(कॉमन जिंजर लिली). एक सुगंधी वनस्पती. सोनटक्का ही वनस्पती झिंजिबरेसी कुलाच्या हेडीशियम प्रजातीतील आहे. या प्रजातीतील सर्वत्र आढळणारी आणि प्रातिनिधिक जाती म्हणजे हेडीशियम कॉरोनॅरियम. ही जाती आपल्याकडे सोनटक्का म्हणून ओळखली जाते. कर्दळ, वेलदोडा व हळद या वनस्पतीही झिंजिबरेसी कुलातील आहेत. सोनटक्क्याचे मूलस्थान भारताच्या पूर्व हिमालयीन भागातील असून तिचा प्रसार म्यानमार, थायलंड, दक्षिण चीनपासून पूर्वेकडे तैवानपर्यंत आहे. जगातील उष्ण तसेच समशीतोष्ण देशांत आता तिचे देशीयभवन झाले असून तिची लागवड सुगंधी तेलासाठी आणि शोभेसाठी केली जाते. हेडीशियम प्रजातीच्या एकूण सु. ६५ जाती निश्चित ओळखल्या गेल्या आहेत. त्यांपैकी बहुतेक जाती भारतात आढळतात.
सोनटक्का या बहुवर्षायू वनस्पतीचे जमिनीतील खोड म्हणजेच मूलक्षोड मांसल व जाडजूड असते आणि जमिनीखाली ते पसरत वाढते. त्याला जमिनीत फांद्या व मुळे फुटलेली असतात. जमिनीवर त्याला कर्दळीप्रमाणे बारीक, १-३ मी. उंच खोड येते. याच खोडावर कर्दळीच्या पानांसारखी पण कर्दळ किंवा हळदीच्या तुलनेने अरुंद व मोठी पाने दोन रांगांमध्ये येतात. पाने साधी, एकाआड एक, बिनदेठाची, भाल्यासारखी आणि गुळगुळीत असतात. पावसाळ्यात खोडाच्या व फांद्यांच्या टोकांना ठळकपणे दिसून येणारे पांढऱ्या, स्वच्छ, मोठ्या सहपत्री फुलांचे कणिश फुलोरे येतात. फुले पांढरी किंवा फिकट पिवळी, सुगंधी असतात; ती खालून नळीसारखी आणि वर पसरट असतात. त्यात एकच पुंकेसर व काही वंध्य पुंकेसर असतात. अंडपी जुळलेली व तीन असतात. फळ (बोंड) लंबगोल व केशहीन असून त्यात अनेक बीजे असतात. फळ फुटून तीन भाग होतात.
सोनटक्क्याचे हिरवे आभासी खोड दोरा तयार करण्यासाठी वापरतात, तर सुकलेल्या खोडापासून कागद तयार करतात. सुक्या मूलक्षोडापासून सुगंधी तेल मिळते. फुलांपासून बाष्पनशील अत्तर मिळते. त्याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. सोनटक्क्याचे मूलक्षोडाचे चूर्ण औषधी असते. त्याचा काढा संधिवातरोधक व पौष्टिक आहे. सोनटक्क्याच्या फुलाला क्यूबा देशाने राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे.