहाचा पराक्रम’, ‘भित्रा ससा’, ‘लबाड कोल्हा’, ‘पराक्रमी गरुड’ ‘गाणारा कोकीळ’, किंवा ‘वादळाचा क्रोध’, ‘धरतीची माया’, ‘पावसाची कृपा’ इत्यादी.

धार्मिक विचाराच्या इतिहासात देव किंवा देवतांच्या वर्णनात मानवारोपयुक्त जे निर्देश येतात, त्यांबाबतचे विवरण करताना अभ्यासकांत विविध प्रवृत्ती दिसून येतात. धार्मिक मानवारोपवादाबद्दलचा सर्वांत प्राचीन व स्पष्ट असा धर्ममीमांसात्मक निर्देश झीनॉफनीझ (इ.स.पू. सहावे शतक) याच्या विचारांत आढळतो. त्याच्या मते इथिओपियन आणि थ्रेसियन लोकांनी त्यांच्या दैवतसमूहातील देवता त्यांच्या स्वतःच्या प्रादेशिक वैशिष्ट्यांनुरूप म्हणजे अनुक्रमे ‘काळ्या कातडी’च्या आणि ‘निळ्या डोळ्यां’च्या कल्पिल्या. त्याने या संदर्भात कडवटपणे असेही म्हटले आहे की, प्राण्यांची जर ईश्वरावर श्रद्धा असती, तर त्यांनी कल्पिलेल्या देवताही त्यांच्या प्रमाणेच प्राणिरूपधारीच असत्या. ईजिप्ती देवता प्राणिरूप असून त्यांना ‘पशुदेवतावाद’ (Theriomorphism) ही संज्ञा आहे. झीनॉफनीझने असेही म्हटले आहे की, होमर आणि हीसिअडने देवतांना लज्जास्पद आणि अशोभनीय अशा प्रकारच्या मानवी वर्तनांतील दोष–उदा., चौर्यकर्म, व्यभिचार, लबाडी, कपटीपणा इ.–चिकटविले ते योग्य नाही. होमरने लोकप्रिय केलेला ग्रीक पुराणकथांतील अज्ञानमूलक मानवारोपवाद प्लेटोनेही नाकारला असून झीनॉफनीझप्रमाणेच ईश्वर एकच असून तो मानवी आकलनशक्तीच्या पलीकडे आहे असे म्हटले आहे. प्लेटोने मानवारोपाधिष्ठित पुराणकथांतील बोधवादी मूलांचे समर्थन केले आहे; पण त्याला फक्त त्यात ईश्वराला मानवातील सर्वोच्च सद्‌गुण प्रदान करणेच मान्य आहे; मानवातील अत्यंत हीन प्रकारचे दुर्गुण ईश्वरास प्रदान करणे मान्य नाही.

त्या काळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या एकूण मानवारोपवादावर हिब्रू प्रेषितांनी (उदा., ॲमोस, ईसाइआ) टीका केली असली, तरी त्यांनी तो सर्वस्वी त्याज्य मात्र मानला नाही. त्यांनी उत्कृष्ट मानवारोपवादी प्रतीकांचा वापर आपल्या ईश्वरी संकल्पनेत केला आहे. हिब्रू धर्म-साहित्यातील मानवारोपवादी निर्देश अनेक ठिकाणी वाच्यार्थाने, तर काही ठिकाणी काव्यमय रूपकाच्या आश्रयाने वा लक्षणार्थाने उपयोजिले आहेत, असे धर्ममीमांसकांचे मत आहे. उदा., ‘एक्सोडस’मधील (४३·११) ‘ईश्वर मोझेसशी समोर उभा राहून, जसा माणूस त्याच्या मित्राशी बोलतो तसा, बोलत असे’ किंवा ‘साम’मधील (१३·१) ‘हाउ लाँग विल्ट दाउ हाइड दाय फेस फ्रॉम मी?’

काही धर्ममीमांसकांच्या मते ईश्वरवादातून मानवारोपवादाच्या सर्वच निर्देशांचे उच्चाटण करणे शक्य आहे; तर काहींच्या मते ईश्वरवादासाठी मानवारोपवाद काही प्रमाणात केवळ अपरिहार्यच नव्हे, तर ईश्वरविषयक ज्ञानासाठी व भाषेसाठी त्यांची नितांत आवश्यकताही आहे. एकूण मानवी ज्ञान व भाषा ह्या आवश्यकतेने मानवाच्या स्वतःच्या अनुभवानेच अभिसंहित वा मर्यादित झालेल्या आहेत आणि हे जर खरे असेल, तर मानवाचे मानवेतर अस्तित्वाचे वा सत्तेचे (Being) वर्णन करताना आपल्या अनुभवातील साम्यानुमाने वापरणे अटळच आहे.

मानवी विचारातील मानवारोपवादाच्या ह्या वरवर जाणवणाऱ्या अपरिहार्यतेवरून असा निष्कर्ष काही मीमांसकांनी काढला आहे की, ईश्वरवाद हाच मुळात भ्रामक व तर्कशून्य आहे. ईश्वराची कल्पना ही मानवी आत्म्याचेच भ्रामक प्रक्षेपण आहे, असा विचार लूटव्हिख फॉइरबाख यांनी मांडला आहे. अन्य काही मीमांसकांच्या मते ईश्वराबाबतच्या भाषेत मानवारोपवाद येणे अटळच आहे. त्यांचा युक्तिवाद असा की, आपला ईश्वरविषयक विचार आणि भाषा हे आपल्या अनुभवातील व्यक्तिगततेने युक्त असतात असे म्हणण्यात आणि ईश्वराचे वस्तुनिष्ठ अस्तित्व वा सत्ता आहे असे म्हणण्यात तसा काहीही तार्किक संबंध नाही. या संदर्भातील आणखी एक युक्तिवाद असा की, कोणत्याही प्रकारच्या मानवारोपवादाला पर्याय म्हणून एकतर अज्ञेयवाद हा किंवा ईश्वरविषयक इतका अमूर्त दृष्टिकोन स्वीकारणे की, तो ईश्वराबाबत संपूर्णपणे उदासीन वा तटस्थ (Neutral) असाच असू शकेल.

पुराणकथा, दंतकथा, चित्रपट कथाकथनामध्ये आणि कलेमध्ये साहित्यिक साधन म्हणून मानवारोपवादाची पाळेमुळे असल्याचे दिसते. बहुतेक संस्कृतींमध्ये मानववंशीय प्राण्यांसह पारंपरिक दंतकथा आहेत की, जी पात्र म्हणून मानवांप्रमाणे उभे राहू शकतात किंवा बोलू शकतात. तसेच मानवरोपवादी प्रतिमा-प्रतीकांचा काव्यातून विपुल वापर केला जातो. उदा., हसरी फुले, नुकतीच न्हालेली उषा (उषःकाल), खिन्न संध्याकाळ इत्यादी. प्राणिकथा, परीकथा, बोधकथा इ. वाङ्‌मयप्रकारांतून पशुपक्ष्यादींवरही मानवी भावभावनांचा व गुणावगुणांचा आरोप केलेला दिसून येतो. ईसापनीती, पंचतंत्र, ॲनिमल फार्म, मिकी माउस इत्यादींचा निर्देश या संदर्भात करता येईल. मेघदूत  काव्यात कालिदासाने स्वतःच्या प्रियेकडे संदेश नेणारा दूत म्हणून मेघाचीच कल्पना केली आहे. माणूस आपल्या अनुभवातूनच जगाकडे पहात असतो. ह्या त्याच्या निरीक्षणात कळत-नकळतपणे त्याची व्यक्तिगतता वा मानवारोपच प्रतिबिंबित होत असतो. मानसशास्त्रात प्राणिवर्तनातून मानवी वर्तनाचा मागोवा घेण्याची प्रवृत्ती आढळते. यातूनच प्राण्यांवरील काही प्रयोगांचे अर्थविवरण करण्याच्या समस्यांही निर्माण होतात.

संदर्भ :

  • Feuerbach, Ludwig; Trans. Evans, M. The Essence of Christianity, New York, 1957.
  • Illingworth, J. R. Personality Human and Divine, London, 1894.
  • Mitchell, R. W.; Thompson, N. S.; Miles, H. L. Anthropomorphism, Anecdotes, and Animals, New York, 1996.
  • Pringle−Pattison, A. S. The Idea of God, Oxford, 1917.