एक गळिताचे कडधान्य. सोयाबीन ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ग्लायसीन मॅक्स किंवा ग्लायसीन सोया आहे. वाटाणा, चवळी, भुईमूग, घेवडा इ. वनस्पतींचा समावेशदेखील फॅबेसी कुलात होतो. सोयाबीन मूळची पूर्व आशिया (चीन, जपान, मंगोलिया, तैवान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया) येथील असावी, असे मानतात. अठराव्या शतकाच्या सुमारास अमेरिकेत सोयाबीन वनस्पतीचा प्रवेश झाला. सोयाबीन हे वनस्पतिजन्य प्रथिनांचा, तसेच अनेक रासायनिक उत्पादितांमधील घटकद्रव्यांचा स्रोत असल्याने जगातील अनेक देशांत ही वनस्पती लागवडीखाली आहे. ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, चीन आणि भारत हे देश सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहेत.
सोयाबीन हे सरळ वाढणारे पीक असून त्याची वाढ २ मी.पर्यंत होते. याची पहिली खरी पाने एकाच पात्याची किंवा एकपाती असून जोडीने येतात. दुसऱ्या पेरापासून एकेरी, संयुक्त, त्रिदलीय पाने येतात; पाने आकाराने गोल असतात. फुले स्वयंपरागण होणारी, पांढरी, गुलाबी किंवा जांभळट छटा असलेली असतात. शेंगा केसाळ, तीन – पाचच्या समूहांत येतात. त्या पिवळसर राखाडी, तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या आणि ३ –८ सेंमी. लांब असतात. सोयाबीनच्या एका झुडपाला सु. ४०० शेंगा लागतात आणि प्रत्येक शेंगेत २–४ बिया असतात. सोयाबीनच्या बियांच्या आकारमानात विविधता असते. त्यांच्यावरील तुसाचा रंग काळा, करडा, पिवळा आणि हिरवा असतो.
फॅबेसी कुलातील अन्य पिकांप्रमाणे सोयाबीनमध्ये नायट्रोजन स्थिरीकरणाची क्षमता असते आणि ही क्षमता ऱ्हायझोबियम गटातील जीवाणूंमुळे येते. या वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये असलेले ऱ्हायझोबियम जीवाणू हवेतील नायट्रोजनचे रूपांतर अमोनियाच्या व नायट्राइडाच्या स्वरूपात करतात. या संयुगांचा वापर वनस्पती आपल्या वाढीसाठी करतात. त्यामुळे या पिकांना वेगळी नायट्रोजनयुक्त खते देण्याची गरज नसते.
सोयाबीन हे कच्च्या स्वरूपात खाता येत नाही. मोड आलेले किंवा शिजवलेले सोयाबीन मात्र पोषक व सहज पचणारे अन्न असून वनस्पतिजन्य प्रथिनांसाठी एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत आहे. त्यामुळे जगात ते माणसांच्या तसेच प्राण्यांच्या अन्नात वापरात आहे. सोयाबिनाच्या १०० ग्रॅ. बियांमध्ये ३० ग्रॅ. कर्बोदके, २० ग्रॅ. मेद, ३६ ग्रॅ. प्रथिने आणि ९ ग्रॅ. पाणी असते; तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह यांचा या बिया उत्तम स्रोत आहेत. सोयाबीनच्या बियांमध्ये लक्षणीय प्रमाणात फायटिक आम्ल, आहाराविषयक तंतू आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. सोयाबीनमध्ये कोलेस्टेरॉल शून्य असते. त्यात स्टार्च नसल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते प्रथिनांचा उपयुक्त स्रोत आहे. सोयाबीनच्या प्रथिनांमध्ये सर्व प्रकारची उपयुक्त ॲमिनो आम्ले असतात. परंतु, त्यांमध्ये ट्रिप्सिन या पाचक विकराला प्रतिबंध करणारा पाचकरोधी घटक असतो. तसेच त्यामध्ये तांबड्या पेशींच्या गुठळ्या होण्यास कारणीभूत ठरणारा हिमॅग्लुटीनीन हा घटक असतो. हे घटक नष्ट करण्यासाठी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून किंवा शिजवून आणि वाळवून वापरतात.
सोयाबीनचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. सोयाबीनचे तेल आहारात स्वस्त खाद्यतेल म्हणून वापरले जाते. तेल काढल्यानंतर उरलेल्या पेंडीचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी केला जातो. सोयाबीनच्या बियांपासून सोयामिल्क म्हणजेच सोयादूध तयार करतात. ज्या व्यक्ती प्राणिजन्य दूध पचवू शकत नाहीत, अशा व्यक्ती सोयादुधाचा वापर करू शकतात. तसेच या दुधापासून वनस्पतिजन्य चीज अर्थात ‘टोफू’ तयार करतात. सोयाबीनचे दाणे भाजून, त्याची सालपटे काढून, दळून पीठ मिळवले जाते. या पिठापासून ब्रेड, बिस्किटे, केक तयार करतात. सोयाबीनपासून सोया सॉसदेखील तयार करतात. औद्योगिक क्षेत्रात अग्निरोधक द्रव्य, कीटकनाशक, रंग तसेच कपड्यांवर झळाळी आणण्यासाठी सोयाबीनचा वापर होतो. सोयाबीनचा वापर करून बायोडीझेल तयार करतात. खेड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास सोयाबीन हे पीक महत्त्वपूर्ण ठरत आहे.